(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 ससा आणि बेडूक 

एकदा एक ससोबा नदीजवळील मऊशार गवत खात असताना, नदिच्या पाण्यातून काही बेडकं बाहेर आलीत. इकडे तिकडे बघत असताना त्यांना ससा दिसला. त्याबरोबर त्यातील एक बेडूक सोडून इतरांनी पाण्यात उड्या घेतल्या. क्षणार्धात ते दिसेनासे झाले.

हे सर्व ससा बघत होता. आपण दिसल्याबरोबर फक्त एक सोडून सर्वांनी पाण्यात कां बरं उड्या मारल्या असतील? आपली भीती वाटली असेल का त्या सर्वांना? मग या बेडकाला कां बरं वाटली नसेल भीती? असे प्रश्न सशाच्या मनात निर्माण झाले.

आपल्या मनातील शंका त्या बेडकास विचारावी असं ससोबास वाटलं. पण विचारायचं कसं हा प्रश्न होता. आपण त्याच्याकडे गेलो तर तोही पाण्यात उडी मारुन निघून जायचा. ससा मनात म्हणाला. तो विचार करत बेडकाकडे एकटक बघत राहिला.

बेडूकही सशाकडे एकटक बघत होता. हा ससा आपल्यावर हल्ला करेल म्हणून आपले सवंगडी लगेच माघारी निघून गेले. पण इतका वेळ होउुनही हा ससा जागचा हलला नाही. आपल्यावर हल्ला करण्याचे कोणतीही हालचाल त्याच्याकडून घडत नाही. आम्ही समजत होतो तसं हा भीतीदायक दिसत नाही. खरच असं असेल का? असा विचार करत बेडूक सशाकडे एकटक बघत होता. असा बराच वेळ गेला. दोघांनीही काहीच हालचाल केली नाही.

एकाएकी ससा जोराने हसला..

हे बघून बेडकास आश्चर्य वाटलं. काहीतरी प्रतिसाद द्द्यायला हवा म्हणून मग तोही हसला. दोघेही हसत हसत एकमेकांच्या जवळ आले आणि बराच वेळ हसत राहिले.

थोड्योवळाने बेडकाने सशाला विचारलं, काय रे ससोबा, कशासाठी हसतोस तू इतका?

बेडकोबा, तू कशासाठी हसतोस बॉ?

अरे, तू हसलास म्हणून मी हसलो.बेडूक सशाला म्हणाला.

हो का, अरे, तू काहीच करत नव्हतास ना  म्हणून मी हसलो. ससा बेडकास म्हणाला.

म्हणजे गंमतच म्हणायची. बघ हसण्यामुळे आपण एकमेकांच्या जवळ आलो. बोलू लागलो. माझ्या मनात असलेली तुझ्याबद्दलची भीती गेली.बेडूक सशाला म्हणाला.

अरे, तुझे मित्र कां बरं मी दिसताच नदीत उडी मारुन निघून गेले? सशाने बेडकास विचारलं.

अरे, तू  खाशील अशी भीती वाटते बेडकांना.

मग, तुला नाही का वाटली? सशाने बेडकास विचारलं.

वाटली होती. पण मग विचार केला, कुणीतरी सांगितलं म्हणून आपणास ससोबाची भीती वाटते. पण ते खरं की खोटं याची खातरजमा नको का करायला? म्हणून मी मागे राहिलो. बेडूक सशाला म्हणाला.

पण समजा मी तुझ्यावर हल्ला केला असता तर?

तर, माझ्या मित्रांची भीती खरी ठरली असती. म्हणून मी मागचे दोन पाय पाण्यातच टाकून होतो. तू हल्ला केला असतास तर मी लगेच वळून पाण्यात शिरलो असतो. पण बघ तसं काही झालं नाही. तू मला काहीही केलं नाहीस. सशाची भीती, आम्ही बेडकं उगीचच बाळगत होतो, याची खात्री पटली. तुझ्या रुपाने मला एक नवा मित्र मिळाला. थोडी सावधगिरी बाळगली, स्वत: खात्री केली की असा फायदा होता बघ. बेडूक म्हणाला.

सशाला आनंद झाला.त्या ने बेडकास पाठिवर बसवलं आणि सगळया वनाची भ्रंमती करुन आणली. बेडकाने सशाला, नदीचे पाणी ज्या ठिकाणी सर्वात गोड असते ते ठिकाण दाखवलं. ते पाणी पिऊन ससा तृप्त झाला.

सुरेश वांदिले