गोष्ट सांगणारा पोपट
तेजोमयीच्या सदनिकेच्या एका बाजुच्या गॅलरीजवळ खूप झाडं होती.त्या झाडावर बरेच पक्षी येत.बसत.काही वेळ या फांदिवरुन त्या फांदीवर जात.थोडक्यात त्यांचा खेळ चालत असे.खेळल्यावर काही वेळ काही पक्षी ध्यानस्थ बसल्यासारखे दिसत.त्यावेळी ते जराही हलत-डुलत नसत.अशा पक्षांमध्ये पोपटांचा समावेश होता.
एकदा यातील एक पोपट तेजोमयीच्या गॅलरित आला आणि आत डोकावून बघू लागला.अलेक्झांडर(द डॉगी)ला याचा लगेच वास आला.आईसोबत स्वयंपाक खोलित असलेला अलेक्झांडर धावत गॅलरित आला.त्याचे लक्ष पोपटाकडे गेले.एरव्ही कोणत्याही अनोळखी व्यक्ती,प्राणी,पक्षी किंवा अगदी घरातल्या पालिवरही जोराने भुंकणारा अलेक्झांडर पोपटाकडे काही क्षण बघतच राहिला.पोपटही त्याच्याकडे रोखून बघू लागला.पोपट काही तरी बडूबडू लागला.अलेक्झांडर कान देऊन ऐकू लागला..अधून मधून हाही कुईंकुईं करुन त्याला प्रतिसाद द्यायचा.मध्ये एकदा तेजोमयी बालकनित डोकावून गेली.तिला बघताच पोपट उडून गेला.अलेक्झांडरने मागे वळून तेजोमयीकडे रागाने बघितलं..
अलेक्झू,मी बाबा काही केलं नाही..मला बघूनच तो पक्षी उडून गेला…
पण तू आलीच कशाला मध्ये तडफडायला, असं काहीतरी अलेक्झांडरला म्हणायचं असावं.तसे भाव दर्शवत तो पुन्हा आईकडे गेला..
दुसऱ्या दिवशी पुन्हा पोपट बालकनित आला.तो आल्याचे अलेक्झांडरला बरोबर समजले.हा बालकनित गेला आणि पोपटासमोर फथकल मारली.पोपट अलेक्झांडरकडे बघून बडबडू लागला.अलेक्झांडरही त्याच्या पध्दतीने प्रतिसाद देऊ लागला.ही गॅलरी दिवाणखान्याला लागून होती.त्यावेळी तेजोमयी काहीतरी वाचत होती.तिच्या कानावर पोपटाचा आवाज पडताच ती दबक्या आवाज गॅलरिजवळ गेली.पोपट काही तरी बडबडतोय आणि अलेक्झांडर मान डोलवतोय हे बघून तिला गंमत वाटली.तिने आई बाबांना हाक मारली.या आवाजाने पोपट उडून गेला.अलेक्झांडर झरदिशी मागे वळला नि त्याने रागाने तेजामयीकडे बघितलं.तिचं काय करावं नि काय करु नये, असे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले.आपली नाराजी व्यक्त करत तो आईकडे निघून गेला.
तिसऱ्या दिवशी तो पोपट पुन्हा आला.त्याच्या आगमनाची खबर अलेक्झांडरला बरोबर लागायची.तो आल्याबरोबर पठ्ठा गॅलरित पळाला.आज तेजोमयी त्याच्यावर पाळत ठेऊन होती.तो गॅलरित गेल्याबरोबर तिने बाबा आणि आईला हळूच बोलावलं आणि गॅलरीजवळ आणलं.आज पोपट गॅलरीमधून थेट खाली आला आणि अलेक्झांडरसमोर बसून बडबड करु लागला. अलेक्झांडरही तन्मयतेने मान डोलवू लागला..
बघितलत का बाबा चमत्कार..हा पोपट इथे दररोज येतो नि अलेक्झांडरशी बोलत बसतो..आहे की नाही गंमत..
खरच गंमत आहे, आई म्हणाली.
या गमतीचा आनंद अलेक्झांडरला जास्त वेळ घेता येणं शक्य होण्यासाठी आपण इथून गेलेलं बरं.. बाबा हळू आवाजात म्हणाले.तिघेही मग आतल्या खोलित गेले.
बाबा, हा पोपट काहीतरी अलेक्झांडरला सांगतो असं मला वाटतं.मी गेली तीन दिवस बघतेय तसं..त्याचं सांगणं अलेक्झांडर मन लावून ऐकतो बर का..काय सांगत असेल बरं तो बाबा..
