उडणारा वाघोबा
वाघोबा आजोबांच्या नातवांना गोष्ट ऐकल्याशिवाय झोपच येत नसे.ही गोष्ट त्यांनी आजोबांकडूनच ऐकायची असते.दुसऱ्या कुणाकडूनही त्यांना गोष्ट सांगितलेली चालायची नाही.त्यामुळे आजोबांना दररोज एक नवी गोष्ट तयार ठेवावी लागत असे.त्यांना यामध्ये खूप आनंद मिळत असल्याने नव्या नव्या गोष्टींचा शोध ते घेत आणि नातवांना सांगत.
मग आज्जो, आज कोणती गोष्ट सांगणार तुम्ही,एक नातवाने विचारलं.
आज मी उडणाऱ्या वाघोबाची गोष्ट सांगणार तुम्हाला…
उडणारा वाघोबा म्हणजे वाSव..तुम्ही बघितला का त्याला आज्जो,दुसऱ्या नातवानं विचारलं.
अरे, हा उडणारा वाघोबा,आपला पूर्वज होता.
पूर्वज म्हणजे..
म्हणजे आपला नातेवाईक..खूप खूप पूर्वीचा..
पण आज्जो,या वाघास पंख कसे काय मिळाले,उडण्यासाठी..
तो जर आपला नातेवाईक असेल तर मग आपल्याला पंख कां नाही आज्जो,दुसऱ्या नातवानं विचारलं.
तीच तर खरी गंमत आहे..
वा वा..मग सांगा की गंमत..दोन्ही नातवं म्हणाले आणि आजोबांभोवती सरसावून बसले.आजोबा त्यांना रंगवून रंगवून उडणाऱ्या वाघोबाची गोष्ट सांगू लागले.
तर बाळांनो,हा जो आपला खूप खूप वर्षापूर्वीचा नातेवाईक जर तऱ्हेवाईकच होता..
तऱ्हेवाईक म्हणजे
विचित्र वागणारा..
अच्छा.. तर त्याने काय केले..
तो एकदा वनदेवतेकडे गेला आणि तिच्याशी भांडू लागला..
कशासाठी बॉ..
त्याचं म्हणणं होतं,मला पंख कां नाही..मला पंख मिळाले तर वननगरीचं रक्षण अधिक चांगल्या रितिने करीन..
मग काय झालं..
वनेदवता म्हणाली,वाघोबा त्याच्यासाठी पंखाची काही गरज नाही.तू इतका शक्तीमान आहेस की असच वनाचं रक्षण करण्यास समर्थ आहेस.
मग झालं का त्याचं समाधान..
छे रे..समाधान कसलं होतय..तो हट्टच करुन बसला.शेवटी नाईलाजानं वनदेवतेला वाघोबास पंख द्यावे लागले..
बस संपली कथा..
नाही रे..जरा धीर धरा ना..खरी कथा आता सुरु होते..
वा वा
तर बाळांनो,वाघोबास पंख मिळाल्याने,त्याला आता उडता येऊ लागले.त्यामुळे तो सगळया वनात उडून यायचा.अलगद झाडांवर जाऊन बसायचा.पक्षांची घरटीच पाडून टाकायचा.पक्षांच्या थवा दिसला की त्यांच्या पाठिमागे लागायचा.बिचारे पक्षी घाबरुन जायचे नि आणखी वेगाने उडण्याचा प्रयत्न करायचे.पण या प्रयत्नात काहिंचे पंख तुटून पडायचे.मग ते खाली पडत.असं घडलं की वाघोबास खूप आनंद मिळायचा.तो गडगडाट करायचा.लहान पक्षी तर घाबरुनच गेले होते.मोठ्या पक्षांनांही या उडणाऱ्या वाघाची फार भीती वाटायला लागली.
एकदा या वाघाने गरुडाचा पाठलाग केला.गरुडाने त्याला समजावले की तू माझ्या वाटेला जाऊ नकोस…तू जंगलाचा राजा असला तरी आकाशाचा राजा मी आहे
मग काय झालं..
