(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नव्या करिअर संधी

एकदा हस्तगत केलेले किंवा शिकलेले तंत्रकौशल्य सारखे बदलत राहणार असून ते बदल तत्काळ स्वीकारण्याची मानसिकता अंगी बाणवने, हा या पुढील काळातील महत्वाचा मंत्र ठरेल. करोनोत्तर काळातील बहुतांश रोजगाराच्या संधी या स्मार्ट कार्यालयातील असतील. यामध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता, स्वयंचलन यास महत्व राहील. ग्राहकांपर्यंत गतिने पोहचून अधिकाधिक व्यवसाय कसा करता येईल किंवा अधिकाधिक नफा कसा कमावता येईल यावर कंपनीचालक लक्ष केंद्रित करतील. स्मार्ट संसाधनांसह कार्यरत स्मार्टमनुष्यबळाकडून किमान खर्चात अधिक उत्पादकतेची अपेक्षा ठेवली जाईल.
यापुढील काळात लहानमोठ्या सर्व कंपन्या आणि उद्योग यांच्या पुढे टिकून राहण्याचे मोठे आव्हान असेल. त्यामुळे गुंतवणुकीसाठी निधी, उत्पादनासाठी लागणार खर्च आणि अपेक्षित किंवा त्यापेक्षा अधिक नफा या सर्व बाबी लक्षात घेऊन स्वत:ला कार्यरत करणाऱ्या, समर्थ करणाऱ्या मनुष्यबळाचा टिकाव लागू शकतो.काही संधी

() व्हीडिओ ब्लॉगर-हे सध्या सर्वाधिक मागणी असलेले आणि लोकप्रिय असलेले ऑनलाइन करिअर आहे. अनेक कंपन्या अशा व्हीडिओ ब्लॉगरच्या किंवा यू-ट्यूबरच्या शोधात असतात. आपले उत्पादन/सेवा किंवा एखादा विशिष्ट संदेश डिजिटल माध्यमांव्दारे हे व्यावसायिक प्रभावीपणे अधिकाधिक लोकापर्यंत पोहचवू शकतात असा विश्वास कंपन्यांना वाटतो. प्रत्येक प्रकल्पावर मेहताना मिळत असल्याने हा करिअरचा उत्तम पर्याय ठरु शकतो. यासाठी लागणारी कौशल्ये-निवदेन व सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचे तंत्र, व्हीडिओचे संपादन, ग्राहक व्यवस्थापन कौशल्य, आशयाचा विकास.

() ग्रॅफिक डिझायनर- हे तंत्रकौशल्य हस्तगत केलेल्या उमेदवारांना चांगली मागणी राहील. करोनोत्तर काळात त्यांची गरज स्टार्टअप आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना मोठया प्रमणावर भासत आहे. हा संपूर्ण व्यक्तिगत स्वरुपाचा रोजगार असल्याने ऑनलाइन ग्रॅफिक डिझायनर्सना अधिकाधिक संधी मिळू शकते. या क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये-ग्रॅफिक डिझायनिंगसाठी लागणाऱ्या तंत्रावर (फोटोशॉप, कोरल ड्रा, इन डिझाइन, इलुस्ट्रेटर इत्यादी) हुकूमत, सूक्ष्म नियोजनाची दृष्टी, परिपूर्ण तांत्रिक ज्ञान.

() जाहिरात संस्था –करोना काळात पारंपरिक पध्दतीच्या जाहिरात क्षेत्राने मान खाली टाकली. मुद्रित माध्यमांपासून ग्राहक दूर गेल्याने जाहिरातदारही दूर गेले. त्यामुळे अनेक वृत्तपत्रे बंद पडली, आवृत्या बंद पडल्या, नियतकालिके बंद पडले. याचा परिणाम जाहिरात संस्थांवरही पडला. मोठे आणि प्रमुख ब्रँडस/कंपन्यांनी आपला मोर्चा डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळवला. या कंपन्यांनी स्वत:चे, मार्केटिंग कम्युनिकेशन विभाग सुरु करुन डिझायनर्सची नियुक्ती केली. त्यामुळे डिजिटल माध्यमाचा वापर करु शकण्याची क्षमता प्राप्त करणाऱ्या उमेदवारास जाहिरात निर्मिती संस्थांमध्ये रोजगाराची संधी मिळणे आणि ती टिकून राहणे यापुढील काळात शक्य होऊ शकेल.

() कंटेट क्रिएशन (आशय निर्मिती)-विपणन म्हणजेच मार्केटिंग पासून चित्रपट निर्मितीपर्यंत आशय (कंटेट) हाच महत्वाचा घटक असल्याचे करोना प्रादुर्भावाच्या काळात दिसून आले.

समाज माध्यमांवर सुयोग्य आशयाची पेरणी सातत्याने केल्याने अनेक व्यवसाय, करोना काळात लोकांना आकर्षित करत होते. बरेच चित्रपट या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर (डिजिटल) प्रदर्शित झाले. विविध स्वरुपाच्या ब्लॉगव्दारे लोक/ग्राहकांपर्यंत पोहचता येणे शक्य झाले. पुढील काळात अधिकाधिक व्यक्ती डिजिटल जगताशी अधिक जोडल्या जातील. त्यामुळे ब्लॉग/ फेसबूक/ यूट्यूब आदी समाज माध्यमांवरील तुमची उपस्थिती लोकांच्या नक्कीच लक्षात येऊ शकते.

