(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

मारुती रायाची गोष्ट

मित्रांनो तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी बाबांसोबत हनुमानाच्या मंदिरात गेलात आहात ना. शेंदूर फासलेल्या मूर्तीसमोर बाबा नतमस्तक होतात. त्यांचं बघून आपणही नतमस्तक होतो. हा हनुमान सध्याच्या काळातल्या काही लाडक्या देवांपैकी एक. हा हनुमान रामभक्त असल्याचं कथा वाचून वा दूरचित्रवाणीवरील मालिका बघून आपणास ठाऊक असतं. तो महापराक्रमी होता. त्याने रावण महाराजांची सोन्याची लंका एकट्याने जाळून काढली. त्याने एकट्यानेच राम-रावण युध्दात हजारो राक्षसांचा नायनाट केला हेही आपणास ठाऊक असतं.

हनुमानाचं खरं कर्तृत्व यापेक्षाही अधिक होतं. तो अत्यंत हुषार होता. प्रसंगावधानी होता. सिता मातेच्या शोधात महासागर ओलांडताना त्याला तीन मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. पण या संकटातून तो सहिसलामत बचावला ते आपल्या बुध्दीचातुर्याच्या बळावर.

अथांग पसरलेल्या सागरावरुन उडत असताना, एके ठिकाणी या सागराच्या अध्येमध्ये असणाऱ्या  मयंक पर्वताने त्यास अडवलं. मयंक पर्वत त्यास म्हणाला की, हनुमान, अरे तू इतक्या लांब उडत आला आहेस. थकला असशील. जरा माझ्या भूमिवर उतर. थोडावेळ विश्रांती घे. माझ्या भूमिवर असलेल्या सुंदर आणि सुमधूर फळांचा आस्वाद घे.

मित्रांनो तुम्हास काय वाटतं?  हनुमान तिथे थांबला असेल.त्याने विश्रांती घेतली असेल. हनुमानाने असं काही केलं नाही. तो नम्रपणे मयंक पर्वतास म्हणाला, पर्वतराज, आपण माझ्याप्रती जी काळजी दाखवली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. पण महाराज मी आता विश्रांती घेऊ इच्छित नाही. कारण जे कार्य करण्याचा मी निर्धार केला आहे, तो तडीस नेल्याशिवाय मी विश्रांती घेणं योग्य नाही.मयंक पर्वतानं पुन्हा एकदा हनुमानास विश्रांती घेण्याची विनंती केली. पण पुन्हा हनुमानानं नम्रपणे नकार दिला. आपल्या कामाच्या प्रती असलेली निष्ठा बघून मयंक पर्वतास आनंद झाला.त्याने हनुमानास आशीर्वाद देऊन पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

मयंक पर्वताचवा निरोप घेऊन हनुमान पुढच्या पुन्हा सागरावरुन उडू लागला.

मित्रांनो, आपण सुध्दा एखादी गोष्ट करायचं ठरवतो ना तेव्हा असच वागायला हवं. ठरवलेलं काम लहान असो की मोठं ते पूर्ण झाल्यावरच विश्रांती घ्यावी. काम करत असताना मध्येच जर आपणास विश्रांतीची इच्छा झाली वा आपल्या समोर काही आकर्षण आले तर आपण ते ताबडतोब दूर करायला हवेत. आता असं बघा की तुम्हास गणिताचा गृहपाठ करायचा आहे नि त्याच वेळेस तुमची आवडती मालिका लागलीय वा तुमचा मित्र तुम्हास खेळायला बोलावला आलाय. तर अशावेळी तुम्ही गणित पूर्ण केलं पाहिजे. नाहीतर वेळ निघून जायचा नि साध्य काहीच व्हायचं नाही. ठरवेलं काम वेळेच्या वेळी केलं की ते सुयोग्यरीत्या होतं. उत्साह कायम राहतो. काम करण्याची एक गती असते ती कायम राहते. ती मध्येच कोणत्याही कारणानं तुटली तर ती ती गती कायम राहत नाही. आता होऊ शकणारं काम पुढं ढकललं तर आत्ताच्या क्षणी असलेल्या उत्साह आणि उर्जेनेच होईल असं खात्रीशीररीत्या सांगता येत नाही. अशीच शिकवण हनुमानाच्या या कथेतून दिसून येतं.

महासागरावरुन पुढे उडत असताना एके ठिकाणी सागर निवासी अजगरांची आई सुरसाने त्याचा रस्ता रोखला. ती म्हणाली मला तुला खायचं आहेस. तू माझे भक्ष्य हो.

हनुमान तिला नम्रपणे म्हणाला, माते मी तुझा आदर करतो. मी अत्यंत महत्वाच्या कार्यसाठी जात आहे. ते काम पूर्ण करुन मी इथे येईन आणि आनंदाने तुझे भक्ष्य होईन.

मात्र सुरसा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती हनुमानाचा रस्ता अडवून बसली. ती हनुमानावर दया दाखवायला तयार नव्हती. हनुमानाला प्रश्न पडला की आता काय करावं बरं. सुरसा सोबत युध्द करण्यात वेळ गेला असता आणि त्याने ठरवललं कार्य निर्धारित वेळेत पूर्ण झालं नसतं. तेव्हा आता युक्तीनेच काम करणं गरजेचं होतं. हनुमानानं आपला आकार वाढवला. तेव्हा सुरसाने सुध्दा आपला जबडा खूप मोठा केला. हनुमानानं पुन्हा आपला आकार वाढवला. सुरसानं आपला जबडा आणखी मोठा केला. हे बघून डोळयाची पापणी लवते न लवते तोच हनुमानाने स्वत:ला खूप लहान करुन तो सुरस्याच्या जबड्यात शिरला. सुरसा जबडा बंद करत नाही तोच हनुमान अतिशय वेगानं जबड्याच्या बाहेर आला. सुरसाला हात जोडून म्हणाला. माते मी तुझे भक्ष्य बणून तुझ्या पोटात गेलो. पण तू मला खाऊ शकली नाहीस. आता तू मला माझे कार्य करण्यासाठी जाऊ दे. हनुमानाच्या चपळतेने आणि हुषारीने सुरसा आनंदली. तिने हनुमानाला पुढे जाऊ दिले आणि कामाच्या यशासाठी आशीर्वादही दिला.