वाघोबाने ते एकलच नाही..तो गरुडास म्हणाला, तू आकाशाचा राजा असलास तरी आता तुझं राज्य संपलं..तुझ्यासारखा मीही उडू शकतो.तुझ्यापेक्षा शक्तिमान आहे.आता तू राजा नाहीस. मीच राजा आहे…गरुडाला वाघाच्या या अहंकाराचा फार राग आला. याला चांगलाच धडा शिकवला पाहिजे असं त्याला वाटलं.वाघाने गरुडावर उडतानाच हल्ला केला. तो त्याने कसातरी परतवला आणि वेगाने घनदाट अरण्यात निघून गेला.
वाघोबाचा चरफडाट झाला.हा इवलासा गरुड आपल्याला भारी पडतो म्हणजे काय..सगळया गरुडांचा खातमाच करायला पाहिजे.असं तो स्वत:लाच सांगू लागला. दुसऱ्या दिवशी गरुडांवर आक्रमण करुन त्यांचा नायनाट करण्याचं ठरवून हा वाघोबा घरी परतला.
इकडे गरुड वेगाने घनदाट अरण्यात एका सुरक्षित ठिकाणी उतरला.त्याने सर्व पक्षांना बोलावले.घडलेली घटना सांगितली.सगळयांच्या अंगावर शहारे आले.आता हा वाघोबा कुणालाही सोडणार नाही याची सर्वांना खात्री पटली.बरेच पक्षी धायमोकलून रडू लागले.काही छोटे पक्षी हा धक्का सहन न होऊन गतप्राण झाले.ते बघून गरुडही भांबावला..मात्र लगेच तो सावरला आणि पक्षांना म्हणाला,असं घाबरुन कसं चालेल..घाबरुन राहिलो तर या वाघाचा दुष्टपणा आणखीनच वाढेल.त्याचा बंदोबस्त आपण केला पाहिजे.पण त्याच्यापुढे आपली शक्ती कमी पडते.अशा वेळी आपण युक्तिने त्याचा सामना करायला हवा.पण एकही पक्षी तयार झाला नाही.वाघापुढे आपला निभावच लागू शकणार नाही असं सर्वांना वाटत होतं.
कुणीही गरुडाची सोबत करायला तयार नव्हते.मात्र एक चिमणी त्याला म्हणाली.मी देते तुला साथ..
पिटुकली चिमणी..गंमतच म्हणायची..
गंमत नाही रे बाळांनो.ती पिटुकली होती तरी हिम्मतवान होती..ती एकटीच मदतीला समोर आल्याचे बघून गरुडास फार काही आनंद झाला नाही.ही इटुकली पिटुकली आपणास काय मदत करणार बरं..पण ती इटुकली गरुडाच्या कानाजवळ गेली आणि तिने त्याला काहीतरी सांगितलं.ते ऐकून गरुड भारावून गेला.अगं तू तर माझ्यापेक्षाही भारी निघालीस गं, असं म्हणून तिचं कौतुक करायला लागला.
गरुडेश्वरा हे कौतुक उद्यासाठी राखून ठेवा..चिमणी म्हणाली.इटुकली चिमणी कशी काय गरुडास मदत करणार..त्यालाही संकटात टाकणार आणि स्वत:ही संकटात पडणार,असं बहुतेक पक्षांना वाटलं.चिमणीच्या आई बाबांनी तिला समजावलं.पण तिचा निर्धार पक्का होता..
बघा आता तुमचं तुम्हीच असं म्हणून चिमणीचे आई बाबा आणि इतरही पक्षी तिथून निघून गेले.
चिमणीच्या डोळयात अजिबात भीती नव्हती.त्यामुळे गरुडाच्या मनात थोडीफार जी काही भीती होती,तिही निघून गेली.आपण दोघेच त्या दुष्ट वाघोबाला धडा शिकवू शकतो याची त्यालाखात्री पटली..
