तो घरी येतो तेव्हा..
कल्याणीस शेपूटवाले दोस्त खूप आवडायचे. त्यामुळे घरी एखादातरी असा दोस्त असावा यासाठी तिचा कायम हट्ट असायचा. मात्र सर्व हट्ट पूर्ण करण्यासाठी तत्पर असणारे आईबाबा, शेपूटवाल्या दोस्ताचा विषय आला की, त्याला बगल द्यायचे.
शेपूटवाले दोस्त आईबाबांना कां बरं आवडत नसावेत, हा प्रश्न कल्याणीस नेहमी पडायचा. एकदा तिने तसं दोघांनांही विचारलं.
तेव्हा, आम्हाला आवडत नाही, याचं स्वप्न तुला पडलं की काय? असं बोलून दोघांनीही कल्याणीची विकेट घेतली. तसं त्यांचं खरच होतं म्हणा. कारण, शेपूट वाल्या दोस्ताला घरी आणण्यासाठी दोघांचा विरोध होता. पण तो आवडत नाही, असं ते दोघेही कधी म्हणाले नव्हते. उलट ज्यांच्या ज्यांच्याकडे असे दोस्त असतील, तिथे या दोघांची चांगलीच गट्टी व्हायची त्यांच्याशी. दोघांनीही असेच मित्र-मैत्रिण जमवले होते. अशा मित्र-मैत्रिण-नातलगांच्या घरी काही कार्यक्रमासाठी गेले असताना इतर मंडळी गप्पा-टप्पा-हास्य -विनोद यात मग्न असताना आपले आईबाबा त्या घरातील शेपूटवाल्या दोस्ताशी खेळत असत, हे कल्याणीने अनेकदा बघितलं होतं. म्हणजे दुसऱ्याचा घरी असेल तो दोस्त, आणि आपल्या घरी आला तर शत्रू असं तर या दोघांना वाटत नसेल ना. असीही शंका कल्याणीस आली. ही शंका तिने आईबाबास बोलून दाखवली, तेव्हा दोघेही मनमुराद हसले. पण काही बोलले नाहीत.
या दोघांना सद्बुध्दी दे, असं घरच्या देवांना आणि जिथे जिथे आईबाबा जात त्या देवांना तेजोमयी साकडं घालायची. पण देवमंडळीही आईबाबांना सदबुध्दी देण्यासाठी अंमळ उशीरच करत होते. त्यामुळे नंतर तेजोमयीने देवमंडळींना सांगणं सोडून दिलं.
एकदा कसल्यातरी कामासाठी, ज्योतिष जाणण्याची कला अवगत असण्याचा दावा करणारे कल्याणीच्या बाबांचे मित्र देशपांडे काका घरी आले होते. बाबांचा त्यांच्या सांगण्यावर विश्वास होता. देशपांडे काकांनी तिघांचाही हात बघितला. सर्वांचं उत्तम भविष्य असल्याचं सांगितलं. आई आणि बाबांचे चेहरे खुलले. मात्र कल्याणीच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव दिसत नव्हते.
कां ग, तुला तुझं उत्तम भविष्य असल्याचा आनंद नाही कां झाला? देशपांडे काकांनी विचारलं.
कल्याणीने चेहऱ्यावर बळजबरीने हसू आणलं.
वा वा..बघ, तुला जी गोष्ट हवी आहे, ती तुझ्याकडे स्वत:हून चालत येते की नाही बघ, येत्या दोन तीन दिवसात..असं देशपांडे काका कल्याणीकडे बघत म्हणाले.
काय रे बरोबर सांगतोय ना मी..त्यांनी बाबांना विचारलं. प्रश्नच नाही. बाबा उत्साहाने म्हणाले. चहापाणी झाल्यावर, देशपांडे काका निघून गेले.
दुसऱ्या दिवशी भाजीपाला आणण्यासाठी आईसोबत कल्याणी बाजारात गेली. भाजीपाला घेऊन झाल्यावर घरी परत असताना, त्यांच्या पाठिमागे एक डॉगी येऊ लागला. आईला त्याची चाहूल लागताच, तिने त्याला हाटहूट करुन दूर हाकलले. काही क्षणासाठी तो थांबून जायचा. पण लगेच यांच्या पाठिमागे यायचा. असे करत तो कल्याणीच्या घरापर्यंत आला.
कल्याणीचं घर तळमजल्यावर होतं. आईने बेल दाबली. बाबांनी दार उघडलं. आई आणि कल्याणी घरात पाऊल टाकण्याच्या आधीच तो डॉगी घरात शिरला. या अनाहूत पाहुण्याच्या अशा जबरदस्तीच्या येण्यामुळे बाबा गोंधळून गेले. आईला संताप येऊ लागला. बिचारा तो कावरा बावरा होऊन इकडे तिकडे बघू लागला. कल्याणीला परिस्थिती लक्षात यायला एक क्षणही लागला नाही. ती डॉगीच्या सरळ गळ्यातच पडली.
अगं, तो रस्त्यावरचा कुत्रा दिसतो, अशी लगट करण बरोबर नाही. हाकलून दे त्याला. आई व बाबा एकाच वेळी म्हणाले.
अगं पण, त्याला कुठे मी आणलय घरी.तोच आलाय ना आपणहून. आजपर्यंत एखादा तरी डॉगी आला का आपल्या घरी असा आपल्यासोबत?
अगं काहीबाही तर्कट लावू नकोस, आई रागावत म्हणाली.
अगं, याच्या येण्यामागे निश्चित कारण आहे.
कोणतं कारण? ते तुला कसं कळलं? बाबांनीविचारलं.
अहो, परवा देशपांडे काका आले होते, तेव्हा ते मला काय म्हणाले, जरा आठवाना?
काय म्हणाले?
तुला जी गोष्ट हवी आहे नाही, ती तुझ्याकडे स्वत:हून चालत येते की नाही बघ,येत्या दोन तीन दिवसात.. कल्याणीनं सांगितलं.
देशपांडे काका जे सांगतात ते खरच ठरतं ना बाबा, असं तुम्हीच म्हणता. मला शेपूटवाला दोस्त हवा होता, तो आला ना स्वत:हून चालत.त्याला कसं हाकलणार आपण. देशपांडे काकांचं सांगणं खोटं ठरवायचं का तुम्हाला?तेजोमयी बाबांकडे बघत म्हणाली. या प्रश्नाचं उत्तर बाबांकडे नव्हतं. तर आईने कप्पाळावर हात मारुन घेतला.
कशामुळे कां होईना आपल्याला शेपूटवाला दोस्त मिळाला, या आनंदात कल्याणीने एक छानसी गिरकी घेतली.
सुरेश वांदिले