नक्कीच गोष्टच सांगत असणार तो..आई म्हणाली.
तुला कसं माहीत?बाबांनी विचारलं..
अहो,माझ्या लहानपणी माझी आजी कधीकधी गोष्ट सांगणाऱ्या पोपटाची गोष्ट सांगायची..
काय सांगतेस,तेजोमयी आश्चर्याने म्हणाली..
मग,आम्हाला सुध्दा सांगा की..बाबा म्हणाले..
अहो, मी गोष्टी सांगायला बसले तर घरची कामं कोण करणार?आई म्हणाली
काम को गोली मारो आई..आज आम्ही तुला मदत करु…पण आता गोष्ट सांगणाऱ्या पोपटाची गोष्ट सांगूनच टाक बरं.तेजोमयी म्हणाली.
तुझा लाडका लेक तिकडे गोष्टी ऐकतोय.लेकिने काय घोडं मारलं..बाबा मिस्किलपणे म्हणाले..
बरं बरं सांगते.असं म्हणून आई मांडी घालून बसली..आईच्या आजिने सांगितलेल्या गोष्ट सांगण्याऱ्या पोपटाकडे खूप सुंदर सुंदर गोष्टींचा खजिना होता.तो त्या गोष्टी सांगताना,पशू पक्षांचे आवाज काढून दाखवायचा.त्यामुळे पशु पक्षांचे आवाज एकमेकांना परिचयाचे झाले.सिंह महाराजांच्या डरकाळीसारखा आवाज त्याने एकदा काढला.त्यावेळी गोष्ट ऐकणारी हरीण घाबरली होती.खरेखुऱ्या सिंहमहाराजांचा हा आवाज नसून पोपटाने काढलेला आवाज असल्याचे लक्षात आल्यावर तिची भीती पळून गेली.अशा गोष्टी सांगता सांगता पोपटाजवळच्या गोष्टी संपायला आल्या.
मग पुढे काय झालं.तेजोमयीनं अधिरतेनं विचारलं.
तो पोपट मग दुसऱ्या राज्यातला जंगलात गेला आणि त्याने तिथे एक युक्ती केली.
कोणती बरं.
तो आधी एका हत्तीकडे गेला आणि त्याला जुनी गोष्ट सांगितली.ही गोष्ट ऐकून हत्ती खुष झाला.त्याने विचारलं तुला काय बक्षीस हवं ते सांग.
मग.
त्यावर पोपट म्हणाला,हत्तीदादा मला काही बक्षीस नको तुमच्याकडे एखादी गोष्ट असेल तर मला सांगाल का?
एक काय अनेक गोष्टी आहेत की.पण मला तुझ्यासारखं असं रंगवून सांगता येत नाही बुवा. चालेल का तुला?
हो हो हो नक्कीच चालेल.पोपट म्हणाला.मग हत्तीने त्याला ठाऊक असलेल्या गोष्टी जमेल तशा पध्दतीने सांगितल्या.
मग पोपट उंटाकडे गेला.त्यालाही त्याने त्याच्याजवळची एक जुनी गोष्ट रंगवून रंगवून सांगितली.उंट खुष झाला.त्यानेही जेव्हा बक्षिसाबद्दल विचारलं तेव्हा पोपटाने उंटाजवळ काही गोष्टी असतील तर त्या सांगण्याची विनंती केली.जमेल तसं सांगतो,असं उंट म्हणाला आणि त्याने त्याला ठाऊक असलेल्या गोष्टी पोपटास सांगितल्या.
अशा प्रकारे हा पोपट वेगवेगळया प्राण्यांना भेटायचा आणि त्यांना गोष्ट सांगून खुष केलं की त्यांच्याकडच्या गोष्टीचा खजिना बक्षीस म्हणून मिळवायचा.
असे करत करत जंगलातील सर्व प्राणी झाले.आता फक्त सिंह महाराज उरले होते.
त्यांच्याकडे कसे जायचे हा प्रश्नच होता.बहुतेक प्राण्यांनी पोपटाला, सिंह महाराजांकडे जाऊच नको असा सल्ला दिला.महाराज तापट असल्याने त्यांना गोष्टी ऐकताना रागबिग आला तर तुलाच मारुन टाकायचे, असे प्रत्येक प्राणी म्हणाला.त्यामुळे पोपटालाही भीती वाटू लागली.
मग काय झालं?
