(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

पराक्रमी पॉल

सुटिचा दिवस आला की तेजोमयीचे बाबा घरात बंद.म्हणजे बाहेर पडायचं नाव नाही.समजा चुकूनमाकून बाहेर पडायचं असेल तर गाडी काढणार किंवा ऑटो किंवा टॅक्सी करणार.पैदल चालण्याचा त्यांना फार म्हणजे फार कंटाळा.

तेजोमयीस नेहमी वाटायचं की सुटिच्या दिवशी सकाळी सकाळी किंवा पहाटेच बाहेर पडावं आणि जितकं चालता येईल तितकं चालत जावं.तिने बरेचदा बाबांना विचारलं.पण त्यांची नकारघंटा कायम.

आईचा तर काय प्रश्नच नव्हता,पहाटेची साखरेची झोप म्हणजे तिची सगळयात आवडती.त्या झोपेत कुणी व्यतय आणला की ती त्याला सोडत नसे.

आता राहिला अलेक्झांडर(द डॉगी).तो कधीही तयार असायचा. पण त्याला आईकडून परवानगी हवी असायची.तू परवानगी माग, मी नक्की येईन असं त्याने तेजोमयीस त्याच्या पध्दतीने सुचवून बघितलं.शेवटी एकदा तेजोमयीने आईस विचारलचं. जा की मी कुठे नाही म्हणतेय, मात्र बाबांना सोबत घेऊन जा,आईने परवानगी देताना पेचही टाकला.

बघ,अलेक्झू आईने हो ही म्हंटलं नाही आणि नाहीही म्हंटलं नाही..तुमचं तुम्ही ठरवा असं तिला म्हणायचय..तेजोमयी अलेक्झांडरला म्हणाली.यात आईचा उल्लेख आल्याने अलेक्झांडरने काहीही प्रतिक्रिया दिली नाही.तो ढिम्म राहिला.

बरं बरं कळलं, हिज मदर्स व्हाईस..असं अलेक्झांडरला म्हणून तेजोयमी विचार करु लागली. बाबांना कसं बर राजी करायचं याचा विचार ती करु लागली.काही सुचत नसल्याने सोफ्यावर पडलेल्या एका मासिकाकडे लक्ष गेलं. पान उलटत असताना तिचं लक्ष एका चित्राकडे गेलं. त्याखाली लिहिलं होतं,पायी जग पालथं घालणारा पत्रकार..

पायी चालणे, एवढ्या दोन शब्दाने तेजोमयीची उत्सुकता चाळवली गेली. तिने तो लेख एका दमात वाचून काढला. लेखातल्या नायकाचं नाव होतं,पॉल सॅलोपेक. तो पत्रकारिता करतो.पण शक्य असेल तिथे तो पायीच जातो.

एकदा त्याच्या मनात पैदल जगभ्रमंतीची कल्पना आली.त्यासाठी त्याने इथिओपियामधील बौरीगाव ते दक्षिण अमेरिकेतील तिएरा देल फुएगो हे बेट अशा दोन टोकाच्या ठिकाणी जायचं ठरवलं.बौरी गाव आफ्रिका खंडात तर देल फुयगो बेट अर्जेंटिना देशाच्या दक्षिणेला.दोन्ही ठिकाणांचा तसा परस्पर संबंध नाही.पण बौरी गावातून ६०-७० वर्षांपूर्वी अष्मयुगीन काळातील आपले पूर्वज इथून बाहेर पडले आणि पृथ्वीच्या इतर भागात पोहचले.असं या गावात सापडलेल्या अवशेषातून सिध्द झालं. बौरी गावातले आपले पूर्वज देय फुयगो बेटावर आले आणि त्यांची भटकंती संपली कारण पुढे काही जमीनच नव्हती.म्हणून पॉलने ठरवलं या दोन ठिकाणांना जोडणारा भूभाग पैदल चालत बघायचा.

