(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

खोटं खोटं खरं की खरं खरं खोटं?

कल्याणी, तेजोमयी, टिल्लू, पिल्लू, टिनी, प्रदीप ही टोळी परवा मारोतीरायाच्या मंदिरात जमली. मारुतीरांना नमन झालं त्यांनी गदा हलवून आशीर्वाद दिल्याची खात्री केल्यावर सर्व मंडळी मंदिरातील बाकड्यांवर जाऊन बसले.

गदा हलवून आशीर्वादाची खात्री मारुतीराया स्वत: करत नसत. टोळीतल्या तेजोमयीस तसा प्रत्येक वेळी भास होतो, असं तिचं म्हणणं. तिने टोळीला सांगितलं की त्यांचं समाधान व्हायचं. मारुतीराया गदा हलवून आशीर्वाद देतात आणि तेजोमयी जे सांगत ते सत्यच यावर टोळीचा शंभर टक्के विश्वास असल्याने, कधी कुणी यावर प्रश्न ब्रिश्न विचारले नाहीत.

तर, आज टोळी बाकड्यांवर बसल्यावर प्रदीप अचानक बोलून गेला,

आपण खरोखरच खोटं बोलत नाही का राव, याचा शोध घेतला पाहिजे..

म्हणजे? टोळितील इतर सदस्य एकमुखाने म्हणाले.

पदोबा, तुझ्या डोक्यात काहीबाही येत बाँ.टिल्लू म्हणाला.

काही येतं, पण बाही येत नाही.प्रदीप मख्ख चेहऱ्यानं म्हणाला.

काहीही हं,पद्या. तेजेामयी म्हणाली.

अरे, विनोद बाजूला ठेवा, पदोबा म्हणतो त्यावर विचार करायला का हरकत आहे. आपण खरच खोटं बोलत नाही का? कल्याणी म्हणाली.

खऱ्याचं खोटं नि  खोट्याचं खरं मारुतीरायांच्या समोरच करायचं काय? पिल्लू म्हणाला.

त्यात काय झालं. त्यांना सारचं कळतं. त्यांना सॉरी म्हंटल की ते माफ करतात आपणास.प्रदीप म्हणाला..

पण, आपल्या आईबाबांचं तसं नाही ना.

म्हणजे?

समजा आपली काही चूक झाली.ते जसच्या तसं सांगितलं तर बहुतेक वेळा त्यांचं रागावणंच मिळणार, बरेचदा धपाटा सुध्दा.बरोबर ना..

म्हणून मग आपण खरं आणि खोटं या मधलं सांगायचा प्रयत्न करतो. पण ते आपली चोरी लगेच पकडतात. मग आपण जे नाही ते म्हणजे खोटं बोलतो. तेजोयमी सविस्तर बोलली.

म्हणजे खोट्याची गंगा आधी खऱ्यापासूनच सुरु होते म्हणायची.

अगदी बरोबर. याचा अर्थ आपल्यापैकी प्रत्येकजण कधीना कधी खोटं बोलतच असतो.

कधीना कधी नव्हे. बरेच वेळा. निरुपद्रवी असलं तरी सुध्दा.

पण खोटं बोलणं ही तर वाईट सवय झाली. आपण तर शहाणी मुलं आहोत. आज्ञाधारक. कल्याणी म्हणाली.

मग आपल्या शहाणणावर किंवा आज्ञाधारकेवर आईबाबांना शंका कां बरं येते? तेजोमयीनं विचारलं.

बरोबर बोललीस तेजो तू. आईबाबांच्या शंका-कुशंकेमुळेच बरेचदा आपण खोटं बोलतो.

आपण विनाकारण चूक करत नाही हे त्यांनी समजून घेतलं, त्यावर फार रागावले नाही रागावले नाहीत, समजावून सांगितलं तर आपणसुध्दा कशाला खोट्याच्या मार्गाला जाणार, नाही का?

पण मोठ्यांचं काहीच कळत नाही बाँ.प्रदीप म्हणाला.

हो बाँ.मारुतीराया म्हणाले. ते टोळीच्या चर्चेत कधी सहभागी झाले, हे कुणालाही कळलच नाही.

मारुतीराया तुम्ही कधी आलात इथे.तेजोमयीनं आश्चर्यानं विचारलं..

अगं मी मघाच आलो, तुम्ही सर्वजण खोट्याच्या खऱ्या चर्चेत इतके गुंग झाला होतात की तुम्हाला कळलच नाही.

अरे वा, मग तुम्हाला काय वाटतं या चर्चेविषयी.

मला वाटतं मुलांनो, तुमचे आईबाबा कधी काळी मुलं होती हे कां विसरुन गेली, हे मला समजत नाही.

म्हणजे हो मारुतीरायाच? तुम्हाला काय म्हणायच.

अरे, ती जेव्हा तुमच्या सारखी होती, तेव्हा त्यांना कधीकधी खोटं बोलावं लागतच होतं ना. त्यांच्या आईबाबांचा राग टाळण्यासाठी, मारापासून वाचण्यासाठी ते असं करायची. त्यांना काही खोटं बोलण्याची हौस नव्हती. पण त्यांच्या आईबाबांनी तेव्हा समजून घेतलं नाही. आता ते आईबाबा झाले तर तुम्हाला समजून घेत नाही..

वा वा, मारुतीराया तुम्ही अगदी आमच्या मनातलं बोललात हो.

खोट बोलणं वाईट असल्याचं तुम्हाला सांगतात, स्वत: मात्र इकडे-तिकडे जमेल तेव्हा सराईतपणे खोटं बोलत राहतात. मारुतरीराया म्हणाले.

काय सांगता काय? प्रदीपने आश्चर्याने विचारलं. इतरांनीही भुवया उंचावला.

अरे बाबांनो, मी असं काही म्हणालो हे घरी सांगू नका, नाहीतर ते माझीच गदा पळवून नेतील. मारुतीराया हसून म्हणाले आणि आपल्या जागेवर पुन्हा स्थानापन्न झाले..

०००

टोळी थोडावेळ मारुतीरायाच्या मंदिरात थांबली. खोटं बोलणं हे चूकच असल्याचं सर्वांचं एकमत झालच होतं. पण गरजेप्रमाणे खोटं बोललं तर चालू शकतं का?असं  मंदिरातून निघता निघता तेजोमयीनं मारुतीरायांना विचारलं. त्यांनी यावर काहीच उत्तर दिलं नाही.आईबाबांनाच विचारु या आपण, असं टिल्लू म्हणाला.

धाडख्‍ असा कसला तरी आवाज आला. मारुतीरायांनी स्वत:च्या कपाळावर गदा मारुन घेतल्याचं त्यांना दिसलं.यावर हसाव रडावं की गदा मारुन घेणं म्हणजे उत्तर समजावं.यावर विचार करत टोळी घरी परतली.

सुरेश वांदिले