झाकली मूठच बरी..
गजनगरित विशेष दरबार भरवण्यात आला होता. काही विशेष कारण असेल तेव्हाच असा दरबार भरवण्याची गजनगरित प्रथा होती. त्यामुळे दरबारी आणि मानकऱ्यांना जेव्हा विशेष दरबाराचे निरोप गेले तेव्हा सर्वांच्या सोंडी उंचावल्या. काही प्रमुख गजाधिपतींनी नेत्रपल्लवीही केली. पण एकालाही विशेष दरबाराच्या आयोजनाचे प्रयोजन समजले नाही.
विशेष दरबाराचा दिवस उगवला. सर्व दरबारी आणि मानकरी, या दरबाराला उपस्थित होते. गजराजांचे दरबारात आगमन होताच सर्वांनी त्यांना मानाची सोंड हलवली. गजराजांसह सर्व दरबारी आसनस्थ झाले.
गजराजांनी प्रथेनुसार प्रधानजींना दरबाराचे कामकाज सुरु करण्याची आज्ञा केली. प्रधानजींनी आजच्या विशेष दरबाराचे प्रयोजन सांगितले.
एक मुंगी हत्तीगणांना घाबरवू शकते असा एक निरोप कुणाकडून तरी गजराजांकडे पोहचवण्यात आला होता. हा संदेश पोहचविणाऱ्याचा हेतू काय, हे आज गजराजांना समजून घ्यायचे आहे. तसेच हत्तीगण खरोखरच मुंगीला घाबरतात का, हे सुध्दा त्यांना सर्वांकडून स्पष्टपणे जाणून घ्यायचे आहे. वस्तुनिष्ठ कारण कळले तर त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याची त्यांची तयारी आहे. असे बोलून प्रधानजी आसनस्थ झाले. दरबाराच्या कामकाजास प्रारंभ झाला.
आपण खरोखरच मुंगीला घाबरतो का ? असा सवाल गजराजांनी उपस्थित गजाधिपती दरबारी आणि मानकऱ्यांना केला. हा थेट सवाल कर्णपटली पडतातच दरबाऱ्यांमध्ये चलबिचल सुरु झाली. काही दरबाऱ्यांना तर इकडे आड तिकडे विहीर या म्हणीची आठवण झाली. कारण आजपावेतो ते केवळ ही म्हण ऐकून होते. आज त्याचा नेमका अर्थ त्यांच्या ध्यानात आला होता. सत्य काय होते याची कुणालाच कल्पना नव्हती. कारण मुंगीला हत्तीगण घाबरतात हे ते लहान होते तेव्हापासूनच ऐकून होते. पण हत्तीगण मुंगींना कधी घाबरले याचा कोणताच पुरावा नव्हता. त्यामुळे गजराजांना सांगावं तरी काय आणि कसे, हा दरबाऱ्यांपुढे प्रश्न पडला. घाबरतो म्हंटलं तर मोठीच पंचाईत. नाही म्हंटल आणि तेच समजा खरं निघालं तर महाराजांच्या रोषाला बळी पडणार, यात कुणाच्या मनात शंका नव्हती. त्यामुळे सर्वदरबाऱ्यांनी खाली मान घातली. कुणीही काहीच बोलेना. आपल्या एका साध्या प्रश्नाचं उत्तर दरबारी आणि मानकरी देऊ शकत नाही, याचा भयंकर राग गजराजांना आला. क्षणाक्षणाला त्यांचा संताप वाढतच गेला. या उद्रेकातून त्यांनी सर्व दरबाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचा आदेश सुरक्षा सैनिकांना दिला. गजराजांच्या आदेशापुढे कुणाचेच काही चालले नाही. दरबार अर्धवट टाकून रागारागाने गजराज निघून गेले. दरबारी – मानकऱ्यांची रवानगी तुरुंगात झाली.
000
एका मंुगीमुळे आपणावर अशी अत्यंत बिकट स्थिती आल्याने तुरुंगात गेलेल्या सर्व दरबारी आणि मानकऱ्यांनी मुंगीच्या नावे कडाकडा सोंड मोडली. पायांची आदळआटप केली.