मित्रांनो, हनुमानाच्या या कथेचा सार असा आहे की, वेळप्रसंग बघुनच आपण आपल्या शक्तिचा उपयोग केला पाहिजे. बरेचदा शक्तीपेक्षा युक्तीच यशस्वी ठरते. तुम्हास ती महाशक्तीशाली सिंहास शिकाऱ्यानं जाळ्यात अडकवलं तेव्हा एका उंदरांनं युक्तीनं कसं सोडवलं याची कथा ठाऊकच असणार ना. सध्या आपण शिकतोय. पुढे आणखी शिकणार. नंतर नोकरी- व्यवसाय करणार. तेव्हा आपल्यापुढे कळत-नकळत अनेक संकटं येत राहतील. तेव्हा त्यावेळी घाबरुन जायचं नाही. वेळप्रसंग पाहून आपल्या बुध्दीचा वापर शांतपणे करायचा. असं वागलं की नक्कीच मार्ग निघतो. दिशा मिळते. संकटावर मातही करता येते.

सुरसाचं संकट हुषारीने टाळून हनुमान पुढे वेगाने निघाला. पुन्हा त्याच्या मार्गात आणखी एक संकट उभे राहिले.

हे संकट उभे राहिले सागर निवासी राक्षस सिनिका हिच्या रुपानं. सागराच्या या भागावरुन जाणाऱ्या मार्गावरुन प्रत्येकास सिनिका खाली खेचून घ्यायची आणि त्याचा नायनाट करायची. सिनिका हे मत्सराचं दुसरं नावं आहे. मित्रांनो मत्सर हा कधीही चांगला नसतो. तो नेहमीच आपल्याला पाठीमागे ओढत असतो. त्याचं हे पाठीमागं ओढणं म्हणजे अपयशाच्या दरीत ढकलणं असतं. मत्सरग्रस्त व्यक्ती कधीच यशाच्या शिखरावर पोहचू शकत नाही. त्यामुळे आपल्या मनात एखाद्या बद्दल मत्सर जागृत झाला तर या मत्सरास जागीच ठेचून काढायला हवं.हनुमानानं सुध्दा सानिकाला असं क्षणात ठेचून काढलं नि आपला मार्ग मोकळा केला. मित्रांनो आपल्या वर्गात एखादा हुषार मुलगा असतो.एखादा मुलगा उत्तम चित्र काढतो.एखादा क्रिकेट चांगला खेळतो. त्याच्याबद्दल तुम्हास असूया वाटायला नको. त्याच्याबद्दल मत्सर वाटायला नको. त्याच्याकडे काही गुण असतील तुमच्याकडेही काही वेगळे गुण असतीलच ना. त्या गुणांना ओळखा आणि त्यात कशी वाढ होईल असं बघा. त्यामुळे तुम्ही खूप प्रगती कराल. मत्सरग्रस्त व्हाल तर मात्र त्यातच गुंतून राहाल नि तुमच्या प्रगतीमध्ये खूप अडथळे येतील.

तेव्हा मित्रांनो हनुमानाच्या या तीन कथा किती प्रेरणादायी आहे नाही का. हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्याच्या मूर्तीवर तेल ओता किंवा ओतू नका. हनुमान चालीसा वाचायची की नाही वाचायची नाही हे तुम्ही ठरवा. तुमचे आईबाबा सांगतात तर त्यांचं ऐका. पण त्याच बरोबर हनुमानाच्या या गुणांच्या कथा समजून घ्या. या कथेद्वारे मिळणारं ज्ञान अंगिकार करा. आजचा काळ अतिशय स्पर्धेचा आहे. तुम्हास क्षणोक्षणी वेगवेगळया क्षेत्रात या स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. या स्पर्धेमध्ये तुम्ही यशस्वी होण्यासाठी हनुमानाचे हे गुण तुम्हास निश्चित उपयोगी पडतील. हनुमान केवळ महाशक्तीमान नव्हता तर तो प्रचंड बुध्दीमान होता. प्रसंगावधनी होता. काळवेळ बघून कसं वागायचं हे त्याला कळत असे. त्याला आपल्या शक्तीचा आणि बुध्दीचा फुकाचा अभिमान नव्हता. तो न्रम होता. हाती घेतलेलं कार्य पूर्ण करण्यावर त्याने लक्ष केंद्रित केले होतं. आपलं उद्दिष्ट्य पूर्ण केल्याशिवाय विश्रांती घ्यायचीच नाही असा त्याने निर्धार केला होता. या निर्धारपूर्तीच्या मार्गात मयंक सारखा अडथळा आला पण त्याने हा अडथळा नम्रपणे पण ठामपणे पार पडला.

सुरसा नागीणेच संकट हनुमानाने बुध्दीचातुर्यानं बाजुला सारलं. यावेळी तो तिच्याशी दोन हात करत बसून वेळ दवडत बसला नाही. तर मत्सररुपी सानिकाचा त्याने एका क्षणात नायनाट करुन टाकला आणि आपल्या मार्गातील अडथळा दूर केला.

सुरेश वांदिले