(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

फेंद्रे नाक

एकदा ताडोबाच्या जंगलात सकाळी सकाळी वाघोबा,वाघीण काकू आणि त्यांचा बछडा भ्रमंतीला निघाले. छान हवा सुटली होती. झाडांवरील फळा फुलांचा सुगंध आसमंतात दरवळत होता.त्यामुळे तिघांचीही भ्रमंती मस्त सुरु होती.फिरता फिरता बछड्यास तहान लागली म्हणून ते तिघेही तलावाच्या ठिकाणी थांबले.पाणी पितांना बछड्याचं लक्ष पाण्यात पडलेल्या त्याच्या प्रतिमेकडे गेलं…तो ती प्रतिमा पुन्हा पुन्हा बघू लागला.

पाणी प्यायचं सोडून बछडा पाण्यात पुन्हा पुन्हा काय बघतो,याची उत्सुकता लागून वाघोबा आणि वाघीण काकू त्याच्याकडे आल्या.

काय रे असं काय बघतोस पुन्हा पुन्हा पाण्यात..वाघोबांनी बछड्याला विचारलं.

बछड्याने मान वर केली आणि त्याने वाघोबांकडे बघितलं.पुन्हा पाण्यात बघितलं..

अरे, तू बोलत कां नाहीस..वाघोबांनी पुन्हा त्याला विचारलं..

काय रे विचार की..वाघीण काकू म्हणाली.तिघेही जण तलावाशेजारच्या एका झाडाखाली बसले. ,

बछड्याने विचारलं,बाबा आपलं नाक असं चेपलेलं कां आहे हो?आपण इतके देखणे,स्मार्ट,धिप्पाड पण आपलं नाक मात्र असं.तुम्हाला त्याबद्दल वाईट वाटत नाही का?

वाईट वाटून काही उपयोग नाही ना राजा.वाघोबा उसासा टाकत म्हणाले

आई,असं का बोलतात बाबा…बछड्याने वाघीण काकूस विचारलं.

अरे,या आपल्या फेंदऱ्या नाकास आपले पूर्वज जबाबदार आहेत..वाघीण म्हणाली..

म्हणजे आपल्या पूर्वजांनी काही गडबड केली की या नाकासोबत..बछडा म्हणाला..

अरे गडबड म्हणजे काय..आपल्या पूर्वजांना आपल्या नाकाचा फार गर्व होता. या नाकामुळे आपण कुणाचाही माग घेऊ शकतो असा अहंकार त्यामुळे आला त्यांना..वाघीण म्हणाली..

मग काय झालं?

सांगा हो त्याला काय घडलं ते..वाघीण काकू वाघोबास म्हणाली.वाघोबांनी बछड्यास आपल्या जवळ बोलावले.त्याच्या डोक्यावरुन पंजा फिरवत म्हणाले,

अरे,बाळा खूप खूप वर्षापूर्वी आपला एक पूर्वज असाच जंगलात फिरत असताना त्याच्या नाकास गायीचा वास आला.त्या वासाचा माग घेत तो बरोबर गायीपर्यंत पोहचला..

मग काय झालं?

तो गायीवर उडी मारणार तोच कुणीतरी  त्याला अडवलं.

     त्या वाघोबाला अडवणारं कोण होतं बाबा?बछड्याची उत्सुकता आता शिगेला पोहचली होती.

अरे, ती वनदेवता होती.तिने त्या आपल्या पूर्वजाला विचारलं.अरे, तू इतक्या दूरुन या गायीचा शोध घेत कसा कां आला?

हा हा हा ..आपला पूर्वज उध्दटपणे हसला. वनदेवतेकडे तुच्छतेने बघत म्हणाला..

हे माझं नाक बघितलस ना.ते शक्तीशाली आहे.त्याला कोणाचाही वास कितीही दूरवर असला तरी घेता येतो .हा हा हा..

आपल्या पूर्वजाच्या या असल्या अहंकारयुक्त बोलण्याचा वनदेवतेला राग आला.तिने त्याची मान पकडली. त्याचे नाक जमिनीला घास घास घासले.तेव्हा त्याचे नाक असे फेंद्रे झाले.म्हणून आपलेही नाक फेंद्रे झाले.

बापरे, म्हणजे आपल्यापेक्षा कुणीतरी शक्तीशाली जंगलात राहत वाटतं.बछडा उद्गारला.

अगदी बरोबर.आपण जरी शक्तीशाली असलो तरी आपल्यापेक्षा कुणीतरी अधिक शक्तीशाली,बुध्दीमान राहू शकतं हे कधी विसरायचं नाही हं तू बाळ.वाघीणकाकू या संभाषणात सहभागी होत म्हणाली.

म्हणूनच बाळा.आपण कधी उतू नये मातू नये हे यातून शिकलं पाहिजे.तुमच्याकडे एखादी शक्ती आहे,म्हणून त्याचा माज नाही ठेवला पाहिजे.असं ठेवलं की मग बरोबर शिक्षा मिळते.जशी आपल्या पूर्वजाला मिळाली तशी…

बछडा उठला त्याने वाघोबांच्या नाकास हात लावला मग आईकडे जाऊन तिच्याही नाकास हात लावला आणि तो म्हणाला,आईबाबा तुमच्या दोघांच्याही नाकाची शपथ घेऊन सांगतो की मी कधीही माझ्या शक्तीचा गर्व करणार नाही.वनदेवतचं माझ्यावर लक्ष आहे हे कायम लक्षात ठेवीन..

शाब्बास रे माझ्या लेकरा..असे वाघोबा आणि वाघीणकाकू एकाच वेळी म्हणाले.बछड्याच्या शहाण्या बोलाने त्यांचा उर भरुन आला.

सुरेश वांदिले