मात्र, पोपटानं विचार केला की आपण या इतक्या दूर जंगलात आलोच आहे तर सिंहमहाराजांना प्रत्यक्ष भेटायला हवं.इथले प्राणी सांगतात त्यांच्यासांगण्यावर विश्वास ठेवण्याच्या ऐवजी आपण प्रत्यक्ष खात्री केलेली बरी.शिवाय आपण कथा सांगू तेव्हा महाराज नक्कीच गुंग होऊन जातील.तेवढा आत्मविश्वास तर हवाच ना.आपण आपल्या कलेत पारंगत आहोत.मग भ्यायचं कशाला?
अरे वा.स्मार्ट होता म्हणायचा हा पोपट.बाबा म्हणाले..
होना.या पोपटाने प्राण्यांचा सल्ला न ऐकता एके दिवशी सिंह महाराजांना गाठले.
त्यावेळी महाराजांचे एक राजपुत्र रुसून बसल्याचे पोपटाने बघितलं.महाराज आणि महाराणी त्याला समजावत होत्या.पण तो काही ऐकेना.त्याने भोकांड पसरले.तोंडाला लागेल त्या वस्तू तो इकडे तिकडे फेकू लागला.महाराजांचा राग अनावर झाला.त्यांनी राजपुत्रावर पंजा उगारला,हे बघून पोपट त्या दोघांच्या मध्ये आला नि आणि त्याने राजपुत्राकडे बघत थेट गोष्टच सांगायला सुरुवात केली.गोष्टीच्या सुरुवातीसच त्याने काही प्राण्यांचे आवाज काढले.राजपुत्राला याची मजा वाटली.त्याने रडणे थांबवले आणि फेकफुकही थांबवली..
पोपटाचे गोष्ट सांगणे सुरुच होते.ही गोष्ट ऐकता ऐकता राजपुत्र तल्लीन झाला.छान मान डोलावू लागला.गोष्ट संपता संपता पोपटाने राजपुत्राला गोष्टीचं तात्पर्य सांगितलं की, जी मुलं आई बाबाचं ऐकतात,त्या मुलांना आईबाबा खूप खाउु आणि खेळणी न मागता देतात..
बरोबर ना महाराज..महाराजांकडे वळून पोपट म्हणाला.
हो हो हो, महाराज खुष होऊन म्हणाले.राजपुत्राला आनंदी करणाऱ्या आणि त्याचा राग आणि उद्दामपणा घालवणाऱ्या या गोष्टी सांगणाऱ्या पोपटावर महाराज प्रचंड खुष झाले.
महाराणी या पोपटाला आपण आपल्या राज्याचा प्रधान करायचा का?
नको नको महाराज मला प्रधान व्हायचं नाही.
असं कसं नाही, तुला बक्षीस तर मिळायलाच हवं ना.महाराणी म्हणाल्या.
महाराज, महाराणी, तुम्ही देणारच असाल तुमच्याकडे असलेल्या गोष्टींचा खजिना मला द्या ना.तुम्ही जंगलाचे राजे आहात.कितीतरी गोष्टी तुम्हाला ठाऊक असतील.
पोपटाची इच्छा ऐकून महाराज प्रसन्न झाले.अशी मागणी त्यांच्या हयातीत कुणी केली नव्हती.त्यांनी पोपटाला शाही पाहुण्याचा दर्जा दिला आणि १० दिवस आपल्याकडे ठेऊन घेतले.जंगलात फिरवले.जंगलातील पशुपक्षी,वृक्ष,नदी या साऱ्यांच्या कितीतरी गोष्टी सांगितल्या..पोपटाकडे गोष्टींचा खूप मोठा खजिनाच जमा झाला.जेव्हा कधी त्याच्या जवळचा हा खजिना संपला की तो पुन्हा नव्या जंगलात जायचा आणि तिथून गोष्टी घेऊन यायचा.
तोच तर हा पोपट नसेल ना गं आई..
तो नसेल पण त्याच्या नातू पणतू नक्कीच असणार.बघ म्हणूनच तो गोष्टी सांगायला आलाय इकडे..
कुई कुई.अचानक हा आवाज आला आणि तिघांनीही दाराकडे बघितले.
अलेक्झांडर कुई कुई करत, हो हो अशा आशयाची मान डोलावत होता..
म्हणजे तू सारं ऐकलं वाटत ठोंब्या..
आईने अलेक्झांडरला जवळ घेत विचारलं.
अगं त्याने तिकडे पोपटाकडून गोष्ट ऐकली आणि इकडे गोष्ट सांगणाऱ्या पोपटाची गोष्ट तुझ्याकडून ऐकली.बघ कसा आनंदाने फुलून गेलाय तो..तेजोमयी म्हणाली..
सुरेश वांदिले
.jpg)