(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

प्रेमळ वाघोबा

समीरला नुकतच त्याच्या बाबांनी एक डिजिटल कॅमेरा घेऊन दिला. त्यामुळे स्वारी खुष होती. समीरचे बाबा शिक्षक होते. एटापल्लीत ते राहत. एटापल्लीचा परिसर जंगलाने वेढलेला. या परिसरात समीर अधूनमधून फेरफटका मारायचा. वाघच नव्हे तर अस्वल, बिबट, कोल्हा हे जंगलीप्राणी कधीही आक्रमण करु शकतात, त्यामुळे जंगलात फार दूरवर जाऊ नकोस असी सक्त ताकीद बाबांनी दिली होती. या सूचनेचं पालन समीर, तंतोतंत करत असे.

कॅमेरा मिळाल्यावर आपण जंगलात कधी जातो नि तेथील पशू-पक्षी-वृक्ष-वेली यांचे फोटो काढतो असं त्याला झालं होतं.

एके दिवशी तो सकाळीच आईबाबांना सांगून जंगल भ्रमंतीस निघाला. मोठ्या थाटात त्याने गळ्यात कॅमेरा लटकावला. त्याला एकदम भारी वाटत होतं.

सांभाळून राजा,आई त्याला म्हणाली.मी सांगितल्याप्रमाणे जंगलात खूप दूर जाऊ नकास रे..बाबा म्हणले.दोघांनांही हो हो म्हणून समीरने सायकलवर टांग मारली व तो जंगलाच्या दिशेन धूम निघाला. सायकलवर बसून काही फोटो काढणं जमणार नाही हे त्याच्या लक्षात आल्यानं एके ठिकाणी तो थांबला. त्याने सायकल लावली. तो पैदलच पुढे जाऊ लागला. त्याला रंगीबेरंगी पक्षी दिसताच त्याने भराभर त्यांचे फोटो काढले. झाडे, वेली, किटक, हरीण, गवे यांचे फोटो काढत काढत तो समोर समोर जात राहिला. त्यामुळे जंगलात किती दूर आलो हे काही त्याला कळलं नाही.

असचं समोर जात असताना, काही अंतरावर एक वाघोबा रस्ता ओलांडताना समीरला दिसला. वाघोबाचं समीरकडे लक्ष नव्हतं. समीरने कॅमेराचा कोन व्यवस्थित करुन क्लिक केलं. त्या आवाजाने किंवा  बॅटरिच्या प्रकाशामुळे म्हणा रस्ता ओलांडत असणाऱ्या वाघाने समीरकडे बघितलं. वाघ तिथेच थांबला. कॅमेरा डोळ्याला लावला असल्यामुळे समीरला वाघ आपल्यापासून किती दूर आहे हे लक्षात आलं नाही. वाघाचे वेगवेगळया भावमुद्रांमधले फोटो काढण्यात तो दंगून गेला..

०००

या मुलाला आपली भीती वाटत नाही की, फुकाचीच बहादुरकी दाखवण्याची खुमखुमी आलीय की जीवावर उदार झालाय की वाघास पालापाचोळा समजतो हा मूर्ख..असे विचार वाघोबांच्या मनात येत होते. समीर त्याच्याकडे येत असताना वाघ जागीच थांबून त्याच्याकडे एकटक बघत होता.

या मूर्खाला नक्कीच त्याच्या आईबाबांनी समजावून सांगितलं असणार की जंगली श्वापदांपासून सावध राहा म्हणून..पण विसरलेला दिसतो त्यांची शिकवण.याला शिक्षा करायलाच हवी.वाघ मनात म्हणाला.

