(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आतिथ्यशीलता आणि पंचतारांकीत संधी

हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटेरिंग तंत्रज्ञान या विषयात शिक्षण आणि प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या विविध संधी सुलभेतेने मिळू शकतात. विशेषत: नॅशनल काउंसिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी (एनसीएचएम ॲण्ड सीटी), या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय संस्थांमध्ये प्रवेश घेतल्यास, हॉटेल व्यवस्थापन आणि कॅटेरिंग तंत्रज्ञानाचे अद्ययावत ज्ञान मिळू शकते. या संस्थांमधील प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील, “नॅशनल काउंसिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट- जाईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (एनसीएचएम – जेइइ)” चाळणी परीक्षा द्यावी लागते. त्याद्वारे देशातील सर्वोत्कृष्ट ५१ संस्थांमधील, “बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड कॅटरिंग मॅनेजमेंट,” या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.(२१ संस्था या केंद्रीय अर्थसाहाय्यित आहेत. २९ राज्य सरकारांच्या अखत्यारित आहेत, १ सार्वजनिक क्षेत्रातील आहे आणि २५ खाजगी संस्था आहेत.)

या परीक्षेव्दारे महाराष्ट्रातील पुढील संस्थांमध्ये,नमूद केलेल्या जागा भरल्या जातात- (१) इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट-मुंबई (केंद्रिय संस्था),एकूण जागा-४५६, (२)स्टेट इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट-सोलापूर (राज्य शासनाची संस्था), एकूण जागा-४६०, (३) सेंट फ्रांसिस इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट-मुंबई (खाजगी संस्था), एकूण जागा-६०, (४) एमएआय इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट-सिंधूदुर्ग (खाजगी संस्था), एकूण जागा-६०,

२७ एप्रिल २०२५ रोजी परीक्षा होईल. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे-मुंबई/नवी मुंबई, छत्रपती संभाजी नगर, पुणे, नासिक, कोल्हापूर, नागपूर

अशी  असते परीक्षा

 ही परीक्षा संगणकाधारित म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड आहे. या परीक्षेतील प्रश्न वस्तुनिष्ट व बहुपर्यायी असतात. हे प्रश्न पुढील विषयांवर विचारले जातात – इंग्रजी भाषा (६० गुण), सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी (३०  गुण), सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल (५० गुण), संख्यात्मक क्षमता आणि विश्लेषणात्मक कल (३० गुण), कार्यकारण भाव आणि तार्किक क्षमता (३० गुण), असे २०० प्रश्न विचारले जातात. पेपरचा कालावधी- तीन तास. प्रश्न पत्रिका इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये असते. त्यामुळे प्रश्न इंग्रजीमध्ये कळत नसेल तर हिंदीत वाचून अर्थ काढता येतो. त्याचा फायदा,  सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असणारा कल  याविषयाचे प्रश्न सोडवताना होऊ शकतो. अचुक उत्तरांसाठी गुण दिले जातात. उत्तर चुकल्यास गुण कापला जातो.

   अर्हता- या अभ्यासक्रमास कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण उमेदवारास प्रवेश मिळू शकतो. मात्र या उमेदवाराने १२ वीला इंग्रजी विषयाचा अभ्यास करणे  आवश्यक. हा अभ्यासक्रम जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी नवी दिल्लीशी संलग्नित आहे.

दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण

एनसीएचएम ॲण्ड सीटी ,ही संस्था भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेने हॉटेल उद्योगाशी संबंधित, प्रमाणपत्र ते पदव्युत्तर पदवी पर्यंतचे विविध कालावधीचे रोजगारक्षम  व उत्तम करिअर घडण्याची क्षमता असलेले अभ्यासक्रम सुरु केले आहेत. यामध्ये बी.एस्सी इन हॉस्पिटॅलिटी ॲण्ड कॅटरिंग मॅनेजमेंट“, हा महत्वाचा अभ्यासक्रम आहे.

