मामिचं राजकारण
आई, नेहमी तिच्या भावाच्या बायकोचं म्हणजे तेजोमयीच्या मामीचं वर्णन पक्की राजकारणी आहे, असं करायची. नेहमीच मामीचं वर्णन राजकारणी म्हणून आई कां करते? याचा अर्थ काय, असं एकदा तेजोमयीनं बाबांना विचारलं. बाबांनी यावर फक्त स्मित केलं. मोठी झाल्यावर कळेल तुला सारं असं काहीसं बोलले. तेव्हा बाबांना मी मोठी कधी होणार, हा प्रश्न तेजोमयीस विचारावा वाटला. पण आता ते विचारणं शहाणपणाचं नाही असं तिच्या लक्षात आल्याने ती काहीच बोलली नाही.
काय रे अलेक्झू, मी बरोबर केलेय ना… तेजोमयीनं अलेक्झांडरला विचारलं. आपल्याला तेजोमयी काहीतरी विचारतेय म्हंटल्यावर त्याने तिच्याकडे मान वर करुन त्याने बघितलं. चेहऱ्यावर गंभीर भाव आणत नकारार्थी मान हलवली.
हेच तुला आईनं विचारलं असतं तर ताबडतोब डोळे मोठ्ठे करुन आणि शेपूट हालवून, कळलं सारं असं सांगितलं असतं, तेजोमयीने अलेक्झांडरकडे नाराजी व्यक्त केली. यावर काहीही प्रतिक्रिया न व्यक्त करता, अलेक्झांडर आडवा झाला नि त्याने डोळे मिटून घेतले.
आता आपण आईलाच हा प्रश्न विचारायला हवं असं तेजोमयीने पक्कं ठरवलं. कसं विचारायचं याचा विचार करत असतानाच, आई दिवाणखान्यात आली आणि तेजोमयीस म्हणाली..
अगं कशल्या विचारात एवढी गढून गेलीस गं तू, मी इथे आले ते सुध्दा तुला कळलं नाही..
हो का..कधी आलीस तू इथे आई..
ते महत्वाचं नाही..तू एवढया कोणत्या गहन विषयात गढून गेली होतीस हे विचारलं मी..
अं.. हं.. ते होय..अगं, एक प्रश्न माझ्या मनात आला..याचं उत्तर बाबांनी काही दिलं नाही. म्हंटलं, तू रागावणार नसशील तर विचारावं..
विचार विचार..माझं रागावणं काय नित्याचच झालय. माझ्या रागाच्या अध्येमध्ये तुझ्या प्रश्नांना येऊ देऊ नकोस…आई जरा खुषितच म्हणाली..
बर तर..आई,तू मामिला सारखी पक्की राजकारणी आहेस असं का म्हणतेस गं..
खर तर हा प्रश्न म्हणजे आईसाठी बॉब्मगोळाच होता. आईची काय प्रतिक्रिया येते, याची उत्सुकता तेजोमयीस लागली. धपाटा नाही मिळाला म्हणजे मिळवलं,असं ती मनात म्हणाली.
तेजोमयीकडे बघत आई हसली.
अगं, तू हसतेस का? नाही सांगायचं का तुला..
तसं नाही गं..पण कसं सांगावं असा विचार करतेय मी..
म्हणजे मामीचं राजकारण इतकं विचार करण्यासारखं आहे..
अं..तसं समज..
मग ते वाईट आहे की चांगलं आहे आई..
काय चांगलं नि काय वाईट..या चर्चेत सहभागी होत बाबांनी विचारलं.आई खोलित आल्याबरोबर आडवा पडलेला अलेक्झांडर उठून बसला. तिघांकडेही आळीपाळीने बघू लागला..आपल्याला सुध्दा या चर्चेत रस असल्याची सांगण्याची त्याची ही रित होती.
काय हो, चांगलं वाईटाची कशाबद्दल मायलेकिची चर्चा सुरु होती..बाबांनी आईला विचारलं.
राजकारण चांगलं की वाईट असं तेजोमयी विचारत होती..
म्हणजे मामीचंच ना..बाबांनी विचारलं..
तुम्हाला तिने विचारलं म्हणे..पण तुम्ही काही उत्तर दिलं नाही.तुम्ही सुध्दा पक्के राजकारणी आहात..
आँ..तेजोमयी म्हणाली..मामी राजकारणी बाबाही राजकारणी..असं कां बर म्हणतेय आई…याविषयी तिने आईला विचारलं..
अगं काही नाही गं..सोईस्कर बोलणं, सोईस्कर वागणं आणि सोईस्कर चूप बसणं..हे तुझ्या बाबांना चांगलं जमत ना..म्हणून त्यांना राजकारणी आहे असं म्हंटलं मी..
मामी सुध्दा असच करते का..
अगं पक्की लावालावी करणारी आहे. इकडचं तिकडे सांग नि तिकडचं इकडे सांग…
याला राजकारण म्हणतात..
अगं, माझी परीक्षा घेणं थांबव बाई,आई म्हणाली..
म्हणजे परवा परवा संपलेल्या निवडणुकीत असच झालं का..काय हो बाबा..
बाबा पुन्हा हसले..
अहो बाबा हसू नका ना….मी दोनदा तुम्हाला राजकारणाचं विचारलं..तर तुम्ही हसलात..राजकारण म्हणजे, हसणे की काय..तेजोमयी बाबांकडे बघत म्हणाली.
अगं, राजकारण समजून घेण्यासाठी लहान आहेस तू अजून आई म्हणाली.
अरे वा..बाबा सुध्दा हेच म्हणाले मघा..अगं मी १३ वर्षाची आहे.मला काहीच समजत नाही असं कसं…समजत नसेल तर समजावून सांगा ना..शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने स्वराज्य स्थापनेविषयी सांगितलं तेव्हा ते १३ वर्षाचेच होते..
हो का…आई सहजच बोलून गेली..
महाराजांच्या आईला त्यांचं १३ वं वर्षं ते लहान असल्याचं वाटलं नाही..मग तुम्हाला कां बरं मी १३ व्या वर्षी लहानच आहे असं वाटत..
तसं नाही तेजो..राजकारण म्हणजे जरा क्लिष्ट विषय आहे ना..
असू दे की..क्लिष्ट-किचकट गणित समजतं की नाही मला..
हो समजतं की..
मग तुम्ही मला समजावून सांगितलं तर हे क्लिष्ट राजकारणही समजेल की…सदैव खाण्यापिणे बागडणे,टीव्ही क्रिकेट ,मार्क्स,स्पर्धा यावरच बोललं पाहिजे असं नाही ना…तेजोमयी म्हणाली..
बाबा यावर काहीतरी बोलणार तोच मम्मीचा फोन वाजला..
कुणाचा गं..तेजोमयीनं विचारलं..
मामीचा..
अरे वा..तू इकडे तिच्या राजकारणाचा उध्दार करत होतीस म्हणून तिला तिकडे उचकी लागली बघ..बाबा, आईकडे बघून हसत हसत म्हणाले..त्यांनी हळूच तिथून काढता पाय घेतला..आई फोनवरुन बोलत बोलत दुसऱ्या खोलित गेली..
पक्के राजकारणी आहेत दोघेही..असं तेजोमयी तिच्या नकळत बोलून गेली.
अलेक्झांडरने तिच्याकडे डोळे टप्पोरे करत बघितलं..म्हणजे कळलं की काय तुला राजकारणाचा अर्थ..असे भाव त्याच्या डोळयात उमटले होते..
सुरेश वांदिले
