खाऊ
युंगधरचे बाबा कामानिमित्ते सतत फिरतीवर असायचे. ते ज्या गावावरुन परत येत त्यावेळी युगंधरसाठी त्या गावातील किंवा शहरातील प्रसिध्द असा खाऊ घेऊन येत. त्याचं वैशिष्ट्य असं होतं की हा खाऊ छान पॅक केलेल्या कागद, प्लॅस्टिक किंवा ॲल्युनियमच्या डब्यात असायचा.
बाबा बाहेरगावून आले की बॅग आईकडे देत. आई बॅगेमधून खाऊचा डबा काढून देवापुढे ठेवी. मग युंगधरला देई. खाऊचे डबे साधारणत: एकाच आकाराचे असायचे. त्या आकाराच्या डब्यात आणलेला खाऊ दोन तीन दिवस पुरत असे.
यावेळी मात्र वेगळचं घडलं. बाबा बाहेरगावाहून आल्यानंतर त्यांची बॅग आईने घेतली. त्यातून खाउुचा डबा काढला.
त्याचा आकार नेहमीपेक्षा वेगळा होता. डबा जाडजूड होता. आईने तो डबा देवाजवळ ठेवला नि युगंधरला दिला.
त्या खाऊच्या डब्याचा आकार बघून त्यालाही आश्चर्य वाटलं. बाबांनी वेगळा खाऊ आणलेला दिसतो. तो आईला म्हणाला.
त्याला हा खाऊचा डबा उघडण्याची घाई झाली होती. बाबा अंघोळ करुन आल्यानंतर एकत्रच उघडू या, असं आईने त्याला समजावलं. युगंधरने होकारार्थी मान हलवली. बाबा दहा मिनिटांनी बाथरुम मधून ताजेतवाणे होऊन आले आणि सोफ्यावर बसले.
आता उघडू का गं खाऊ..युगंधरने आईस विचारलं.
थांब थांब..यावेळेचा खाऊ काय असेल हे खोळखू शकाल का, तुम्ही दोघेजण? आई आणि युंगधरकडे बघत बाबा म्हणाले.
अहो, आम्ही काही मनकवडे नाही किंवा जादुगारही नाही ना, तुम्ही कोणता खाउु आणलाय ते ओळखायला..आई बाबांच्या बाजूला बसत म्हणाली.
अगदी बरोबर…तिला युगंधरने पाठिंबा दिला.
अंदाज बांधायला काय हरकत आहे. बाबा हसत म्हणाले..
याचा अर्थ तुम्ही खाउु आणलाच नाही वाटतं. युगंधर चटदिशी म्हणाला.
मलाही तसच वाटतं..आईही म्हणाली.
मग,तुमच्यासमोर आहे, ते काय बरं? बाबांनी युगंधरला विचारलं.
काय म्हणजे? खाऊचा डबा किंवा खाऊच्या डब्यासारखा दिसणारा डबा..
डबा आहे हो, पण त्यात खाऊ नको का…आई मिस्किलपणे म्हणाली.
दगडं आहेत का हो बाबा त्यात..युंगधरने विचारलं.
अरे दगड्या,काहीही काय कल्पना करतोस.
मग तुम्ही येवढी उत्सुकता कां ताणताहात?आईने विचारलं.
बरं बरं नाही ताणत उत्सुकता,उघडा डबा आणि बघा नीट..बाबा हसत म्हणाले.
युगंधरची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यामुळे बाबांनी परवानगी मिळताच त्याने घाईघाईत डब्याचे कव्हर फाडले.त्या कव्हरमधून व्यवस्थित पॅक केलेले पुस्तक होतं.
छी, पुस्तक..युंगधर उत्स्फूर्तपणे बोलून गेला.
म्हणजे हे तुमचं रहस्य होत तर ..आई बाबांना म्हणाली.बाबा हसले.त्यांनी युंगधराच्या हातून ते पुस्तक घेतलं आणि आईच्या हातात सोपवलं.
राजा शिवछत्रपती…पुस्तकाचं नाव बघताच आई उद्गारली .वा वा हे पुस्तक आपल्या घरी नव्हतं.वा वा छान केलत हं तुम्ही हे पुस्तक आणलत ते..
म्हणजे माझ्यासाठी खाऊ नाही का यावेळेला?युगंधर लहान तोंड करत म्हणाला.
आईने त्याला जवळ घेतले.त्या पुस्तकाला वंदन करण्यास सांगितलं. युगंधरने ते बळबळेच केलं..
त्याच्या चेहऱ्यावरुन नाराजी स्पष्ट दिसत होती.
आई त्याच्या डोक्यावरुन हात फिरवित म्हणाली,अरे यूग, तुला नेहमी तोच तोच खाऊ मिळतो की नाही.जरी वेगवेगळया गावातील असला तरी….
हो.. तो कसाबसा म्हणाला..
त्याचा तुला कंटाळा आला नाही का?
नाही.
बरं बरं छान..पण हा खाऊ किती दिवसात संपतो.
दोन दिवसात…
किती दिवसात म्हणालास, पुन्हा एकदा सांग बघू.
दोन दिवसात..
मात्र एखादा खाऊ कधीच संपणारा नसेल आणि त्याची गोडी,आस्वाद सतत वाढणारा असेल तर..
असा कधी न संपणारा खाऊ असतो का?युगंधरने विचारलं..
मग..असतो की….
मग तुम्ही तोच कां आणला नाही बाबा.युगंधरने विचारलं.तेव्हा बाबांनी त्याच्या हातात पुस्तक ठेवलं आणि म्हणाले,
अरे, हाच तो खाऊ कधीही न संपणारा, अविट गोडिचा, भान हरपून टाकणारा …
तू वाचायला सुरुवात तर कर..म्हणजे तुझ्या लक्षात येईल या खाऊची गोडी,त्या खाऊपेक्षा कितीतरी मोठी आहे म्हणून..आई म्हणाली..
आईबाबा आपणास उगाच बनवणार नाही, याची युगंधरला खात्री होती.ते दोघेही इतक्या पोटतिडकीने सांगताहेत तर त्यांचं ऐकून पुस्तक वाचायलाच हवं असं त्याने ठरवलं. त्यानुसार जेवणानंतर वाचायला घेतलं.त्या तो इतका रमला की मध्यरात्र झाली तरी त्याला कळलं नाही..बाबांनी जेव्हा त्याला झोपेची आठवण करुन दिली तेव्हा तो दिलखुलास हसला नि बाबांच्या कुशित शिरुन त्यांना म्हणाला, थँक्यू बाबा इतका छान खाऊ आणल्याबद्दल….
सुरेश वांदिले
.jpg)