२०१३साली तो या मोहिमेवर निघाला सुध्दा.चालत चालत त्याने हजारो मैलाचा परिसर बघितला.वाटेत असंख्य नदी-नाले-समुद्र-वन्यप्रदेश-डोंगराळ प्रदेश-दऱ्या खो-या-ज्वालामुखी,वाळवंट लागले.शेकडो प्रकारची माणसं भेटली.आधुनिक जगाचा काहीही गंध नसणारी माणसं भेटली.गोना नावाच्या ठिकाणी २६ वर्षापूर्वीची स्वयंपाकासाठी लागणारी शेकडो उपकरणं सापडली.ही उपकरणं आणि साहित्य बघून पॉलने त्या ठिकाणाचं नामकरण ,जगातलं पहिलं स्वयंपाकघर असं केलं.लेबॅनॉन -सिरिया-इराक-पॅलेस्टाईन आणि जॉर्डन या देशातून प्रवास करताना त्याला अनेक ठिकाणी लाखो हजारो वर्षांपूर्वी कोरलेले शेकडो दगड,दगडावरील चित्रे,विविध प्रकारच्या खुणा आढळून आल्या.संशोधकांनी त्याचा अभ्यास केला असता त्यांना विविध काळात कसं कसं जीवन माणूस जगत होता,याची बरीच माहिती मिळाली.आदी मानवापासून ते रोमन सम्राटापर्यंची चित्रे या ठिकाणी आढळली.पॉलला ते जगातलं सर्वात मोठ कलाकेंद्रच वाटलं.वादि-नातूफ या ठिकाणी पॉलला गुहा आढळल्या.संशोधकाच्या मते पहिल्यांदा मानवाने ज्या ठिकाणी राहायला सुरु केली,त्याच या गुहा.अझरबैजानमधील गोबुस्तान राष्ट्रीय पार्कमध्ये पॉलला प्रागऐतिहासिक काळातील चुनखडीच्या दगडावर कोरकेली रानटी प्राण्यांची सहा हजारांहून अधिक चित्रे बघायला मिळाली.याच ठिकाणी चुनखडीचे पोकळ दगडही मिळाले.त्यावर लहान दगड मारला तर त्यातून ड्रमचा आवाज येतो.प्राचीन काळी दूरपर्यंत संदेश पोहचवण्यासाठी या पोकळ दगडातून निघणाऱ्या आवाजाचा उपयोग होत असावा,असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

तर, असा हा पॉल गेल्या पाच सहा वर्षापासून पायी पायी चालत अनेक देशात गेला.त्याला आणखी ३६ देशातून जायचेय.करोनामुळे त्याची ही पैदल भ्रमंती थांबलीय..असं त्या लेखाचं शेवटचं वाक्य होतं..

पॉलच्या या चित्तथरारक पैलद प्रवासानं तेजोमयी थक्कच होऊन गेली.आपसुकच तिच्या तोंडून कुठे तो पराक्रमी पॉल आणि कुठे आमचे पुचाट पप्पा असं निघून गेलं..तिच्या बाजूला डोळे मिटून पडलेल्या अलेक्झांडरच्या कानावर हे शब्द पडताच कान टवकारात ,काय हे तुझं बडबडणं असे काहीसे भाव अलेक्झांडरच्या चेहऱ्यावर उमटले.

तेव्हा तेजोमयीने तिला जमेल तसं पॉलची गोष्ट अलेक्झांडरला सांगितली.अलेक्झांडरनेही मन लावून ही गोष्ट ऐकली.हा कथाकथनाचा कार्यक्रम सुरु असताना बाबा दुसऱ्या सोफ्यावर कधी येऊन बसले हे दोघांच्याही लक्षात आलं नाही.

तेजोमयीचं कथन संपल्यावर बाबांनी वा वा वा म्हणत टाळ्या वाजवल्या..तेजोमयी आणि अलेक्झांडरने बाबांकडे बघितलं..