मग काय झालं..
दुसऱ्या दिवशी वाघोबा त्वेषाने गरुडावर चालून गेला.
त्यावेळी चिमणी कुठे होती.
चिमणी गरुडाच्या एका पंखाच्या आड लपून बसली होती.गरुडाने काही वेळ वाघोबास झुलवले आणि मग तो थेट वाघाच्या समोर आला.तसे घडताच पंखात दडलेली चिमणी बाहेर आली आणि तिने वाघोबाच्या डोळयावर हल्ला केला.असे काही घडेल हे वाघोबाने अपेक्षित केले नव्हते.त्यामुळे त्याचा तोल जाऊ लागला.हे बघून चिमणीने दुस-या डोळयावरही हल्ला केला.वाघोबाच्या डोळयापुढे अंधारी आली.डोळयातू रक्त वाहू लागले.त्याचा आता समोरचे काहीच दिसेना.हे बघून गरुडाने त्याच्या डोळयावर जोरदार हल्ला केला नि त्याचं बुब्बुळच बाहेर काढलं.दुसरही बुब्बुळ बाहेर काढलं.वाघोबा आता पुरता आंधळा झाला.त्याला समोरच काही दिसत नसल्याने तो उडत असला तरी भल्या मोठ्या वृक्षाच्या फांदित अडकला.तिथून सुटण्याची त्याने खूप धडपडत केली.पंखाची खूप फडफड केली.त्यात त्याचे पंख जखमी झाले.लवकरच पंखही निकामी झाले.झाडावर वाघोबा अडकल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली.इतर पक्षी वेगाने तिथे आले.सर्वांनी वाघोबास टोचायला सुरुवात केली.त्याला काहीच करता येत नव्हतं.वेदनेनं तो विव्हळू लागला.जोरजोराने ओरडू लागला..
वनदेवतेचा त्याने धावा सुरु केला..वनदेवता तिथे आली आणि त्याला म्हणाली..
वाघोबा, तुला मी म्हणाले होते की पंखासाठी हट्ट करु नकोस.पण तू माझं ऐकलं नाही.पंख मिळाल्यावर तू अधिकच उन्मुक्त झाला.ज्याला त्याला त्रास देऊ लागलास.इतरांना तुच्छ समजू लागलास.जे असे समजतात,त्यांचे हाल तुझ्यासारखेच होतात.ज्यांच्याकडे शक्ती कमी असते त्यांनी न भीता युक्ती वापरली तर तुझ्यासारख्या शक्तीमान प्राण्याला हरवू शकतात…बघितलस..
वनदेवता सगळं कळलं मला.सगळं मला..पण आता मला यातून वाचव..असं म्हणून तो वाघोबा रडू लागला..,ते बघून वनदेवतेला दया आली..
तिने वाघोबाची सुटका केली.त्याला बजावले की यापुढे आपल्या शक्तीचा गर्व करायचा नाही.आपल्याकडे नसलेल्या गोष्टीसाठी हट्ट करायचा नाही.अंहकार करायचा नाही.इतरांच्या राज्यात दखल द्यायची नाही..
सर्व काही वाघोबाने कबूल केले.वनदेवता त्याला म्हणाली..तुला मी क्षमा करते पण यापुढे तुला आणि तुझ्या कोणत्याही पिढीला पंख मिळणार नाहीत असा शापही देते…
असं बोलून वनदेवता तिथून निघून गेली..
वाघोबास चांगलाच धडा मिळाला..म्हणून आपल्याला पंख नाही आणि जमेल तितकं चांगलच वागायचं असतं..आजोबा नातवांना म्हणाले. कुणीही हुं की चु केलं नाही.गोष्ट ऐकता ऐकता दोन्ही नातवं कधी झोपी गेले हे त्यांनाही कळलं नाही..
सुरेश वांदिले
.jpg)