सध्या कोणत्याही संस्थेसाठी आशय (कंटेट) हाच प्राणवायू झाला आहे. ऑनलाइन कंटेट विकासक, हा संस्थेच्या कंटेट व्युहनीतीचा आराखडा तयार करण्यासाठी जबाबदार असतो. शिवाय कंपनीच्या उद्दिष्ट्यूपर्तीची दिशा ठरवण्यात त्याला महत्वाची भूमिका बजवावी लागते. बहुतांश स्टार्टअप हे ऑनलाइन कार्यरत असल्याने त्यांचे कंटेट व्यवस्थापन महत्वाचे ठरत आहे. अशा स्टार्टअप कंपन्यांना ऑनलाइन कंटेट विकासकांची मोठी गरज भासू लागली आहे. या भूमिकेसाठी आवश्यक असणारी कौशल्य- सर्जनशील विचार करण्याची क्षमता, सूक्ष्म नियोजनाची दृष्टी,एकाच वेळ अनेक काम करण्याचे कौशल्य, लेखन कौशल्य,संवाद कौशल्य, डिजिटल कम्युनिकशेन, व्युहनीती तयार करण्यासाठी लागणारी वैचारिक क्षमता, यांचा ठळकपणे उल्लेख करता येईल.

 () ॲफिलिअेट मार्केटर (Affiliate Mar keter) – तुमच्या प्रत्यक्ष कामगिरीवर आधारित हा व्यवसाय आहे. डिजिटल प्लॅटफार्मचा उपयोग करुन अशा पध्दतीचा व्यावसायिक होता येणे शक्य आहे. इंटरनेटवरील ट्रॅफिक (चलनवलन) व्दारे महसूल/उत्पनाचे स्त्रोत तयार करणे शक्य आहे. या क्षेत्रातील करिअर करण्यासाठी पुढील कौशल्यांची गरज भासेल – समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता, विपणनातील (मार्केटिंग) सर्जनशीलता, मूलभूत तांत्रिक कौशल्य, समूहाला सांभाळण्याचे कौशल्य, उत्पादकता व्यवस्थापन, समाज माध्यमे प्रभावीरीत्या वापरण्याचे कौशल्य, वित्तीय व्यवस्थापन.

(६) इलेक्ट्रॉनिक/ डिजिटल/ मुद्रित माध्यमातील पत्रकारिता-

करोनाच्या काळात मुद्रित आणि डिजिटल माध्यमातील पत्रकारांनी विविध प्रकारची माहिती देण्यासाठी जीवाची पर्वा न करता काम केले. आपल्या प्रधानमंत्र्यांनी पत्रकार/ माध्यमकर्मिंचा उल्लेख करोना योध्दा असा केला. पत्रकारितेत असणाऱ्या व्यक्तिंना नोकरीतून काढून टाकण्याचा वा वेतनातील कपातीचा फटका बसला. मात्र सर्वसामान्यांपर्यत तत्काळ माहिती पोहचवण्याचे पत्रकारांचे कसब आणि कौशल्य हे दुर्लक्षित करता येणारे नाही ही बाब, प्रसारण आणि माध्यम समूहांच्या लक्षात आले आहे. काही माध्यम समूहांनी मोठ्या प्रमाणावर भरतीही सुरु केली आहे. सध्याच्या अनिश्चतेतही पत्रकारिता/ माध्यमांच्या क्षेत्रात करिअर संधी मिळू शकतात. लागणारे कौशल्य- उत्तम संवाद व लेखन कौशल्य, भाषेवर प्रभुत्व, चालू घडामोडींची विस्तृत माहिती व विश्लेषण करण्याची क्षमता आणि आधुनिक तंत्रकौशल्ये.

(७) खाद्दाने आणि रिटेल – करोना काळात या क्षेत्राची उलाढाल समाधानकारक राहिली. खाद्दान्ने, शितपेये, अन्नपदार्थ यांच्या प्रत्यक्ष आणि ऑनलाइन खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. आरोग्यदायी आणि रोगप्रतिकार अन्नपदार्थांविषयी जागृती झाल्याने या पदार्थांच्या खरेदीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे अन्नपदार्थ निर्मिती उत्पादकांनी या अन्नपदार्थांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले. या आरोग्यदायी अन्नपदार्थांचा थेट पुरवठा ग्रामीण भागापर्यंत करण्यात कंपन्यांनी बाजी मारली. त्यामुळे या कालावधित या कंपन्यांनी अपेक्षिलेली उलाढाल आणि नफा साध्य झाला. यामुळे प्रेरित होऊन या क्षेत्रातील कंपन्यांनी आरोग्यदायी अन्नपदार्थांची नवी उत्पादने बाजारात आणली. त्याला ग्राहकांना उत्तम प्रतिसाद दिला. या क्षेत्रात येण्यासाठी लागणारी कौशल्ये– मार्केटिंग (विपणन) कौशल्य, संवाद कौशल्य.

इतर काही क्षेत्रे

  • माहिती आणि मनोरंजन, () वित्तीय सेवा, विमा क्षेत्र आणि बँकिंग, () दूरस्थपध्दतीचे शिक्षण, () दैनंदिन गरजेच्या वस्तू/पदार्थ, () स्पर्शविरहित (टचलेस) अर्थव्यवस्था, (ब्रॉडबँड, गृह पुरवठ्याची सेवा, जिमपासून ते योगापर्यंतचे ऑनलाइन वर्ग, एकमेकांशी संपर्क साधू शकणारे ॲप्स इत्यादी) () सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, () प्रोजेक्ट मॅनेजेर, () कस्टमर सर्व्हिस स्पेशॅलिस्ट, ()डिजिटल मार्केटर, () आयटी सपोर्ट हेल्प डेस्क, () फायनांशिअल ॲनॅलिस्ट,()ग्रॅफिक डिझायनर, यांचा ठळकपणे उल्लेख करावा लागेल. या क्षेत्रात टप्प्या-टप्प्याने तांत्रिक बदल होतील. मात्र रोजगाराच्या संधींमध्ये फार फरक पडणार नाही.