(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

मर्चंट नेव्ही

मर्चंट नेव्हीच्या क्षेत्रात, व्यापारी व प्रवासी जहाजाचे संनियंत्रण करणाऱ्या कप्तानाचे महत्व फार मोठे असते. अशा जहाजाची सुरक्षा – देखभाल- दुरुस्ती आणि सुव्यवस्थित व्यवस्थापनाचे कौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांना चांगली मागणी आहे.

इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीने बी.टेक इन मरिन इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम युनिव्हर्सिटीच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट, कोलकता, चेन्नई आणि विशाखापटट्णम या कॅम्पसमध्ये शिकवला जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा आहे. या अभ्यासक्रमात मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि मरिन इंजिनिअरिंगचे सैध्दांतिक  आणि प्रात्यक्षिक ज्ञान प्रदान केले जाते. याद्वारे व्यापारी जहाजाच्या यंत्रसामग्रीची हाताळणी , देखभाल आणि दुरुस्ती करणे सुलभ जाते. जहाजाची यंत्रसामग्री, इंजिन यांची देखभाल दुरुस्ती, जहाजाचे सुरळित कार्यान्वयन करणे, अशासारखी कामे मरिन इंजिनीअरला करावी लागतात. त्यामुळे ही यंत्रणा सुरक्षित आणि सुव्यस्थितीत ठेवण्याचे कौशल्य आणि ज्ञान असणे गरजेचे आहे. ही गरज, बी.टेक इन मरिन इंजिनिअरिंग  हा अभ्यासक्रम पूर्ण करतो. करिअर संधी

हा अभ्यासक्रम केल्यावर संबंधित उमेदवाराचे करिअर, मर्चंट किंवा व्यापारी जहाजावर ज्युनिअर इंजिनीअर म्हणून सुरु होते. या जहाजावर विशिष्ट कालावधी घालवल्यानंतर आणि डायरोक्टोरेट जनरल ऑफ शिपिंग, यांच्या वतिने घेण्यात येणारी परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर हा अभियंता, जहाजाचा मुख्य अभियंता बनण्यासाठी पात्र ठरतो. प्रशिक्षणार्थी अभियंत्याला प्रारंभी  २५ ते ३५ हजार रुपयांच्या दरम्यान वेतन मिळते. त्यानंतर सहा महिन्याचा प्रत्यक्ष जहाजावरील अनुभव आणि जहाजावरील अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्याला चौथा किंवा तिसरा अभियंता म्हणून काम करावे लागते. यावेळी त्याला दरमहा एक लाख ते दीड लाख रुपयांचे वेतन मिळू शकते. यानंतर १२ महिन्यांचे प्रत्यक्ष जहाजावरील कार्य आणि काही अभ्यासक्रम केल्यावर व अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर दुसरा अभियंता म्हणून पदोन्नती मिळू शकते. यावेळी त्याला दरमहा दोन ते चार लाख रुपयांचे वेतन मिळते. यानंतर १८ महिन्यांचे प्रत्यक्ष जहाजावरील कार्य आणि काही अभ्यासक्रम व अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती मिळू शकते. यावेळी त्याला दरमहा दोन ते चार लाख रुपयांपेक्षा अधिक वेतन मिळते.

काय शिकाल ?

 या अभ्यासक्रमात ढोबळमानाने पुढील विषय घटकांचा समावेश करण्यात येतो- () ऑफिसर लाइक क्वालिटिज, () ॲप्लाइड मेकॅनिक्स, () ॲप्लाइड थर्मोडायनॅमिक्स, () वर्कशॉप टेक्नॉलॉजी, () ॲप्लाइड इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रिकल मेझरमेंट्स, () इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, () मॅथेमॅटिक्स, () कम्युनिकेटिव्ह इंग्लिश, () इलेक्ट्रॉनिक्स, (१०) मटेरिअल सायन्स, (११) इलेक्ट्रिकल मशिन, (१२) जिओमेट्रिकल आणि इंजिनिअरिंग ड्राईंग, (१३) ॲप्लाइड थर्मोडायनॅमिक्स, (१४) थिअरी ऑफ मशिन, (१५) स्ट्रेन्ग्थ ऑफ मटेरिअल, (१६) इलेक्ट्रिकल मशिन, (१७) मशिन आणि मरिन ड्राईंग, (१८) शिप कंस्ट्रक्शन, (१९) फ्ल्युइड मेकॅनिक्स, (२०) मरिन ऑक्झिलरी मशिन, (२१) मरिन इंटरनल कम्बशन इंजिन, (२२) एलिमेंट्री डिझाइन, (२३) शिप स्टॅबिलिटी, (२४) मरिन ऑक्झिलरी मशिन, (२५) मरिन बॉयलर आणि स्टिम, (२६) मरिन मशिन आणि सिस्टिम डिझाइन, (२७) मरिन इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, (२८) शिप फायर प्रिव्हेंशन, (२९) कमर्शिअल जिओग्रॅफी, (३०) मरिन कंट्रोल इंजिनिअरिंग आणि ऑटोमेशन, (३१) सिमॅनशीप, (३२) मेंटनन्स, रिपेअर ऑफ मशिनरी, (३३) टँकर ऑपरेशन, (३४) इंजिन रुम रिसोर्स मॅनेजमेंट आणि लिडरशीप

