(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

शेपटीच्या शोधात..

आज दरबाराज गजराजाचं मन काही लागत नव्हतं. सगळा वेळ ते शून्यात बघत बसले होते. अखेर प्रधानजींनी त्यांना भीत भीत विचारलं.

महाराज आज आपली तब्येत बरी नाही का?

अं नाही, हो म्हणजे नाही, हो काही नाही..असं काही तरी गजराज म्हणाले. तेव्हा प्रधानजींसोबत दरबारातील इतरांच्याही लक्षात आलं की महाराजांचं मन काही आज थाऱ्यावर नाही.

प्रधानजी हिम्मत करुन गजराजांच्या जवळ गेले आणि त्यांनी गजराजांच्या कानात फुंकर मारली. तेव्हा कुठे गजराज खडबडून उठले. समोर प्रधानजी बघून त्यांना आश्चर्य वाटलं.

प्रधानजी तुम्ही आमच्या इतक्या नजिक कसे कां आलात?

महाराज आपली ख्याली-खुशाली व्यक्त करण्यासाठी आलो. आज आपले लक्ष थाऱ्यावर दिसत नाही. आम्ही आणि दरबाऱ्यांनी विचारपूस केली तरी तुम्ही अनाकलनीय बोलतात, म्हणून तुमच्याजवळ यावं लागलं. क्षमा असावी महाराज.तुम्हास नेमकं काय झालं, ते सांगाल तर आम्हा सर्वांचा जीव भांड्यात पडेल…

गजराजांनी प्रधानजींना त्यांच्या जागी आसनस्थ व्हायला सांगितलं.

प्रधानजी आसनस्थ झाल्यावर गजराज बोलू लागले, काल पासून माझ्यासमोर एक प्रश्न निर्माण झालाय. जो तो उठतो आणि म्हणतो, हत्ती गेला नि शेपूट राहिला.. गजराज म्हणाले.

पण महाराज हा प्रश्न कसा काय?प्रधानजींनी विचारलं.

प्रधानजी, हे जे असं म्हंटलं जातं ते आपलं कौतुक आहे की आपली बदनामी आहे..

महाराज यात आपली बदनामी कसली आलीय..अहो मोठी मोठी काम घडताना, एखाद्या शुल्लक गोष्टीसाठी ते काम अडून राहतं, त्यामुळे ही म्हण अस्तित्वात आली..मोठ्ठ काम कसं समजावून सांगणार. म्हणून मग हत्तीची प्रतीक वापरलं. आपल्यापेक्षा दुसरा प्राणी आहेच कुठं मोठा..

०००

प्रधानजी या शेपटीच्या आडून आपली बदनामी होते हे तुमच्या लक्षात कसं येत नाही.

बदनामी, ती कशी महाराज.

हत्तीला आपली शेपटूही  सांभाळता येत नाही..असं सांगायचं असतं, या म्हणीच्या आडून..

काय सांगता महाराज. हे तर आमच्या लक्षात आलं नव्हतं ..

नव्हतं ना, म्हणून तुम्ही प्रधान मी गजराज..महाराज गरजले..

आता काय महाराज..

आपली बदनामी करणाऱ्या या म्हणीचा शोध कुणी लावला, कुणाच्या सुपिक डोक्यातून ही म्हण निघाली याचा शोध आपण घेतला पाहिजे…

०००

महाराजांचा आदेश म्हंटल्यावर प्रत्येक दरबारी हत्ती गेला नि शेपूट राहिला या म्हणीला शोधणाऱ्याच्या शोधकार्यात गुंतले. सर्वांनाच ठाऊक  होतं की यातून काहीच साध्य होणार नाही, पण महाराजांना ते सांगणार कोण, त्यामुळे प्रत्येकजण दाखवण्यापुरता शोध कार्य करु लागला.

महिन्याभराने गजराजांनी दरबार भरवला..

त्यांनी हत्ती गेला नि शेपूट राहिले या म्हणीचा शोध  लावणाऱ्या शोध लागला का, म्हणून प्रत्येकाकडे विचारणा केली.सर्वांनी मान खाल घातली.

अरेरे वाईटच झालं.मी सुध्दा तुमच्यासारखा या म्हणीचा शोध घेण्यासाठी जीवाचे रान केले. या जंगलातून त्या जंगलात गेलो..या माझ्या भ्रमंतीला यश मिळण्याचे चिन्ह दिसू लागले..

म्हणजे महाराज या म्हणीचा शोध लावणाऱ्या शोध लागला म्हणता..वा वा गजराज की जय.. प्रधानजींनी नारा दिला. गजराजांच्या जयजयकाराने दरबार  निनादून गेला..गजराजांनी सर्वांना शांत केले..

अहो प्रधानजी, थांबा जर..मी त्याच्यापर्यंत पोहचलो, त्याला पकडणार तोच तो निसटून वनात गायपच झाला ..थोडक्यात काय हत्ती गेला नि शेपूट राहिलं..गजराज म्हणाले…

काही क्षण दरबारात निरव शांतता निर्माण झाली. जो तो ज्याच्या त्याच्याकडे बघू लागला..सर्वांनी माना खाली घातल्या..

काही क्षण असेच गेलं आणि दरबारात फिस्सचा आवाज उमटला. दरबाऱ्यांनी मान वर केली. गजराज स्वत:हसत होते. ते बघून दरबाऱ्यांच्या जिवात जीव आला..

त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला..

मूर्खांनो, सुटेकचा निश्वास कशासाठी टाकता.. आँ…मला काहीही वाटले म्हणून तुम्हास तसेच वाटले पाहिजे असं नाही ना.. माझं चुकलं तर ते तुम्ही न भीती सांगायला हवं की नाही…तुमची परीक्षा बघत होतो मी.. मला, कुणी म्हण तयार करणारा सापडला नाही..नसेल तर सापडणार तरी कसा म्हणा….योग्य असेल तर योग्य आणि अयोग्याला अयोग्य म्हणण्याची हिम्मत तुम्हाला दाखवता येत नसेल तर तुम्ही दरबारी होण्याच्याच पात्रततेचे नाही..गजराज गरजले.त्यांनी सर्वात आधी प्रधानजींना पदावरुन काढून टाकले आणि नव्या प्रधानांना नेमले.

मग प्रधानजी काय खरं नि काय खोट..

महाराज तुमच्या जे मनात आहे तेही खरं आणि आम्हास वाटतं तेही खरं…प्रधानजींनी चतुरपणे उत्तर दिले..आपणास चांगला प्रधान मिळाला याचा गजराजांना आनंद झाला.

सुरेश वांदिले