करोनाचा सिल्क रोड शोधण्यासाठी…
बाबा तुम्हाला अदृष्य होणाऱ्या माणसाची गोष्ट ठाऊक आहे का, सकाळी सकाळी विवेकने, बाबांना उठता क्षणीच विचारलं.
अजूनही आळसावलेल्या बाबांच्या कपाळावर आठ्या आल्या. उठल्या उठल्या मेंदुला झिणझिण्या आणणारा असला प्रश्न डोक्यावर आदळेल, असं त्यांना वाटलं नव्हत.
अदृष्य माणूस फक्त जादूच्या कथेतच असू शकतो किंवा मग चित्रपटातच राहू शकतो. प्रत्यक्षात तो कसा राहणार? असं तर्कट बाबांच्या मनात सुरु झालं. विवेकच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर तो अदृष्य होणाऱ्या माणसासाठी असंख्य प्रश्नांची सरबत्ती करुन सकाळच्या चहाची गोडी कमी करेल, हे त्यांना ठाउुक होतं. त्यामुळे विवेककडे हसरा कटाक्ष टाकत बाबा म्हणाले..
मी काही काळासाठी ताजतवाणं होण्यासाठी अदृष्य होऊन येतो नि मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो..
वाSव बाबा, तुम्ही ग्रेट आहेस.
यावर काहीही प्रतिक्रिया न देता बाबा प्रातर्विधीसाठी अदृष्य झाले. दहा एक मिनिटानंतर उगवले. त्याच्या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी विवेक आतुर झाला होता. त्याला जवळ घेत बाबा म्हणाले,
तुला कशासाठी हवाय या अदृष्य मानसाचा पत्ता…
ते मी तुम्हाला नंतर सांगतो. आधी तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर तर द्या.
आता काय करावं बरं, बाबांना सूचेना, इनव्हीजीबल मॅन नावाचा चित्रपट त्यांनी कधीतरी बघितल्याचं आठवलं. पण त्याची कथा विस्मरणात गेली होती. पुसटसं आठवत होतं. हॅरी पॉटर जिथे जादू शिकला त्या शाळेत इनव्हीजीबल घड्याळ असल्याचं त्यांनी वाचलं होतं. इकडे मिस्टर इंडिया नावाच्या सिनेमात एक वैज्ञानिक अदृष्य होण्याचं द्रव शोधतो व ते प्यालं की माणूस अदृष्य होतो असं बघितल्याचं त्यांना आठवलं. याचा अर्थ कथा किंवा चित्रपटांमध्ये कां होईना अदृष्य होणारी वस्तू किंवा माणूस अस्तित्वात होता. पण त्यांचा पत्ता विवेकला कसा देणार?
काय सांगावं, काय सांगावं या चक्रात पुन्हा बाबा फिरु लागले. काही क्षण शांततेत गेले. काहीही न सुचल्याने बाबा इकडे तिकडे बघू लागले.
अहो बाबा, तुम्ही बोलत कां नाही, विवेकनं पुन्हा विचारलं.
तसं नाही रे, पण तुला या अदृष्य मानसाचा पत्ता कशाला हवा ?
बाबा, पुन्हा तुमची गाडी तिथेच आणता. माहीत नसेल तर नाही म्हणा. त्यात काय एवढं. बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक आहेत म्हणून त्यांना कॉम्प्युटरचं सगळं ज्ञान असेलच असं नाही ना… विवेकचा मुद्दा गुगलीसारखा बाबांसमोर आला.
आँ, तू काहीतरी काय बरळतोस, असं बाबास म्हणावं वाटलं पण असं काही बोलून आपण बावळट ठरु असं वाटून तो विवेककडे बघून हसला.
बाबा तुम्ही हसता काय, नाही तर नाही , हो तर हो म्हण…
अरे राज्या, मी सांगतो की तुला अदृष्य माणसांचा पत्ता. पण कसं आहे ना की, तो कशासाठी हवा हे कळलं तर, मग मी तसं सांगेन ना.
म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराचे अदृष्य मानसं असतात का, विवेकनं विचारलं.
अगदी बरोबर. तुझं काम सांग, मी लगेच त्या अदृष्य मानसाचा पत्ता सांगतो की नाही बघ.
मला अदृष्य कसं व्हायचं हे त्याच्याकडून शिकून घ्यायचंय.
कशासाठी तुला अदृष्य व्हायचय. बाबाने विचारलं.
मला काय वाटतं बाबा,तुम्ही सुध्दा अदृष्य होण्याचं तंत्र शिकून घ्या…
मी कशासाठी…
एक से भले दो म्हणतात ना…
त्यासाठी अदृष्यच कशाला व्हायला पाहिजे. आपण असेही एक से भले दो आहोतच की.
हे बघा बाबा, तुम्हाला अदृष्य व्हायचं नसेल तर माझी काहीच हरकत नाही मात्र, मला अदृष्य व्हायचय म्हणजे व्हायचय, त्यासाठी लगेच तुम्हाला ठाऊक असलेल्या अदृष्य मानसाचा पत्ता सांगा बघू..