आता काय करायचं बरे, एका ज्येष्ठ दरबाऱ्याने दुसऱ्या दरबाऱ्याला विचारलं..
या तुरुंगातून सुटका करण्याचा उपाय आपणासच शोधून काढावा लागेल .तिसऱ्या दरबाऱ्यानं चौथ्याला विचारलं.
मुंग्यांचा नायनाट करुन, आपण मुंग्यांना घाबरत नाही, हे सिध्द करुन दाखवलं तरच आपली सुटका गजराज नक्की करेल. सहावा दरबारी म्हणाला. इतर दरबाऱ्यांनी त्याला संम्मती दिली. सुरक्षा सैनिकांमार्फत ही बाब गजराजपर्यंत पोहचवण्यात आली. दरबाऱ्यांकडून आलेल्या या निरोपाने गजराजांचा संताप किंचित निवळला. त्यांनी तुरुंगात डांबलेल्या दरबाऱ्यांना मुक्त केलं. पुन्हा एकदा खास दरबार भरवला.
0000
मुंग्यांना हत्तीगण घाबरत नाही, हे सिध्द करण्याची योजना गजराजानं दरबारी आणि मानकऱ्यांकडून समजून घेतली. युध्दाचा प्रस्ताव त्याने मान्य केला. आर या पार करुन मुंग्यांचा नायनाट करु या, अशी प्रतिज्ञा गजराजांनी दरबाऱ्यांकडून करवून घेतली. दरबाऱ्यांमध्ये उत्साह संचारला. त्यांनी मुंग्यांवर आक्रमण करण्याची जोरदार तयारी सुरु केली. गजनगरित रणभेरी वाजू लागल्या.
000
हत्तीगणांनी मुंगीनगरावर आक्रमण करण्याची जय्यत तयारी चालवल्याची बातमी मुंगीधीपती मुंगीश्वरांच्या खबऱ्यांनी आणली. मुंगीश्वरांना प्रथम भीती वाटली आणि नंतर त्यांना हसू आले. गजराज मुर्खपणा करताहेत हे त्यांच्या लक्षात आलं. पण स्वस्थ बसून चालणार नाही हेही त्यांच्या लक्षात आलं. मुंगीधिपतींनीही आपला विशेष दरबार तातडीने बोलावला.
प्रथा आणि परंपेनुसार प्रधानजींनी प्रस्तावना केली. हत्तीगण कसे मुंगीगणांचा संपूर्ण नायनाट करण्याची तयारी करत असल्याचे प्रधानजींनी दरबारी आणि मानकऱ्यांच्या लक्षात आणलं.
हे ऐकून काही दरबारी घाबरले. त्यांना घाम फुटला. काही दरबारी हादरले. आपला जीव वाचवण्यासाठी मुंगीनगरातून कसे पलायन करायचे याचे आडाखे ते मनातल्या मनात बांधू लागले. तर काही दरबारी हसले. हत्तीगण म्हणजे किस झाड की पत्ती , आपण त्यांना यूंव पराभूत करु, असं हसऱ्या दरबाऱ्यांना वाटलं.
आपल्या दरबाऱ्यांच्या या तीन तऱ्हा बघून मुंगीधिपतींना आश्चर्य वाटलं.
जे दरबारी घाबरले त्यांना मुंगीधिपतींनी कारण विचारलं तेव्हा, महाकाय हत्तींनी केवळ सोंडेने फुंकर मारली तरी आपले संपूर्ण राज्य सातासमुद्रापलीकडे उडून जाईल, असं उत्तर आलं.
जे दरबारी हादरले ते म्हणाले , फक्त एका हत्तीच्या चार पावलांनी आपल्या संपूर्ण राज्याचा नायनाट होईल. हत्ती सेनेच्या आक्रमणामुळं आपण पातळाच्याही खाली गाडले जाऊ. त्यामुळे मग कधीच जमिनीवर आपल्याला येता येणार नाही.
