पर्वत पडला
पर्वताला स्वत:च्या ताकदिचा खूप अभिमान होता. आपणास कुणीही आपल्या स्थानावरुन हटवू शकत नाही, असं त्याला वाटायचं. हा अहंकार मनात बाळगूनच तो पर्वतावरील झाडांसोबत, त्या झाडांवर राहणाऱ्या पक्ष्यांसोबत , प्राण्यांसोबत, आकाशातील ढगांसोबत आणि वाऱ्यासोबत वागायचा. तो सर्वांना तुच्छ समजायचा.
वाऱ्याने त्याला अनेकदा समजावलं. त्याला सांगितलं की तुझ्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या वृक्षवल्लींमुळे तुझा पाया मजबूत झाला आहे. या वृक्षवल्लींच्या अवतीभोवती राहणाऱ्या पशुपक्ष्यांमुळे हे सतत फुलत राहते. त्याचे रक्षण होते. ते तसे राहिल्याने तुझ्या अंगाखांद्यावर असणारी वृक्षवल्ली कायम टिकून राहते. त्यामुळे तुही टिकून राहतो..
मात्र आपल्या शक्तीचा गर्व झालेल्या पर्वतास वाऱ्याचे हे म्हणणे पटले नाही. उलट तो वाऱ्यालाच अव्दातव्दा बोलला. त्याचा अपमान केला.
या अहंकारी पर्वतास चांगला धडा शिकवायला हवा, असे वाऱ्याने मनोमन ठरवलं. त्याला धडा शिकवायचा म्हणजे त्याला या ठिकाणाहून हलवून दुसऱ्या ठिकाणी ढकलून द्यायचं. ते तसं कठीण काम होतं. कारण वृक्षवल्लींच्या मुळांमुळे त्याचा पाया भक्कम होता. या वृक्षवल्लींना हटवल्याशिवाय पर्वताला हलवणं शक्य नव्हतं. शिवाय या वृक्षवल्लींच्या साहाय्याने राहणारे पशुपक्षी संकटात आले असते. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होती. अखेर वारा इंद्र देवाकडे गेला. त्याने इंद्रदेवाला सारे काही कथन केले. इंद्र देवासही पर्वताच्या अहंकाराचा राग आला. आपण आधी पर्वतास समजावून सांगू , ऐकला तर चांगलच आहे .नाही ऐकला तर मात्र त्याला शिक्षा करु, असं इंद्र देव वाऱ्याला म्हणाले.
इंद्र देव पर्वतासमोर प्रगटले. आपल्या अहंकाराने फुगलेल्या पर्वताने त्यांना नमस्कार सुध्दा केला नाही. इंद्र देवांनी त्याला, असा अहंकार बरा नसून त्यामुळे तुझे होत्याचे नव्हते होऊ शकते असं समजावलं.
पर्वताने इंद्र देवाकडे तुच्छतेने बघितले.अरे इंद्रा, माझे स्थान इतके पक्के आहे की तू आाणि इतर दहा देव जरी आलेत ना इथे तरी माझे स्थान तुम्ही हिरावू शकत नाही. खरतर मीच या सृष्टिचा राजा होण्याचा पात्रतेचा आहे. तुला कोणत्या मुर्खाने राजा केले कुणास ठाऊक..असं बोलून पर्वत जोरजोरात हसू लागला.
त्याच्या या बोलण्याचा इंद्र देवांना राग येणे स्वाभाविकच होते. पण त्यांनी पुन्हा एकदा पर्वतास समजवण्याचा प्रयत्न केला पण इंद्र देवांचा पुन्हा अपमान केला.
आता मात्र इंद्र देवांनी ठरवले की या घमेंडी पर्वतास शिक्षा करायला पाहिजे. त्यांनी मंत्र म्हणून पर्वतावरील सर्व वृक्षवल्ली आणि प्राणी पक्षांना सुरक्षितपणे एका जंगलात पोहचवले.
अंगावरील वृक्षवल्ली जाताच, पर्वत हलू लागला.आपला बळकटपणा गेल्याचा त्याला भास होऊ लागला. त्याला किंचित भीतीही वाटली. पण त्याने लगेच या भीतीला बाजूला सारुन इंद्र देवाला आपल्या नजरेसमोरुन दूर व्हायला सांगितलं. जाता जाता इंद्र देवांनी वाऱ्यास इशारा केला. वारा खूप जोराने वाहू लागला. या वाऱ्याच्या वेग पर्वतास सहन होईना. तो स्वत:ला सांभाळण्याचा खूप प्रयत्न करु लागला. पण त्याला स्वत:चा तोल सांभाळणे कठीण जाऊ लागले. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे पर्वतावरील दगड-धोंडे-माती उडून जाऊ लागले. पर्वत आता मुळापासून हलू लागला..त्याला स्वत:ला सांभाळणे अशक्य झाले. आता मात्र तो पुरता घाबरला. वाऱ्याला थांबण्यासाठी तो विनवणी करु लागला. पण वाऱ्याने काही दाद दिली नाही..बघता बघता पर्वत जमीनदोस्त झाला. त्यानंतर इंद्र देवाने त्याला थांबण्यास सांगितले.
वारा वाहायचा थांबला..इंद्र देवाने त्याला शाबासकी दिली आणि सांगितले की, वाऱ्या गर्व आणि अहंकाराने फुगलेल्यांच्या नशिबी हेच येत असतं…हा पर्वत तुझ्यामुळे जमिनदोस्त झाला असा अहंकार बाळगू नकोस, नाही तर तुझाही अवस्था या पर्वतासारखी व्हायची….
वारा काय समजायचं ते समजून गेला. पर्वतासारखे कधी उतल्या मातल्या सारखं वागायचं नाही, हे त्याने मनोमन ठरवून टाकलं.
सुरेश वांदिले