०००
हे संभाषण बराच वेळ चाललं. बोलण्यात गुंतवून या विषयापासून विवेकला दूर नेऊ असं बाबांना वाटलं. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा कशासाठी हवा अदृष्य मानसाचा पत्ता, असं विचारत राहिले. बाबांना अदृष्य मानसाचा पत्ता एकतर माहीत नसावा किंवा माहीत असेल तर तो कशासाठी हवा हे सांगितल्याशिवाय देणार नाही, हे विवेकच्या लक्षात आलं.
हा पत्ता कशासाठी हवा, हे सांगूनच टाकावं असं मग विवेकनं ठरवलं. तो त्यांच्या खोलित गेला नि फिरणारा जगाचा नकाशा आणून त्याने बाबासमोर ठेवला.
आता हे कशासाठी, बाबानं विचारलं.
तेव्हा त्याने बाबाचं बोट चीनच्या नकाशावर नेलं आणि हळूहळू ते वुहान प्रातांवर नेऊन ठेवलं.
बघा…विवेक म्हणाला.
हे तर वुहान शहर. तुला जायचंय का तिकडे.
आता कसं ओळखलस मनातलं.
अरे, पण आता सगळी विमान बंद आहेत ना, मग कसा जाशील?
हे बघा बाबा, विमानं जरी सुरु असती ना, तरी मी विमानानं गेलो नसतो.
मग काय सायकलने गेला असतास की घोड्यावर बसून. बाबा हसत म्हणाले.
बाबा, हसता कशाला? तो ह्यूएन त्ससंग नव्हता का आला गाढवावर बसून आपल्या देशात. थेट आपल्या राज्यातील राजूरा गावात पोहचला होता. तुम्हाला तरी ठाऊक आहे का राजूरा चंद्रपूर जिल्ह्यात आहे की गडचिरोली जिल्ह्यात ते…
म्हणजे तू माझी परीक्षा घेणाराहेस होय.
तसं समजा आणि उत्तर द्या, नाही तर ह्यूयन त्संग गाढवावर बसून राजुऱ्यात पोहचला होता हे मान्य करा.
बरं बाबा..
ह्युएन त्संग जर गाढवावर बसून इकडे येऊ शकतो तर मी सायकलवर बसून तिकडे कां जाऊ शकत नाही?
असं आहे तर..
तसं अजिबातच नाही बाबा. मला सायकलनं सुध्दा जायचं नाही.
मग हॅरी पॉटरकडे असणाऱ्या जादुच्या झाडणीवर बसून जाण्याच्या विचार तर नाही ना तुझा..
आता तर अजिबातच नाही..
मग तू जाशील कसा रे वुहानमध्ये. चार हजार किलोमीटर दूर आहे, आपल्या घरापासून ते शहर.
म्हणूनच तर मला अदृष्य मानसाचा पत्ता हवा ना. त्याच्याकडून अदृष्य होण्याची कला शिकून घेईल आणि जाईन गुप्तपणे वुहानला..
आँ, हे काय भलतच..अरे मुलांना डिस्ने लँडला जायचं असतं, टिकोजीच्या वाडीला जायचं, वाटर पार्कला जायचं असतं, तुला मात्र वुहानला जावं वाटतं, तू बरा आहेस ना विवेका..
यात बरं नसण्यासारख काय बरं..
अरे वुहानमध्ये करोना विषाणू उगवला. तिथून जगात पसरला. अशा ठिकाणी जायची इच्छा ठेवणं म्हणजे, अजगरास वाकुल्या दाखवण्यासारखं नाही का?
तीच तर गंमत आहे खरी..
यात कसली गंमत..
कोण आहे हा करोना ? विषाणू आहे म्हणतात, परवाच मी एका वाहिनीवर डॉक्टर तात्यासाहेब लहानेंना ऐकलं, ते म्हणाले करोना हा मेलेला विषाणू आहे. तो जर तसा आहे तर मग तो इतका कसा धुमाकूळ घालतोय..
याचा शोध घेणार आहेस का तू वुहानला जाऊन..
शोध नाही रे, जस्ट आपलं भेट घ्यावी म्हणतो करोनाची.
पण तो जर मेलेला असेल तर तो कसा भेटेल.
आत्ता कसं मुद्याचं बोललास, तो जर मेलेला विषाणू असेल तर वुहानमधून बाहेर पडलाच कसा? ते त्याचं भूत होतं का? की तो ट्रान्सफॉर्मर सारखा पुन्हा पुन्हा मरुन जिवंत होऊ शकतो? तो खरच विषाणू आहे का? की बॉट आहे ? की रावण महाराजांनी पाठवलेली त्यांची पेशी आहे की केवळ गंमत जंमत आहे? हे बघायला नको का आपण..
तुला कुणी सांगितलं तूच बघायला हवं म्हणून. तिकडे ट्रम्प आजोबा बघताहेत. अँजेला मार्केल काकी बघताहेत, मक्रॉन काका बघताहेत. त्यांच काम ते करताहेत ना, तू कोणता उजेड पाडशील तिथे जाऊन..
