मूर्खांचा राजा
दरबार भरला होता. बादशहा अकबर आपल्या नवरत्नांसह गप्पा गोष्टींमध्ये रंगला होता. या गप्पा सुरु असताना, अचानक त्याने नवरत्नांना प्रश्न विचारला.
जगात कुठे मुर्खांचा राजा असू शकतो का? असल्यास त्याचा जो शोध घेईल त्याला आपण पंतप्रधान करु आणि मोठी जहागिरीही देऊ. आठ रत्नांनी आपआपली मतं सांगितली. त्यांना वाटलं की असा राजा नक्कीच असेल पण त्याला शोधता येणं कठीण. बिरबलानं काहीच मत दिलं नाही.
काय बिरबल, तुला प्रधानमंत्री पद आणि जहागिरी नको आहे वाटतं…अकबर बिरबलाला उद्देशून म्हणाला. यावर बिरबल फक्त हसला. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा अकबर त्यास म्हणाला,
बिरबला अशी संधी आयुष्यात एकदाच मिळत असते. तीच तुला घ्यायची नसेल तर आम्ही तरी काय करणार. जाऊ दे,तू या स्पर्धेतून बाद.आता उर्वरित ८ नवरत्नांपैकी जो कुणी सर्वात आधी मूर्खांचा राजा शोधून काढेल त्याला आम्ही पंतप्रधान करु आणि त्याला जहागिरीही देऊ.
हो नाही करत आठ नवरत्नांनी बादशहाचे हे आव्हान स्वीकारले. अकबराने त्यांना एक महिन्याचा वेळ दिला. मुर्खांचा राजा शोधायला आठ रत्ने निघून गेले. बिरबलाने अकबराचा निरोप घेऊन घराचा रस्ता पकडला.
आठ रत्नांनी इकडेतिकडे खूप शोध घेतला. पण कुणालाही मूर्खांचा राजा सापडला नाही. महिन्याभरानंतर आठहीजण दरबारात हजर झाले.अकबरास मोठी उत्सुकता लागून गेली होती. त्याने तत्काळ सर्वांना विचारणा केली. मात्र सर्वांच्या माना खाली गेल्या.
याचा अर्थ तुम्हा कुणालाही मूर्खांच्या राजाच्या शोध लागला नाही म्हणायचा. अकबराने रागावून विचारलं.
होय खाविंद, आठही रत्न एका सुरात खाली मान घालून म्हणाले.
काय मूर्ख आहात रे तुम्ही सगळेजण.. असं अकबर बोलून गेला. तेव्हा दरबारात उपस्थित असलेला बिरबल तातडीने आपल्या आसनावरुन उभा राहत म्हणाला..
खाविंद क्षमा असावी,असं मध्येच बोलण्यासाठी..पण मला मूर्खाचा राजा मिळाला आहे,हे सांगायचं होतं..
आठ रत्नांसह सर्व दरबाऱ्यांनी आश्चर्याने बिरबलाकडे बघितलं.अकबर सिंहासनावरुन ताडकन उठला. उंच आवाजात म्हणाला, अरे बिरबला,तू तर कुठेच गेला नव्हतास ना…मूर्खांच्या राजाला शोधण्यासाठी मग,तुला कुठे आणि कधी भेटला हा राजा..
खाविंद, मला आत्ताच आणि इथेच तो भेटला..बिरबल नम्रपणे म्हणाला.
आठरत्नांसह दरबारी एकमेकांकडे बघू लागले. बिरबल नेहमीप्रमाणे बादशहाला मूर्ख बनवत असल्याचे बऱ्याच दरबाऱ्यांना वाटले. अकबरानेही इकडे तिकडे मान वळवून बघितली.कुणीच राजा न दिसल्याने,अकबर बिरबलाला रागावून म्हणाला..
बिरबला,आम्हास मूर्ख बनवू नकोस..तो राजा इथे आहे तर आम्हास कसा काय दिसत नाही…
खाविंद क्षमा असावी,मी आपणास त्याचे दर्शन घडवतो..मला सांगा या आठ रत्नांची निर्भत्सना,तुम्ही काही क्षणापूर्वी अरे, मूर्खांनो म्हणून केली ना..
हो हो केली…अकबर म्हणाला..
त्यांचा राजा कोण….
कोण म्हणजे.. हा काय प्रश्न झाला..आम्हीच की..
म्हणजे या मूर्खांचे राजे तुम्हीच असच ना… येणारे हसू दाबत, बिरबल कसा बसा म्हणाला..
अकबरालाही हसू आलं…बिरबलाच्या हुषारीपुढे आपण टिकू शकत नाही याची पुन्हा एकदा खात्री आठ रत्नांसह दरबाऱ्यांना झाली.अर्थातच अकबराने कबूल केल्याप्रमाणे बिरबलास पंतप्रधान केलं आणि त्याला जहागिरीही दिली.
सुरेश वांदिले