हा अभ्यासक्रम जागतिक स्तरावरील अभ्यासक्रमाशी सुसंगत असल्याने या क्षेत्रात येण्यासाठी उमेदवारांची संपूर्ण तयारी या अभ्यासक्रमाद्वारे होते. आतापावेतो या संस्थेने दीड लाखाच्या आसपास उमेदवारांना या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षित केले आहे. यातील बहुतेक उमेदवार देश-विदेशातील हॉटेल उद्योगामध्ये महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. अध्यापनाच्या क्षेत्रातही या उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर हॉटेल आणि तत्सम व्यवसायामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून करिअरची सुरुवात होऊ शकते. ही पदवी घेतलेल्या ९५  टक्क्याहून अधिक विद्यार्थ्यांना कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात सामावून घेतले जाते.

अशा आहेत संधी-

(१) रिसॉर्ट व्यवस्थापक, (२) बहुराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटी कंपन्यांमध्ये व्यवस्थापक, (३) प्रारंभीच्या प्रशिक्षणानंतर मोठ्या हॉटेल समूहांमध्ये किचन व्यवस्थापक, (४) हाऊसकीपिंग व्यवस्थापक, (५) पर्यटन विकास महामंडळात विविध संधी, (६) विमानसेवेतील फ्लाइट किचन आणि विमानांतर्गत सेवा, (७) रेल्वे आतिथ्य आणि खानपान सेवा, (८) भारतीय नौसेना आतिथ्य सेवा, (९) हॉटेल व्यवसाय आणि इतर सेवा क्षेत्रातील विक्री व विपणन अधिकारी, (१०) हॉटेल व्यवसाय आणि इतर सेवा क्षेत्रासाठी आवश्यक ग्राहकसेवा एक्झिक्युटिव्ह, (११) प्रवासी जहाजांवरील खानपान व आतिथ्य सेवा, (१२) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फास्टफूड साखळी उद्योगासाठी आवश्यक व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी आणि एक्झिक्युटिव्ह, रुग्णालये आणि मोठ्या कार्पोरेट संस्थांमधील आतिथ्य व खानपान सेवा , (१३) हॉटेल आणि इतर सेवा क्षेत्रातील गेस्ट/कस्टमर रिलेशन अधिकारी , (१४) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फूड चेनमध्ये मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी किंवा एक्झिक्युटिव्ह, रुग्णालये आणि मोठ्या संस्थांमधील भोजनगृहे, (१५) हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटेरिंग महाविद्यालयातील अध्यापक, (१६) रिसॉर्ट मॅनेजमेंट, (१७) स्वंयरोजगार, (१८) ॲकोमोडेशन मॅनेजर, (१९) कॅटेरिंग मॅनेजर, (२०) इव्हेंट मॅनेजर, (२१) फास्ट फूड रेस्टॉरेंट मॅनेजर, (२२) हॉटेल मॅनेजर, (२३) पब्लिक हाऊस मॅनेजर, (२४) रेस्टॉरेंट मॅनेजर. (२५) हॉटेल आणि संबधित उद्योगात व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी.

उमेदवाराची आवड आणि तज्ज्ञता लक्षात घेऊन पंचतारांकित हॉटेल्समध्ये फ्रंट ऑफिस, फूड प्रॉडक्शन, फूड ॲण्ड बिव्हरेजेस सर्व्हिस, याक्षेत्रातही संधी मिळू शकते. याशिवाय ही पदवी प्राप्त उमेदवारांना (१)टूर मॅनेजर, (२)रिटेल मॅनेजर, (३)ह्यूमन रिसोर्स ऑफिसर, (४)कस्टमर सर्व्हिस मॅनेजर अशा संधीसुध्दा मिळू शकतात.

अभ्यासक्रमाची संरचना

    उमेदवारांना हॉटेल व तत्सम उद्योग व्यवसायासाठी आवश्यक सर्व प्रकारच्या पर्यवेक्षकीय जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळता याव्यात यासाठी अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.