ह्यूयन त्संगने इकडे येऊन काय उजेड पाडला असंच नाही का म्हणण्यासारखं नाही का बाबा हे. राजुऱ्याच्या माणिकगढपर्यंत पोहचून या पठ्ठयानं सिल्क रोडचा शोध लावला. दीड दोन हजार वर्षापूर्वी, आता त्याच रस्त्याचा उपयोग करुन चीन जगावर राज्य करण्याचं स्वप्न रंगवतोय.
बबड्या, आपल्याला काय करायचय, जगावर राज्य असो नाही तर मंगळावर..
असं कस बाबा, ह्यूयन त्संग इकडे आला म्हणून त्याला सिल्क रोड कळला, मी वुहान मध्ये गेलो तर करोना विषाणूच्या जाण्यायेण्याचा रस्ता नाही का कळणार.
त्याने काय होणार..
एकदाचं त्याला भेटून सांगतो की , तू खरच आहेस तरी कोण, मेलेला आहेस का जिवंत आहेस, की तू नाहीच आहेस, की फक्त अफवाच आहे .एकदा हे कळलं ना की मग बघ कसं झक्कास होईल..
काय होईल…
झक्कास. जरा हे कळलं की करोना खरोखरच मेलेला विषाणू आहे किंवा ती अफवाच आहे तर मग भीती जाईल ना..भीती गेली की पटकन शाळा नाही का सुरु होणार…तो खरोखरच असेल तर त्याला सांगेल ना मी,अरे शाळा नाही म्हणजे सगळी गंमतच गेली शिकण्याची, खेळण्याची, दोस्ता दोस्तांमध्ये भांडणाची..
आणि उंडारण्याची..बाबा हसत म्हणाला.
कां नाही. आता आम्ही मुलांनी नाही उंडाराचं तर तुम्ही का…
बर बर,पण गड्या तुला अदृष्यच होऊन का जायचय हे काही नीट कळलं नाही..
मी असं ऐकलय की वुहानच्या वेशिवर एक मोठा ड्रॅगन डोळयात तेल घालून बघत असतो म्हणे. त्याची नजर चुकवण्यासाठी अदृष्य होण्याशिवाय पर्याय नाही. करोना जर मेलेला विषाणू असेल तर तो अदृष्य झाला असेल. एक अदृष्य , दुसऱ्या अदृष्याला बघू शकतो आणि त्याच्याशी बोलू शकतो..
०००
विवेक असं बरच काही सांगत राहिला आणि बाबा ऐकत राहिले. आता अदृष्य होण्याची कला माहीत असलेला मानसाचा पत्ता विवेकला सांगणं भागच होतं. करोना विषाणूसारखाच हा, अदृष्य होण्याची कला ठाऊक असेला माणूस मेलला आहे असं सांगितलं तर…असं बाबांच्या मनात आलं आणि ते शहारलेच. त्याच्या अंगावर काटे उभे राहिले. डोळ्यासमोर काजवे उभे राहिले. कारण त्यांच्या समोर साक्षात लॉर्ड व्हाल्डेमॉर्ट दिसू लागले.. अदृष्य होण्याची कलेत माहीर असणारा दुष्टात्मा. त्यालाच हॅरीने मारले होते.
जे मनात आलं ते लॉर्ड व्हॉल्डेमॉर्टच्या रुपानं काही क्षण बाबांसमोर तरळलं. त्यांच्या घशाला कोरड पडली.त्याने डोळे मिटले.
बाबा काय होतय तुम्हाला,विवेकनं घाबरुन विचारलं.
पाणी देतोस का.
विवेकन त्यांना पाणी आणून दिलं. पाणी प्याल्यावर बाबास बरं वाटलं.
….
आता अदृष्य मानसाचा विषय काढायला नको, असं वाटून विवेकनं तो विषय बंद केला.
विवेकला जवळ घेत बाबाच म्हणाले,
अदृष्य माणसाचा तुला पत्ता देईन हं उद्या..
विवेक काहीच बोलला नाही. बाबा आपल्यामुळे अस्वस्थ झाल्याचं लक्षात आल्यानं त्याला वाईट वाटलं.
०००
दुसऱ्या दिवशी बाबांनी विवेकला एच. जी. वेल्स यांनी लिहिलेल इनव्हिजीबल मॅन, पुस्तक वाचायला आणून दिलं. यात अदृष्य माणसाचा पत्ता असल्याचं विवेकला सांगितलं.
सध्या विवेकचं या पुस्तकाचं वाचन सुरु आहे. या पुस्तकातील अदृष्य होणाऱ्या माणसाकडून त्याला अदृष्य होण्याचा मंत्र ,तंत्र किंवा द्रव्य मिळेल अशी आशा करायला काय हरकत आहे?
हे पुस्तक विवेकला देताना असा विचार बाबांच्या मनात आला. आणि ते खुदकन हसले…
००००