पण काय शिक्षा करणार? याला ठार मारणार ..छे छे…निष्पाप दिसतो बिचारा, आणि आत्ताच तर हरणारवर मस्त मेजवाणी झाली की आपली.जेव्हा गरज असेल तेव्हाच शिकार करायची, ही आपल्या आईने दिलेली शिकवण कशी विसरायची.आई आपल्या भल्यासाठीच सांगते ना.वाघास आठवलं आणि त्याने समीरवर हल्ला करण्याचा विचार झुरळासारखा झटकून टाकला. पण या मूर्ख मुलाला अद्दल तर घडवलीच पाहिजे. नाहीतर हा असाच वागून स्वत:चा जीव धोक्यात घालायचा. वाघ मनात म्हणाला. त्याने मोठी डरकाळी फोडली. तो आवाज ऐकून समीर एकदम गडबडला. डोळ्यासमोर असलेला कॅमेरा धाडदिशी खाली आला. आपल्या काही अंतरावर वाघोबा उभा बघून त्याचे पाय लटपटू लागले. घशाला कोरड पडली. डोळयासमोर अंधारी आली. वाघोबाने पुन्हा डरकाळी फोडली.समीरला भोवळ येता येता राहिली. संपूर्ण शरीरास कंप सुटला…पायातले त्राण गेलेच होते..

आता आपलं काही खरं नाही, हे त्याने आळखलं. त्याने डोळे बंद केले. त्याच वेळी जंगलाची निगराणी करण्यासाठी असलेल्या वनकर्मचाऱ्यांचं वाहन त्याबाजूनं आलं. त्या आवाजाने वाघ रस्त्याच्या दुस-या बाजूला निघून गेला. वाहन थांबवून एका वन कर्मचाऱ्याने, डोळे मिटून थरथर कापत असलेल्या समीरचे खांदे धरुन हलवलं….

वाचवा वाचवा असं, डोळे न उघडताच समीर ओरडत होता.  अरे, वाघ गेला इथून, डोळे उघड आता. पण समीर भीतीने इतका थरथर कापत होता की त्याच्याच्याने चालवेना व डोळेही उघडवेना.हे बघून दोन वनकर्मचाऱ्यांनी कसबसं त्याला उचललं. वाहनात नेऊन बसवलं. वाहन सुरु झाल्यावर थंडगार हव्यामुळे समीरला किंचित बरं वाटलं. त्याने डोळे किलकिले केले. समोर वाघ नसल्याचं बघून त्याच्या जीवात जीव आला. पण आपण या अनोळखी वाहनात कसे, या प्रश्न मनात येऊन समीर पुन्हा घाबरला…तो त त पप करु लागला..

त्याने डोळे उघडल्याचे बघून एका वन कर्मचाऱ्याने त्याला पाणी दिलं. त्याने कसेतरी दोन घूट पाणी पिलं. त्याला आणखी बरं वाटलं. वनकर्मचाऱ्यांनी काय घडलं हे समीरला सगळं सांगितलं. त्याचं नाव पत्ता विचारला.ते त्याला घेऊन समीरच्या घरी आले..

वनकर्मचा-यांची गाडी घरासमोर उभी राहिल्याबरोबर घरातून समीरचे आईबाबा धावत आले. समीरच्या बाबतीत काही वाईट तर घडलं नाही ना असं त्या दोघांनांही वाटलं. गाडीतून घाबरलेला समीर उतरत असल्याचे दिसल्यावर त्यांच्या जीवात जीव आला.

समीरने आईबाबांना बघितलं आणि तो ओक्साबोक्सी रडू लागला.

बाबांनी सर्वांना आत बोलावलं .आईस चहा करण्यास सांगितलं.समीर असा कां घाबरला, असं त्यांनी एका जणास विचारलं.

तेव्हा समीर वाघासमोर उभा असल्याचं आम्ही बघितलं.आम्ही वेळेवर पोहलचो नसतो तर आज कदाचित वाघाने समीरवर हल्लाच केला असता, असं त्यातील एका जणाने सांगितलं..हे ऐकून बाबांच्या अंगावर काटा आला…

आतापर्यंत चूप असलेले वनाधिकारी म्हणाले. वाघाची स्वाभाविक प्रवृत्ती हल्ला करण्याची असली तरी एखादा वाघ प्रेमळही राहू शकतो. समीर या वाघाच्या इतक्या जवळ जाउुनही त्याने याला काहीच केलं नाही याचा अर्थ तो प्रेमळ आणि निष्कारण कुणाला इजा न पोहचवणारा वाघ असला पाहिजे.

