(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 चूक उमगली 

तेजोमयीच्या बाबांना पुस्तकांची आवड असल्याने ते स्वत:साठी आणि तिच्यासाठी दरमहिन्याला पुस्तकं खरेदी करत. शिवाय त्यांच्याकडे बरेच मासिकही येत. या पुस्तक आणि मासिकांनी चांगली तीन-चार कपाटं भरली होती. वेळ मिळाला की बाबा आणि ती या पुस्तकांना क्रमांक देत. त्याचा विषय एका डायरित लिहून काढत. त्यामुळे अमूक एका क्रमांकाचे पुस्तक या विषयाचे आणि तमूक लेखकाचं असल्याचं पटकन कळत असे. शिवाय कविता, कथा, कादंबरी, विनोद, मुलांसाठी असेही वर्गीकरण बाबा करत. त्यांचं बघून बघून ती असं करायला शिकली.

पुस्तक वाचून झाल्यावर त्याच कपाटात आणि त्याच क्रमांकावर ठेवायची ही शिस्त बाबांनी घालून दिली होती. ती पाळली नाही तर पुस्तके चटकन सापडणार नाही आणि शोधण्यातच वेळ जायचा असं त्यांचं सांगणं होतं. तेजोमयी हा शिरस्ता बरोबर पाळत असे. त्यामुळे पुस्तकं जागच्या जागी राहत आणि क्षणात मिळत.

तिच्या आईस मात्र पुस्तक वाचनाची फार आवड नव्हती. बाबा सांगून सांगून थकले. त्यांनी या विषयावर बोलणं सोडून दिलं. तूच समजावून सांग आईस, असं बाबांनी तेजोमयीस एकदा सांगून टाकलं.

माझं ऐकेलना रे आई, ती, अलेक्झांडर (द डॉगी) स एकदा विचारलं. मला काय माहीत अशा आशयाची मान हलवून तो आईकडे शेपूट हलवत निघून गेला. तेजोमीयही त्याच्या पाठिमागे आईकडे आली.

बहीण- भावास काहीतरी विशेष सांगायचं दिसतय, आईने दोघांकडे बघत विचारलं. अलेक्झांडरने मान हलवली. तेजोमीयने मान खाली घातली.

अगं, तुला काही सांगायचय ना सांग की मग, ठोंब्याला तू सांगितलस मला सांगायला काय जातय तुला?

नाही म्हणजे, अगं. तेजोमयी त त प प करत म्हणाली. आपल्याकडे जी पुस्तकं आहेत ना,ती छान आहेत.

वा वा. बाबांनी तक्रार केली वाटतं माझी..

तसं नाही गं. पण पुस्तकं वाचलं की किती छान वाटत ना.

हो का? मी पुस्तक वाचायला लागले तर घरची कामं कोण करणार?

अगं दिवसभर थोडच वाचायचय. सवड मिळाली की एकदोन तास वाचायला काय हरकत? नाही कारे अलेक्झू, तेजोमयी अलेक्झांडरकडे बघत म्हणाली.

त्याने होकारार्थी मान हलवली.

अरे, तुला काय जात हो म्हणायला. पुस्तक वाच म्हणतेय तेजो, ठोंब्या.

मग काय झालं त्यात?असे काहीसे भाव अलेक्झांडरच्या चेहऱ्यावर उमटले.

बहीण-भावाची इतकी इच्छाच आहे तर वाचायलाच हवी पुस्तकं, असं म्हणून आईने प्रेमाने अलेक्झांडरचा हलकेच कान पिरगाळला.तेजोमयी हसली.

तेजोमीयने आईसमोर पुस्तकांची नोंद केलेली डायरी ठेवली. त्यावर नजर टाकून आईने पु.ल.देशपांडे यांची पुस्तक संबंधित कपाटातून काढलं. पुस्तकं वाचून झालं की जागच्या जागी ठेवयाचं, हे तेजोमयीनं तिला समजावून सांगितलं.

हळूहळू आईला पुस्तक वाचन्यात आनंद मिळू लागला. पाच-सहा दिवसात ती एखादं पुस्तक वाचून संपवायची. मात्र पुस्तक वाचल्यावर त्याच ठिकाणी ठेवण्याचा नियम काही तिला पाळता येईना. कुठेही कोणतही पुस्तक ती ठेऊ लागली. त्यामुळे पुस्तकांचा क्रम बिघडू लागला. एखादं पुस्तक मिळायाला वेळ लागला. तेजामयी आणि बाबांनी पुन्हा एकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आई हो म्हणाली. पण पुन्हा येरे माझ्या मागल्या.