जे दरबारी हसले, त्यांनी सांगितलं की, हत्तींना आपण घाबरायचं कशाला ? ते शेर असतील आपण सवाशेर आहोत. ते उन्नीस असतील तर आपण बीस आहोत. कुणाच्या आकारावर जाऊ नका. त्यांच्या देहाला आपला इवलासा जीव पळता भूई थोडी करु शकतो. करुच द्या आक्रमण आपल्यावर, आपण त्यांना चांगला इंगा दाखवू.
हत्तीला आपण घाबरवू शकतो. याबद्दल आपल्या दरबारी आणि मानकऱ्यांमध्ये एकमत नसल्याचं मुंगीधितींच्या लक्षात आलं. तरी सुध्दा त्याने हत्तीगणांच्या संभाव्य आक्रमणाला तोंड देण्याची तयारी करण्याचा आदेश सेनापतीला देऊन दरबार बरखास्त केला.
000
गजराज आणि मुंगीधिती या दोघांनीही युध्दाची जोरदार तयारी चालवली. पण प्रत्यक्षात दोघेही मोठ्याच चिंतेत पडले. हत्तीगण मुंगीला घाबरतात की मुंगीगण हत्तीला घाबरतात या प्रश्नांच अचूक उत्तर दोघांनाही मिळू शकलं नव्हतं.
दोन्ही सेना आता युध्दासाठी जय्यत तयारीला लागल्या. प्रत्यक्ष युध्द सुरु होण्यापूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी गजराज आणि मुंगीधीपती गणरायांकडे गेले. एकाच समयी दोघे राजे आल्याचे गणरायांना आश्चर्य वाटलं. त्यांनी दोघांना बसवून घेतलं. ख्यालीखुशाली विचारली. येण्याचं प्रयोजन विचारलं. जेव्हा दोघांनीही कारण सांगितलं तेव्हा गणराय पोट धरुन हसायला लागले.
दोन्ही राजांंनी गणरायांना याचं कारण विचारलं ,गणराय म्हणाले,
दोन्ही राजांनो , कोण कुणाला घाबरतं , याला महत्व नाही. अगडबंब हत्ती ,पिटुकल्या मुंगीला घाबरतो असं हत्तिंनी समजनं हा मुर्खपणा नाही का? हत्ती आपल्याला घाबरतो असं समजून आपण त्याला यूँव करु नि त्यूँव करु असं मुंग्यांनीं समजनं हे त्याहून मुर्खपणा नाही का ? निसर्गातल्या प्रत्येक प्राण्यांची काही बलस्थानं तर काही कमकूवत बाजू असतात. कमकुवतबाजूकडे दुर्लक्ष करायचं असतं. कधीतरी एखादा हत्ती मुंगीच्या वाटेला गेला असेल, तेव्हा तिने आपला बचाव करण्यासाठी हत्तीला चावून आपला हिसका दाखवला. हत्ती पळून गेला. याचा अर्थ हत्ती नेहमीच मुंग्यांना घाबरतो असा होईल का? बाप्पांनी दोन्ही राजांना प्रश्न केला. दोघांनीही एकमुखाने नाही असं उत्तर दिलं.
बाप्पांनी दोन्ही सैन्याला माघार घ्यायला सांगितलं.
युध्द झाले तर हत्ती मुंग्यांना पायदळी तुडवू शकतात, त्याचप्रमाणे मुंग्या हत्तींना चावे घेऊन घेऊन पळता भूई करु शकतात. मग पळता पळता, नदी – नाले – दरी – खोरे कुठेही जाऊन हत्ती पडतील नि सर्वस्व गमावून बसतील. बाप्पा म्हणाले.
दोघानांही ते पटलं. ते माघारी वळले.
000
युध्दाचा क्षण जवळ येत चालला होता. दोन्ही सैन्य उत्साहानं भारुन गेले होते. कधी आपण शत्रुवर हल्ला करतो असही बऱ्याच सैनिकांना वाटू लागलं होतं.
प्रत्यक्ष युध्दभूमिकडे प्रस्थान करण्यापूर्वी गजराजांनी पुन्हा एकदा प्रमुख दरबारी–मानकऱ्यांचा विशेष दरबार बोलावला.
