(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

आनंदाचा ठेवा

तेजोमयीच्या आजोबांच्या शेतात मोठी विहीर होती. त्यामध्ये कासव, रोहू कटला, मृगळ असे मासे त्यांनी टाकले होते. आजोबांच्या घरी कुणी पाहुणे आले की, त्यांच्या आवडीनिवडीनुसार आजोबा माशांची मेजवाणी करत.

सतत आपल्याला खाणाऱ्या आणि इतरांनांही खाऊ घालणाऱ्या आजोबांचा काही माशांना एकदा खूप राग आला. एका निवांत दिवशी या माशांची पाण-बैठक विहिरीत झाली. त्यांनी बरीच चर्चा केली. या आजोबांना धडा शिकवायला हवा. त्यांना पाण्यात ओढून आणून त्यांना बुडवावे, असं एक मासा म्हणाला. त्यांच्यावर आक्रमण करुन त्यांचा प्राणच घ्यायला हवा, दुसरा मासा म्हणाला. या आजोबांना दुसऱ्यांच्या जीवाचे काही मोलच नाही, तिसरा मासा म्हणाला. आपण देवाकडे जाऊन या आजोबांची तक्रार करायला हवी, चौथा म्हणाला. या आजोबांना चांगली शिक्षाच करा असं आपण देवाला सांगू, पाचवा म्हणाला. आमच्या जीवावर यांना मिळणारा आनंद आता नाही मिळू द्यायचा आम्हाला, सहावा म्हणाला. आपल्यावर हे आजोबा अन्याय करतात हे देवाला कसं बरं दिसत नसेल रे,सातवा म्हणाला. आपलं काही महत्वच नसेल तर देवानं आपली निर्मिती कां बरं केली? आठवा म्हणाला. म्हणे प्राणीमात्रावर प्रेम करा, दया करा, असं हेच आजोबा त्यांच्या तेजोमयी या नातिनीस परवा सांगत होते ना. मग आम्ही काय प्राणी नाहीत की काय? नववा म्हणाला. आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा बदला आपण घेतलाच पाहिजे, दहावा म्हणाला.

घेतलाच पाहिजे,घेतलाच पाहिजे अशी इतर माशांनी साद दिली.

या तरुण माशांची ही बडबड ऐकणारा ज्येष्ठ मासा, बदला घेतला पाहिजे या घोषणेवर हसला.या हसण्यामुळे तरुण माशांचे लक्ष त्यांच्याकडे गेले.

अहो, काकाश्री तुम्ही कां हसतात आमच्यावर? एक तरुण मासा त्यांना नाराजिने म्हणाला.

अरे तुम्ही बदला कुणाचा घेणार? काकाने विचारलं.

कुणाचा म्हणजे? आपल्याला खाणाऱ्या आणि इतरांनाही खाऊ घालणाऱ्या आजोबांचा.

अरे मुलांनो, असा आततायी विचार करण्याआधी तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तर द्या बघू.काका म्हणाले.

विचारा..विचारा सर्व तरुण मासे एकसुरात म्हणाले.

तुम्ही कोण आहात?

अहो आजोबा, हा काय प्रश्न झाला.आम्ही मासे आहोत.

तुमचं वैशिष्ट्य काय?

काय म्हणजे?आम्ही पाण्यात राहतो.

हे काही महत्वाचं वैशिष्ट्य नाही. आपल्यासारखे अनेक जलचर पाण्यात राहतात.

मग, तुमच्या मते आपलं वैशिष्ट्य काय?

अरे मुलांनो, मनुष्यप्राणी आपणास केवळ पोट भरण्यासाठी आपल्याला खात नाहीत. त्यांना आपण अपार आनंद देतो. शिवाय आपल्यामध्ये असणारे प्रथिनं आणि इतर अन्न घटक या मनुष्यप्राण्यास अधिक सक्षम बनवतात. हे आपलं वैशिष्ट्य आणि महत्व. या महत्वामुळेच आपण मनुष्यप्राण्याला आवडतो. त्याच्या आपण उपयोगी पडतो, त्याला आनंद देतो. त्याला सामर्थ्यवान करतो. म्हणजे आपण इतक्या तऱ्हेने उपयोगी पडतो. इतरांच्या उपयोगी पडण्याचं वरदान आपणास देवानं दिलं आहे.जो इतरांस उपयोगी पडतो तोच देवालाही आवडतो.

अहो काकाश्री, असं काहीबाही तुम्ही आम्हाला सांगू नका. एक दोन तरुण मासे रागावून म्हणाले.

ठीक आहे तर ,मग जा देवाकडे नि सांगा त्याला तू दिलेलं वरदान काढून घे म्हणून. अरे हे वरदान आहे म्हणून मनुष्यप्राण्याचा पोटात जातो. म्हणून आपली संख्या मर्यादित राहते. समजा उद्या माणसांने मासे खाणेच बंद केले तर आपली संख्या किती प्रचंड वाढेल विचार करा. मग आपणच एकमेकांना ठार करु, लचके तोडू.इतरांच्या उपयोगी पडणारे ऐवजी भांडकुदळ अशी आपली ख्याती होईल, तसच महत्वही कमी होईल.विचार करा जरा.असं बोलून काकाश्री पाण्यात आणखी खोल गेले.

तरुण मासे विचार करु लागले. तेवढ्यात वरुन एक गळ आला आणि त्यात हे मासे अलगद सापडले.

काय हे आजोबा. आपणास साधा विचार करण्याचीही उसंत देत नाही बाँ..असं म्हणून त्यांनी डोळे मिटून घेतले.

सुरेश वांदिले