अर्हता-

() मरिन इंजिनिअरिंग आणि नॉटिकल सायन्स हे अभ्यासक्रम करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. कारण या उमेदवारांना सागरी पर्यावरणात काम करायचे असते. हे पर्यावरण अत्यंत बेभरवशाचे असून त्यात कोणत्याही क्षणी बदल घडण्याची शक्यता कायम लक्षात ठेवावी लागते.

सागरी प्रवास हा मोठ्या कालावधीचा असतो. त्यामुळे अनेकदा बरेच दिवस वा महिने सागरावर राहावे लागते. त्यादृष्टिने शारीरिक क्षमतेची मानके डायरेक्टोरट जनरल ऑफ शिपिंग यांनी निर्धारित केली आहेत. या मानकांच्या विस्तृत माहितीसाठी संपर्क संकेतस्थळ– http://www.dgshipping.gov.in/Content/MaritimeHealthBranch.aspx.

() १२ वी विज्ञान परीक्षेत, भौतिकशास्त्र,गणित आणि रसायनशास्त्र या विषयासह ६० टक्के गुण मिळणे आवश्यक. १० वी आणि १२ वीमध्ये इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना गुणांमध्ये एकूण गुणांमध्ये ५ टक्के सूट.  इंग्रजी  विषयासाठी ही अट लागू नाही.

मुंबई कॅम्पस

इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत कार्यरत असणारी मुंबई पोर्ट ट्रस्ट कॅम्पसमधील, लाल बहादूर कॉलेज ऑफ ॲडव्हान्स्ड मेरिटाइम स्टडीज ॲण्ड रिसर्च, ही संपूर्ण दक्षिण – पूर्व आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट संस्था समजली जाते. यामध्ये  मरिन इंजिनिअरिंग आणि नॉटिकल सायन्स या विषयातील अतिप्रगत मास्टर्स अभ्यासक्रम चालविले जातात. असे अभ्यासक्रम चालवणारी ही एकमेव संस्था आहे. या संस्थेत पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मरिन इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम करता येतो. हा अभ्यासक्रम मेकॅनिकल  इंजिनिअरिंग आणि नॅव्हल आर्किटेक्चर या विषयातील पदवीधरांना करता येतो. हा अभ्यासक्रम केल्यावर ते मरीन इंजिनीअर होण्यासाठी पात्र ठरतात.

संपर्क – डायरेक्टर इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी, मुंबई पोर्ट ट्रस्ट कॅम्पस, हे बंदर रोड, मुंबई-  ४०००३३,दूरध्वनी-  ०२२-२३७२३५७७, फॅक्स – २३७५३१५१

प्रवेश प्रक्रिया

  बी.टेक इन मरिन इंजिनिअरिंग,बी.एस्सी इन नॉटिकल सायन्स आणि डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स्‍ या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी मे महिन्यात कॉमन एन्ट्रन्स टेस्ट देशभरातील विविध शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि पुणे या शहरांचा समावेश आहे.

या चाळणी परीक्षेत  बहुपर्यायी वस्तुनिष्ट स्वरुपाचे २०० प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांमध्ये १२ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित इंग्रजी, सामान्य कलचाचणी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांचे प्रश्न विचारले जातात.पेपरचा दर्जा हा १२ वीचा असतो. त्यामुळे १२वीचा अभ्यास, संकल्पना समजून उत्तम पध्दतीने केलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा कठीण जात नाही.

एम.टेक अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत १२० बहुपर्यायी वस्तुनिष्ट पध्दतीचे १२० प्रश्न विचारले जातात. यामध्ये इंग्रजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा नॅव्हल आर्किटेक्चर किंवा मरिन इंजिनिअरिंग किवा सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयातील पदवीस्तरीय अभ्यासक्रमाचे प्रश्न असतात. निगेटिव्ह गुण नाहीत.