मुंगी हत्तीगणाला घाबरवू शकतात का? गजराजांनी पुन्हा तोच प्रश्न केला. मागील दरबारातील गजराजांचा संताप लक्षात घेता सर्व दरबारी ताडकन उभे राहत गर्जना करते झाले,
हत्तीगण अजिबात मुंग्यांनी घाबरत नाहीत.
गजराजांच्या मुखी स्मित आले. त्यांनी सर्वांना शांतपणे खाली बसण्याची आज्ञा केली. सर्वजण आसनस्थ होताच त्यांनी हत्तीगण युध्दावर जाणार नाहीत अशी घोषणा केली. गजराजांची घोषणा ऐकून दरबाऱ्यांमध्ये एकच गलका झाला. स्वत: गजराज मुंग्यांना घाबरतात म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असल्याचं वाटून दरबऱ्यांमध्ये चलबिचल सुरु झाली. ही अस्वस्थता लक्षात घेऊन गजराजांनी सर्वांना शांत केले. त्यांना धीर देत ते म्हणाले,
दरबाऱ्यांनो हत्तीगण मुंगीगणांना घाबरतात की मुंगीगण हत्तीगणाला घाबरतात या प्रश्नांच उत्तर आम्ही तुम्हास देऊ शकतो. पण काही प्रश्न अनुत्तरीत ठेवणं हे झाकली मुठ सव्वालाखासारखी असतं. त्यामुळे नुकसान टळतं. युध्दामध्ये केवळ शक्ती असून चालत नाही. कधीकधी युक्ती भारी पडू शकते. समजा मुंगीगणांच्या युक्तीपुढे आपलं काहीच चाललं नाही तर आपण होत्याचे नव्हतं होऊन जाऊ. नाही का?
दरबाऱ्यांना गजराजाचे म्हणणं तंतोतंत पटलं. मुंगीगणांसोबत युध्द न करण्याचा निर्णय योग्यच असल्याचं सर्वांनी मान्य केलं. गजराजांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. त्यांनी दरबार बरखास्त केला. गजराजांचा जयजयकार करीत दरबारी घरी परतले.
000
युध्दभूमीवर निघण्यापूर्वी असाच दरबार मुंगीधीपतींनीही बोलावला. जे दरबारी घाबरले होते आणि हादरले होते त्यांना मुंगीधिपती यांचा हत्तीगणांसोबत युध्द न करण्याचा निर्णय एकदम पसंत पडला. पण जे दरबारी हसले होते, त्यांना मात्र हा निर्णय अजिबात आवडला नाही.
मुंगीधिपतींनी त्यांना समजावून संगितलं की, आपला जीव पिटुकला असला तरी युक्तीनं शक्तीचा सामना करता येतो, हे अर्धसत्य आहे.शक्तीपुढे युक्तीचा टिकाव प्रत्येक वेळेस लागेलच, याची शास्वती काय ? हत्तीगणांच्या महाकाय शक्तीपुढे आपल्या पिटुकल्या जीवाचा चेंदामेंदा व्हायला कितीसा वेळ लागेल याचा विचार करा. आपली मूठ झाकलीच राहू द्या. हत्तीगण आपल्या भितात असं समजून त्यांच्या वाटेलाच जावू नका. यातच त्यांचही भलं अन् आपलही भलं आहे.
दरबाऱ्यांना मुंगीधीपतींचं म्हणणं पटलं. युध्द न करण्याचा निर्णय एकमुखी घेतला गेला. मुंगीधीपतींनी समाधान व्यक्त केले.
झाकली मुठ सव्वालाखाची अणि बरेचदा हिताचीही असते असं दोन्ही राजा आणि प्रजाजनांच्या लक्षात आल्याने एकमेकांच्या नगरात त्यांनी पुढे कधीही ढवळाढवळ केली नाही.त्यामुळे दोन्ही नगरीतले प्रजाजन शतकानुशतके आनंदात आणि कोणत्याही तंट्याबखेड्याशिवाय राहू शकले..
000
सुरेश वांदिले
वाय 1/15,शासकीय वसाहत वांद्रे पूर्व
मुंबई 51
भ्रमणध्वनी–9324973947
.jpg)