(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

आगीशी खेळ

एकदा गाढवोबा त्याच्या मुलांसह रमत गमत वनभ्रमंतीला निघाले होते. वाटेत त्यांच्या मुलांना एक कातडे पडलेले दिसले. ती मुलं तिकडे धावली. त्या मुलांना ते कातडे कोणत्या प्राण्याचे आहे, हे कळेना, तेव्हा त्यांनी गाढवोबास विचारलं. गाढवोबाने त्या कातड्याचे काळजीपूर्वक निरीक्षण केले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ते सिंहाचे कातडे आहे. तसे त्यांनी आपल्या मुलांना सांगितले.

बाबा, आपण हे कातडे पांघरले तर सिंहासारखे वाटणार नाही का? म्हणजे मग आपणास सर्वजण भितील. आपल्या आज्ञेत राहतील.

गाढवोबाने, त्या मुलाचे कान ओढले आणि त्याला गाढवाने सिंहाचे कातडे ओढण्याचा अविचार असल्याचं समजावून सांगितलं.

तुम्हाला कसं ठाऊक? गाढवोबाच्या मुलानं विचारलं. त्यावर गाढव हसले आणि त्यांनी आपल्या एका पूर्वजाने सिंहाचे कातडे पांघरुन केलेल्या मूर्खपणाची गोष्ट सांगितली.

पण बाबा, यात कसला आलाय मूर्खपणा? उलट त्यांना काही काळ तरी सिंह म्हणून सन्मान मिळाला असणार? वनामध्ये त्यांना मान मिळाला असणार?

नाही रे राज्या, असं काही झालं नाही.आपले हे पूर्वज महाशय, सिंहाचे कातडे पांघरुन जायला लागले तेव्हा सुरुवातिला काही वेळ, आजूबाजूच्या प्राण्यांना खरच भीती वाटली.

बघा मी जे म्हंटल, तसंच झालं. मुलगा म्हणाला.

अरे, असा उतावळा होऊ नकोस. आपल्या पूर्वज महाशयांना वाटलं, वा वा, हे प्राणी आपणास भिताहेत याचा अर्थ आपणच आता जंगलाचे राजे.

मग?

मग काय, त्या आनंदाच्या भरात त्याने डरकाळी दिली.

मग?

अरे बाबा, कातडं जरी सिंहाचं होतं तरी आवाज तर गाढवाचाच निघाला ना.त्यामुळे अवतीभवतीचे प्राणीही आश्चर्यचकित झाले. सिंह महाराजांचा आवाज गाढवाच्या आवाजासारखा कां येतो असं त्यांना वाटलं.

मग?

मग काय, गंमतच झाली.आपल्या या पूर्वज महाशयाच्या समोर दोन कुत्रे उभे राहिले. ते त्याच्यावर भुंकू लागले. त्या भुंकण्याने हे आपले पूर्वज महाशय घाबरले. कातडे तिथेच सोडून ते धूम पळाले. पळताना त्यांना काही भान राहिले नाही. त्यामुळे ते थेट सिंहमहाराजांच्या गुहेजवळ येऊन पोहचले. खूप धावल्यामुळे त्यांना दम लागला होता. ते धापा टाकू लागले. आता त्यांच्याच्याने पुढे धाववेना. त्यांनी तिथेच फतकल मारली. आपल्या गुहेसमोर कोण येऊन बसलय हे बघण्यासाठी सिंहमहाराज तिथे आले. त्यांना बघून आपले पूर्वज गाढव महाशयांची बोबडी वळाली. ते बेशुध्द झाले. सुदैवाने सिंह महाराज नुकतेच शिकारी वरुन भोजन करुन आले होते. पोट भरलं असलं की ते कुणावर सहसा हल्ला करत नाही. त्यामुळे त्यांनी बेशुध्द पडलेल्या गाढवाकडे नजर टाकून ते गुहेत निघून गेले.

कधीतरी रात्री गाढव शुध्दीवर आले. त्यांना आपण इथे कसं आलो हे आठवलं, सिंह महाराज आपल्यासमोर उभे राहिल्याचं आठवलं .या आठवणिने ते ताडकन उभे राहिले. तेवढ्या रात्रीच ते तिथून पळून गेले.

थोडक्यात काय तर थोडक्यात त्यांचा जीव वाचला.

पण बाबा, तेव्हा तसं घडलं म्हणून आताही तसंच घडणार नाही ना.मुलाने विचारलं.

म्हणजे तुला म्हणायचं काय?

बाबा, अहो आपण सुध्दा हे कातडे पांघरुन बघू या ना.या कातड्यामुळे आपणास सिंह समजून वननगरीतील प्राणी आपल्या आज्ञेत येतील.

अरे, गधड्या, असं करणं म्हणजे आगिशी खेळणं होय. आगिशी खेळलं की होरपळणं आलचं. हे सत्य माहीत असून ही आपण आपल्या पूर्वजासारखेच वागलो तर आपल्याइतके मूर्ख कुणी नाही.पटतय का तुला? गाढवोबा मुलाला म्हणाले.

वडिलधाऱ्यांच्या सांगण्याकडे लक्ष देणं फार हिताचं असतं,अशी शिकवण त्याला लहानपणापासूनच मिळत असल्याने त्याने होकारार्थी मान डोलावली.

सिंहाचे कातडे तिथेच टाकून गाढवोबा आणि त्याची मुलं पुढे निघून गेले.

सुरेश वांदिले