चक्रम गरुडेश्वर
पक्षांचा राजा गरुडेश्वर कधीकधी फार चक्रमपणे वागायाचा. त्यांच्या आईसाहेबांनी त्यांना कितीदा समजावलं की अशा वागण्याने तुमचंच हसू होतं. पण गरुडेश्वर या कानाने ऐकायचा नि त्या कानाने सोडून द्यायचा.
आपण राजा असल्याने कसही म्हणजे चक्रमपणे नाहीतर विक्रमपणे वागू शकतो असं त्याला वाटायचं. सांगून सांगून अखेर आईसाहेब कंटाळून गेल्या. तुझ्या चक्रमपणापायी एक दिवस तुला कुणी विचारणार नाही. तेव्हा जे दु:ख होईल, तेव्हा मात्र माझ्याकडे येउुन नकोस मदत मागायला. आईसाहेबांनी गरुडेश्वरास निक्षूण सांगितलं. गरुडेश्वराने आईसाहेबांचं म्हणणं हसण्यावारी नेलं. त्याचं वय जसं जसं वाढत होतं,तसं तसं तो अधिकच चक्रमपणे वागायला लागला.
एकदा त्याने पक्ष्यांच्या सर्वात सुंदर मुलाची स्पर्धा लावली. हे जेव्हा आईसाहेबांना कळलं, तेव्हा नाईलाजाने गरुडेश्वरांकडे गेल्या आणि त्याला समजावत म्हणाल्या..
अरे, असली कसली स्पर्धा लावतोस? प्रत्येक पक्षाला त्याचं मूल, त्यचं पिल्लू सर्वात सुंदरच वाटत असतं. कुणालाही आपलं पिल्लू कुरुप आहे, असं वाटत नाही. अशी स्पर्धा म्हणजे आपल्याच प्रजेला हिणवण्यासारखं आहे. तुझ्या या स्पर्धेत कुणीही सहभाग होणार नाही बघ..
नेहमीप्रमाणे गरुडेश्वराने आईसाहेबांचे म्हणणे हसण्यावारी नेले. गरुडेश्वर ऐकत नाही हे बघून आईसाहेबांनी त्याचा पिच्छा सोडला.
स्पर्धेचा दिवस उजाडला. गरुडेश्वर सकाळीच दरबारात जाऊन बसला. सगळयात सुंदर पिल्लू बघण्याची त्याची उत्सुकता प्रत्येक प्रहारी वाढतच राहिली. पण एक प्रहर झाला. दुसरा संपला. तरी एकही पक्षी आपल्या पिल्लूला घेऊन आलं नाही. संध्याकाळ होताच स्पर्धेचा वेळ संपला तरी कुणी आलं नाही. अगदी गरुड महाराणींनी सुध्दा त्यांचं पिल्लू दरबारात आणलं.नाही.
आईसाहेबांचं म्हणनं खरं ठरलं होतं. आपले प्रजाजन आपलं ऐकत नाही याचं मोठ्ठ दु:ख गरुडेश्वरास झालं. त्या दु:खातच तो राजवाड्यात न जाता नदीकिनारी जाऊन अश्रू ढाळत बसला. जोरजाराने हुंदके देऊ लागला..
त्याचवेळी त्या रस्त्यावरुन जात असलेल्या एका ऋषिंनी तो आवाज ऐकला. ते गरुडेश्वराजवळ गेले.
ऋषिंना बघून गरुडेश्वराने रडणे थांबवलं. त्याने ऋषिंना नमस्कार केला.
ऋषिंनी त्याला दु:खाचं कारणं विचारलं..
तेव्हा गरुडेश्वरानं सगळं काही सांगितलं..
ऋषी म्हणाले, गरुडेश्वरा तुमच्या आईसाहेबांचं सांगणं तुम्ही ऐकलं असतं तर हा दिवस तुम्हाला बघायला मिळाला नसता. आईपेक्षा तुमचा अहंकाराच मोठा ठरला..
महाराज मला क्षमा करा… गरुडेश्वर रडत म्हणाला.
गरुडेश्वरा, मी म्हणतो, सुंदर पिल्लांची स्पर्धा लावायचीच कशाला? आईसाहेब म्हणाल्या त्याप्रमाणे प्रत्येक पक्षाला त्याचच पिल्लू सुंदर वाटणर ना.. गरुडेश्वरा दिसण्याचं सौंदर्य फार कामाचं नसतं. आपलं मन सुंदर पाहिजे, निर्मळ पाहिजे. तसं असेल ना तर सगळच आपल्याला सुंदर दिसतं. त्याचा आनंद घेता येतो. तुम्ही तुमच मन सुंदर करा म्हणजे तुम्हाला चक्रमपणे वागण्याची दुर्बध्दी सुचणार नाही. ही दुर्बुध्दी गेली की तुमचे प्रजाजनही तुमचं सारं काही ऐकायला लागतील..ऋषिंनी गरुडेश्वरास समजावलं. गरुडेश्वरास ते पटलं. पुन्हा त्याने कधी चक्रमपणा केला नाही..त्यामुळे तो आपल्या प्रजेच्या गळयातील ताईत झाला…..
सुरेश वांदिले
.jpg)