सुट्टित चौफेर टीव्ही
सुट्या लागल्यावर कॉलनीतली, रश्मी, रेखा, राघव, तेजस, कल्याणी, पिंटू, पिंकी, टिल्लू, प्रदीप ही टोळी मारुतीरायाच्या मंदिरात गोळा झाली.मारुतीरायांना मनोभावे नमस्कार केला की मग ही टोळी, त्यांना जे काही करायचय ते करत किंवा बोलाचय ते बोलत. आपण जे काही करु त्याला मारोतीरायांची संमती आणि आशीर्वाद आहे, असं टोळीतल्या प्रत्येकास वाटायचं.
यंदाच्या सुटित काय करायचं रे आपण?रश्मीने चर्चेला सुरुवात केली.
यंदाची सुटी सत्करणी लावू या.तेजस म्हणाला.
म्हणजे रे काय करायचं? टोळीतील राघव म्हणाला.
काय करायच रे मारुतरीराया? रेखानं मारुतीरायाकडे बघत विचारलं.मारुतीराया मात्र आपले ढिम्म.
हे बघ त्यांना काय विचारायचय, आपणच ठरवू या की.पिंटू म्हणाला.
पण सत्करणी म्हणजे रे काय? राघवने पुन्हा विचारलं.
म्हणजे उगाचच टाईमपास करायचा नाही.
आपण कुठे करतो टाईमपास.टिल्लू म्हणाला.
आपल्या आईबाबांना वाटत ना तसं.
टीव्ही समोर दिसलो की त्यांना वाटतं, मी टाइमपासच करतो. राघवने सांगितलं.
माझ्यापण आई बाबांना तसच वाटतं.टिल्लू म्हणाला
सगळ्यांच्या घरीच तसच रे. आई बाबा टीव्हीसमोर दोन दोन तीन तीन तास बसतात तेव्हा त्यांना टाईमपास वाटत नाही.कमालच आहे की नाही.
त्यांचा जर टाईमपास नाही तर आपला कसा?पिंकीने मुद्द्यास हात घातला.
मग आपण आई-बाबांना समजावून सांगू या का? की टीव्ही बघणं हा टाईमपास नाही म्हणून.
हे कोण आणि कसं सांगणार? हे तर मांजरीच्या गळयात घंटी बांधण्यासारखं झालं.
बांधून तर बघू. जमलं तर छान. नाही तर गेलं उडत. रेखा म्हणाली.
पण मला असं वाटतं की आपल्या आईबाबांचा विरोध टीव्ही बघण्याला नसावाच.आपण जे चिकटून बसतो ना तास न तास त्याला असला पाहिजे. रश्मी जरा समजुतदारपणे म्हणाली.
मला सुध्दा तसच वाटतं. खर तर तेच ते पाहत बसतो आपण सुध्दा नि डोळे दुखवतो,चरत बसतो.तेजसनं सांगितलं.
हो यार मी सुध्दा असच करतो.पिंटूनं होकार भरला.
मी सुध्दा.राघवनेही कबुली दिली.
हेच आईबाबांना आवडत नसावं.रश्मी म्हणाली.
आम्ही असं टीव्हील चिटकून बघणार नाही. चोवीस तास कार्टून किंवा आयपीएल क्रिकेट बघणार नाही.अधूनमधून ॲनिमल प्लॅनेट बघू, डिस्कव्हरी चॅनेल बघू, बातम्या बघण्याची सवय लावून घेऊ.म्हणजे कसं चौफेर वाचनासारख चौफेर टीव्ही बघू..राघव म्हणाला.
काय मारुतीराया, हे सकारात्मक होईल ना. रश्मीने हसून त्यांच्याकडे बघितले.मारुतीरायांनी गदा हलवून त्यास संमती दिल्याचा भास टोळीला झाला.
सुरेश वांदिले
.jpg)