पंचवटीचे रहस्य…
शनिवार कधी येतो नि कधी नाही, असं त्या गावातल्या मुलांना वाटायचं. शनिवार आला की गावातली बरीच मुलं त्या घराकडे धाव घेतं. त्या घरी गेलेली मुलं, तीन-चार तास रमून जात. खरं तर, त्यांना घरी जायचं नसे. पण आईबाबा रागावतील किंवा नको ते प्रश्न विचारतील, म्हणून मग मुलं नाईलाजानं घरी परत. घरी जाण्याचं दु:खं असलं तरी, आज तीन-चार तास, या घरी राहण्याच्या आनंदाचं तेज मात्र त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असे.
आपली मुलं गावातील एका टोकावर असणाऱ्या घरी शनिवारी इतक्या आवडीने जातात काय? आनंदी होतात काय? याचं काय रहस्य असाव बाँ? असं त्या मुलांपैकी एक दोन पालकांना वाटलं. त्यांनी आपल्याच मुलावर पाळत ठेवली. ही मुलं निघाली,हे पालक त्यांच्या पाठिमागे लपतछपत जात.
ज्या घरी मुलं जात, ते छान टुमदार घर होतं. घर कसलं, छानसी बंगलीच होती. समोर मोठी बाग होती. बागेमध्ये बाकं ठेवली होती. बंगलीचे दार सताड उघडे होते. दरवाज्यावर कुणीही अडवणारं नव्हतं. मुलं आली की थेट आत जात. काही वेळाने पुस्तकं घेऊन बाहेरच्या बागेत येउुन वाचू लागत. थोड्यावेळाने या मुलांसाठी चहा नाश्ताही येत असे.
या पालकांना आश्चर्यच वाटलं. हा जादूई बंगला किंवा भूताखेताचा बंगला तर नाही ना, असंही एकाही पालकास वाटलं. आपल्या पाल्याचं लक्ष नाही बघून त्यांनी हळूच आत प्रवेश केला. समोरचं दृष्य बघून ते थक्क झाले.
घरात प्रवेश केल्यानंतर एक मोठं दालन होतं. त्या दालनात पुस्तकांनी भरलेली ५० हून अधिक कपाटं होती. ती सर्व कपाटं उघडी होती. मुलं येत. या कपाटाकडून त्या कपाटाकडे जात. एखादं पुस्तक आवडलं की त्याकडे एकटक बघत. मग ते स्वत:च तिथून पुस्तक काढून बाहेर बागेत धूम पळत. ते बघून त्या दालनात एका खुर्चीवर बसलेल्या गृहस्थाचा चेहरा आनंदाने फुलून जायचा.
या पालकांकडे त्या गृहस्थाचं लक्ष गेलं. त्यांनी या पालकांना स्वत:कडे बोलावून बाजूला बसवलं.
तुम्हाला पण पुस्तक वाचायचीत का? वावा छान. पुस्तकांसारखा ज्ञान देणारा मित्र नाही.असं तो गृहस्थ म्हणाला.ते पालक त त प प करु लागले.
नाही म्हणजे, आम्ही इथे आलो ते..
म्हणजे, तुम्ही दुसऱ्याच हेतूने आलात की काय? याचा अर्थ तुमचा हेतू चांगला दिसत नाही.त्या गृहस्थांनी नाराजी व्यक्त केली.
तसं नाही पण, मुलं दर शनिवारी इतक्या आतुरतेने इकडे कां धाव घेतात? इथून घरी आली की आनंदांनं फुलून गेलेली असतात? हे जरा चमत्कारीच वाटलं म्हणून..
म्हणून, तुम्ही तुमच्या मुलांवर पाळत ठेवली. अरेरे..
क्षमा असावी, चुकलं आमचं.
अहो, स्वत:च्या मुलांवर विश्वास जर ठेवता येत नसेल तर यापेक्षा दुर्देव्य ते कोणतं?अशी गुप्तहेरगिरी करण्याच्या आधी त्यांच्याशी बोलायचं होतं.त्यांच्यासोबतच यायचं होत ना.
चुकलं हो आमचं.खरच चुकलं.पालक म्हणाले.
ठीक आहे. पुन्हा अशी चूक करु नका. इतर पालकांना अशी चूक करायला लावू नका. असं बोलून ते गृहस्थ उठून बागेत गेले. ते बागेत येताच मुलांनी एकच गलका केला. ते त्यांच्या भोवती गोळा झाले. मग त्यांनी मुलांना छान छान गोष्टी सांगायला सुरुवात केली. त्यातल्या बऱ्याच विज्ञानाच्या गोष्टी होत्या. मुलं त्यात रमून गेली.
काही मुलांना पुस्तकं वाचतना काही प्रश्न पडले होते. ते प्रश्न त्यांनी या गुहस्थास विचारलं. त्यांनी या प्रश्नांची अगदी सोप्या भाषेत उत्तर दिली.
हे सर्व बघून आपल्या मुलांवर हेरगिरी करणाऱ्या पालकांना आपल्याया कृत्याचा पश्चाताप वाटू लागला. त्यांनी सर्वांदेखत मुलांची आणि त्या गृहस्थांची क्षमा मागितली.
ते गृहस्थ म्हणजे नोबल पारितोषिक विजेते थोर शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही रमण. बेंगळुरु शहरातील मल्लेश्वरम परिसरातील पंचवटी या त्यांच्या बंगल्यात, दर शनिवारी परिसरातील मुलांना मुक्तपणे येण्याची, आणि त्यांच्या समृध्द ग्रंथालयातील कोणतही पुस्तक वाचण्याची परवानगी होती. शिवाय हा संपूर्ण दिवस ते मुलांसोबत घालवत.त्यांच्याशी बोलत.विज्ञानातील गोष्टी सांगतना तर ते भान हरपून जात. मुलांनाही भान हरपायला लावत. या भान हरपण्यातूनच पुढे अनेक मुलांना विज्ञान संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली. अशा मुलांच्या मदतीला डॉ रमन कधीही आणि केव्हाही तयार असत.
सुरेश् वांदिले