खरच, मागच्या जन्माची पुण्याई म्हणूनच असा वाघ समीरच्या समोर आला म्हणायचा..बाबा म्हणाले.

अरे, पण तू त्या वाघाजवळ गेलाच कसा..वनाधिकाऱ्यांनी त्याला विचारलं..

समीर बराच वेळ काहीच बोलला नाही. मान खाली घालून तो बसला होता.ही मंडळी गेल्यावर बाबा आपल्यास सोलून काढतील या कल्पनेने त्याच्या पोटात भीतीचा गोळा उठला होता..

तो काहीच बोलत नसल्याचे बघून वनाधिकारी त्याच्या जवळ गेले.त्याच्या डोक्यावरुन हात फिरवित म्हणाले,

अरे, तू घाबरु नकोस..आता तू सुखरुप आहेस.पण तू त्या वाघापर्यंत पोहचलास हे कळलं तर तुला खबरादारी घ्यायला आणि आम्हास इतरांना सांगायला बरं होईल ना.

त्यांच्या प्रेमळ स्पर्शाने आणि मृदू आवाजाने समीरला थोडा धीर आला.त्याने मग मान वर करुन, फोटो काढत काढत वाघापर्यंत कसा पोहचलो याची हकिकत सांगितली.

अच्छा तर वाघाने डरकाळी देऊन तुला सावध केले होते म्हणायचं. तरी सुध्दा तू ऐकलं नाहीस. उलट त्याच्या जवळ जवळ जात राहिलास.वनाधिकारी म्हणाले..

होय काका.समीर कसाबसा म्हणाला

अरे समीर, वाघासारख्या वन्य प्राण्यास त्यांच्या जीवनात लुडबूड केलेली आवडत नाही. तरी आपण मात्र तिकडे लक्ष देत नाही. वाघ तर स्वत:हून हल्लाही करत नाही. पण त्याच्यावर कुणी हल्ला करत असेल, त्याच्या मार्गात येत असेल तर मात्र त्याला तो सोडत नाही…डरकाळी फोडून तो तुला तेच सांगत होता की माझ्यामार्गात येऊ नकोस..स्वत:चा जीव धोक्यात घालू नकोस…पण तू काही ते ऐकलं नाहीस..बरं झालं आम्ही वेळेवर पोहचलो म्हणून..

तरी साहेब, मी याला वारंवार सांगितलय की जंगलात  फार खोलवर जाऊ नकोस म्हणून, आजपर्यंत तर त्याने ऐकलं माझं.आजच कसा काय विसरला कुणास ठाऊक? बाबा म्हणाले

अहो, याच्या गळयातील या कॅमेराने त्याला विसरायला लावलं.समीरच्या गळयात अजूनही लोंबकळत असलेल्या कॅमेराकडे बोट दाखवत वनाधिकारी म्हणाले.त्यांनी समीरच्या डोक्यातून तो कॅमेरा काढला.या गडबडित कॅमेरास काही झालं नव्हतं. त्यांनी कॅमेरा सुरु केला. समीरने टिपलेला वाघोबा स्क्रीनवर येताच ते आनंदले. चला, हे आहे तर आपल्या शिकारीस सावध करणारे प्रेमळ वाघोबा. वा वा वा..समीर, या वाघाचे इतके चांगले फोटो आम्हास सुध्दा मिळाले नव्हते. पण तुझ्या वेड्या धाडसामुळे ते आम्हाला मिळाले…शाब्बास..

चहापाणी झाल्यावर वनाधिकारी जायला निघाले..जाताना त्यांनी पुन्हा समीरच्या डोक्यावरुन हात फिरवला..

त्याला म्हणाले…आपले आईबाबा जे सांगतात, ते पक्क लक्षात ठेवलं ना की असं संकट अंगावर येत नाही आणि हो प्रत्येक वेळी वाघोबा प्रेमळच असतील असंही नाही.तेव्हा यापुढे काळजी घे…

समीर वनाधिकाऱ्यांना घट्ट बिलगला आणि धाय मोकलून रडू लागला….

सुरेश वांदिले