बाबा, तुम्ही पूर्ण गोष्ट ऐकली का..तेजोमयीने त्यांना विचारलं..

हो हो..मस्त रंगवून सांगतेस हं गोष्ट तेजो तू..यापुढे कथाकथनाच्या कार्यक्रमात भाग घेत जा बरं का..

हो हो बाबा नक्कीच घेईन..पण बाबा एक विचारायचं होत..विचारु का?

अगं विचार की,त्याला कशाला हवी परवानगी..

बर तर..प्रत्येक गोष्टीचं एक ताप्तर्य असतं..हो ना..

हो हो अगदी बरोबर..बाबा म्हणाले..

मग मी अलेक्झांडरला सांगितलेल्या गोष्टीचं ताप्तर्य काय?

अगं चालणाऱ्यांना नव्या नव्या गोष्टी दिसतात..हे ते ताप्तर्य..बरोबरना रे अलेक्झू..बाबा त्याच्याकडे बघत म्हणाले.अलेक्झांडरने मान आणि शेपूट दोन्ही हलवलं. बाप लेकीचं प्रश्नोत्तर कशासाठी चाललीत बुवा,असा प्रश्नही त्यांच्या चेहऱ्यावर उमटला. त्यामुळे तो कधी तेजोमयीकडे तर कधी बाबांकडे आलटून पालटून प्रश्नांकित भावाने बघू लागला..

तर..बाबा तुम्ही म्हणता तसं,चालणाऱ्यास नव्या नव्या गोष्टी दिसतात हे तात्पर्य आपण कां अंगिकारत नाही…तेजोमयीनं विचारलं.ते ऐकून बाबा चपापलेच.

जाऊ दे गं ते मी चुकून बोललो असेन…बाबा ओशाळल्यागत म्हणाले..

काय हे बाबा..तुम्हाला चालण्याचा इतका कां कंटाळा येतो.आपणास कुठे जग बघायला जायचं.आपण आपल्या शहरातच तर जाऊ या ना पैदल पैदल..पॉलला जशा नव्या नव्या गोष्टी दिसल्या तशा आपल्याला आपल्या शहरातही नवीन गोष्टी दिसतील ना..

काही नाही गं आपल्या शहरात नवं..उलट आपले पाय दुखतील.गुडघे दुखतील..

अहो बाबा,तुम्ही न बघताच असं काय म्हणू शकता..

या प्रश्नावर काही बाबा उत्तर देऊ शकले नाही.ही चर्चा सुरु असताना कधीतरी येऊन बसलल्या आईने टाळया वाजवल्या..

तुला काय जात टाळया वाजावायला..माझे पाय दुखतील.तू आरामात पडली राहशील घरी पाहटेचे स्वप्न बघत..आईकडे बघत बाबा किंचित रागाने म्हणाले..

अहो तुम्ही माझ्यावर कां चिडता.आपल्या लाडक्या लेकिला थेट सांगाना.पैदल चालायचं नाही म्हणजे नाही..आई म्हणाली..

बाबांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

मग मागा तुम्हाला काय व्हायचं पराक्रमी पॉल की,फुस्स पापा..तेजोमयी हळूच म्हणाली.अलेक्झांडरने हलकेच शेपूट हलवून आपल्याला जणू सारं काही कळलं हे दर्शवलं..

शहाण्या, फारच आगावू झालास हं,असं म्हणून अलेक्झांडरला रागवावं असं बाबांना वाटलं.पण आई तिथे असल्याने त्यांना शक्य झालं नाही.फुस्स पप्पा पेक्षा पराक्रमी पॉल बनण्यातच अधिक सुज्ञपणा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं…दर रविवारी पैदल भ्रंमती करण्यास आपण तयार असल्याचं त्यांनी सांगून टाकलं.हे ऐकून अलेक्झांडरने आनंदाने उडी मारली आणि तो बाबांना बिलगला..तेजोयमीने बाबांना मस्तपैकी पप्पी दिली….

सुरेश वांदिले