आता यावर काही उपाय केला नाही तर पुस्तकांची शिस्तच बिघडून जायची, आणि मग कोणतेही पुस्तक मिळायला कठीण व्हायचे हे बाबा आणि तेजोमयीस पटले. यावर काहीतरी उपाय करायलाच हवा, असं दोघांनांही वाटलं. पण काय करावं? हे त्यांना सूचेना. याचाच विचार करत असताना एके दिवशी तेजोमयीस एक कल्पना सूचली.                                                                                                   तिने बाबांना हळूच सांगितलं. अलेक्झांडर तिथे होताच. आईविषयी काहीतरी बोलणं चाललय हे त्याच्या लक्षात आल्याने त्याने कान टवकारले. पण त्याला काही यातलं कळलं नाही.

मात्र त्याला सारं काही कळलं, असं मजून  तेजोमयी अलेक्झांडरला म्हणाली, अलेक्झू यातलं आईला काहीही कळता कामा नये.

म्हणजे, काय कळता कामा नये? असे प्रश्नार्थक भाव अलेक्झांडरच्या चेहऱ्यावर उमटले. बाबांना हसू आलं.

बाबा कां हसलात? तेजोमयीनं विचारलं, अगं त्याला काहीही कळलं नाही आपण बोललेलं.

वा छान, नाही तर हा आईचा लाडोबा तिला जाऊन सावध करायचा. बाबा म्हणाले.

०००

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी घरी स्फोट झाला. आईची आरडाओरड सुरु झाली  होती. स्वयंपाक घरात तिने वेगवेगळया कपाटात ठेवलेल्या वस्तू विखुरल्या होत्या. त्यामुळे वस्तू शोधण्यात तिची पुरेवाट होत होती. तिचा आरडाओरडा बघून अलेक्झांडर, बाबा आणि तेजोमयी स्वयंपाक खोलिकडे धावले.

काय झालं असं ओरडायला? बाबांनी विचारलं.

काय झालं आई? तेजोमयी म्हणाली. अलेक्झांडर ही आईकडे बघू लागला.

काय झाल काय विचारता, हे तुमचंच कारस्थान दिसतय. या कपाटातल्या वस्तू त्या कपाटात. खालच्या कपाटातल्या वस्तू वरच्या कपाटात. हे चालल तरी काय? काय रे ठोंब्या, ही सगळी भानगड सुरु असताना तू काय झोपा काढत होतास की काय?आई अलेक्झांडरवर डाफरली. बिचारा आईच्या या अनपेक्षित रागावण्याने हबकून गेला. आपलं काय चुकलं हे त्याला कळेना. त्याचा चेहरा पडला.बाबांनी त्याला जवळ घेऊन थोपटलं.

अगं, त्या बिचाऱ्याला कां रागावतेस?आम्ही दोघांनीच काल रात्री तू झोपल्यावर हे सगळं केलं?

मला त्रास देण्यासाठी का?आई चिडून म्हणाली.

अगं, अशी चिडू नको, तिला पाणी देत तेजोमयी म्हणाली.

चिडू नको तर काय नाचू मी? आई गुस्स्यातच बोलली.

अगं तसं नाही,तुला आता कळलय ना, जागच्या जागी वस्तू असणं किती महत्वाचं आणि उपयुक्त असतं ते.

अहो, ते कधीचचं कळलं होतं.

हो हो तुझं म्हणणं बरोबरच आहे, पण हे तुला स्वयंपाक खोलितल्या कपाटातल्या वस्तूंचं कळलं होतं. पुस्तकाच्या कपाटासाठी मात्र तुला कळूनही वळत नव्हतं ना.

अच्छा तर यासाठी तुम्ही हा प्रताप केला वाटतं. आई जरा नरमाईनं म्हणाली.

हो गं आई,आता तरी तुला पटलं ना स्वयंपायक घरात जागच्या जागी जशा वस्तू हव्यात तसंच पुस्तकंही हवीत ते..तेजोमयी म्हणाली.

आईच्या चेहऱ्यावर हसू आलं. ते बघून मलूल झालेल्या अलेक्झांडरचा चेहरा खुलला.आई हसली म्हणजे प्रश्न मिटला, इतकं ज्ञान त्याला एव्हाना आलचं होतं.

सुरेश वांदिले

०००

 

कल्य

 

,पडू लागलो