अन्नपदार्थ निर्मिती, अन्नपदार्थ व पेये सेवा, हाऊसकिपिंग आणि फ्रंट ऑफिस सेवा सांभाळण्यासाठी आवश्यक असणारे तंत्र, कौशल्य आणि प्रशिक्षण या अभ्यासक्रमाद्वारे उपलब्ध करुन दिले जाते. हॉटेल व्यवसायाशी संबंधित लेखाविषयक बाबी (अकाउंटन्सी), अन्नसुरक्षा व गुणवत्ता व दर्जा नियंत्रण, मनुष्यबळ विकास, वित्तीय व्यवस्थापन, पर्यटन विपणन व व्यवस्थापन आणि व्युहात्मक व्यवस्थापकीय कौशल्य या बाबीही उमेदवारांना शिकवल्या जातात.

संपर्क- पहिला माळा, एनएसआयसी- एमडीपीबी बिल्डिंग, ओखला इंडस्ट्रिअल इस्टेट, नवी दिल्ली- ११००२०

संकेतस्थळ- nta.ac.in ,ईमेल-nchm@nta.ac.in

महाराष्ट्रातील संस्था

इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटेरिंग टेक्नॉलॉजी, मुंबई

 ही संस्था देशात कायम पहिल्या पाच क्रमांकात राहिली आहे. या  संस्थेला पन्नास वर्षाहून अधिक शैक्षणिक कार्याचा अनुभव आहे. या संस्थेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देश आणि परदेशातील अनेक मोठी हॉटेल आणि पंचतारांकित हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात उच्चपदस्थ आहेत.

कौशल्यनिर्मितीचे अभ्यासक्रम

(१) सर्टिफिकेट कोर्स इन कुकरी-

कौशल्य निर्मितीला वाव देणारा हा १२ आठवड्यांचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारा विद्यार्थी प्रशिक्षण संपताक्षणी रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी सक्षम व्हावा यादृष्टिने अभ्यासक्रमांची संरचना करण्यात आली आहे. यामध्ये प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जातो. जुलै ते ऑक्टोबर आणि जानेवारी ते एप्रिल अशा दोन कालावधीत हा अभ्यासक्रम करता येतो. अर्हता -कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण.

(२) सर्टिफिकेट कोर्स इन बेकरी

जुलै ते ऑक्टोबर आणि जानेवारी ते एप्रिल अशा दोन कालावधीत हा अभ्यासक्रम करता येतो. अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारा विद्यार्थी प्रशिक्षण संपताक्षणी बेकरी व्यवसायातील रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी सक्षम व्हावा यादृष्टिने प्रशिक्षण देण्यात येते. अर्हता – कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. कौशल्य निर्मितीला वाव देणारा हा १२ आठवड्यांचा अभ्यासक्रम आहे.

(३) डिप्लोमा इन हाऊसकीपिंग-

या अभ्यासक्रमात आतिथ्यसेवा केंद्र (हॉटेल/ गेस्ट रुम/ निवासस्थाने इत्यादी) यांच्या दैनंदिन देखभालीची कार्यपध्दती, अंतर्गत सजावट, देखभाल-दुरुस्ती सेवा, स्वच्छता आणि आरोग्य, व्यवसाय संवाद संप्रेषण या बाबींचा समावेश आहे.

(४) डिप्लोमा इन फ्रंट ऑफिस ऑपरेशन-

या अभ्यासक्रमात आतिथ्य सेवेच्या कार्यालयाचे कामकाज, कार्यपध्दती, लेखा विषयक बाबी, हॉटेलचे लेखा, व्यवसाय संवादसंप्रेषण, संगणकाचा उपयोग या बाबी शिकवल्या जातात.

(६) डिप्लोमा इन फूड प्रॉडक्शन

अभ्यास क्रमांक ३,४,५ आणि ६- कालावधी प्रत्येकी दीड वर्षे. कोणत्याही ज्ञानशाखेतील १२वी उत्तीर्ण उमेदवार हे अभ्यासक्रम करु शकतात

या संस्थेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देश आणि परदेशातील अनेक मोठी हॉटेल आणि पंचतारांकित हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात उच्चपदस्थ आहेत.

संपर्क – इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटेरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाइड न्युट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम) – मुंबई-४०००२८, दूरध्वनी- ०२२-२४४५७२४१, ईमेल-info@ihmctan.edu, संकेतस्थळ – ihmctan.edu

सुरेश वांदिले