
उद्योजकतेला प्रोत्साहन
सूक्ष्म, लघु आणि मध्यम (मायक्रो, स्माल ॲण्ड मीडियम एंटरप्राईज- एमएसएमइ) उद्योजकता मंत्रालयामार्फत, या घटकांना प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात, त्यापैकी काही योजना पुढील प्रमाणे आहेत-
१
अभिकल्प सेवासुविधा
निर्मिती (मॅन्युफॅक्चुरिंग) क्षेत्रासाठी अभिकल्प (डिझाइन) तज्ज्ञ सेवा, उपलब्ध करुन दिली जाते. निर्मिती उद्योग आणि अभिकल्प क्षेत्राला एकाच व्यासपीठावर आणण्याच्या अनुषंगाने या योजनेंतर्गत प्रयत्न केले जातात. त्याव्दारे, उद्योग घटकांसाठी लागणाऱ्या प्रभावी अभिकल्पाची, अल्पमूल्यामध्ये उपलब्धता करुन दिली जाते. नव्या उत्पादनांचा विकास, निरंतर विकास, नव्या आणि सध्या अस्तित्वात असलेल्या उत्पादनांचे मूल्यवर्धन यासाठी साहाय्य केलं जातं. ‘उद्यम’ नोंदणी केलेले या घटकातील उद्योग आणि विकास केंद्राच्या कार्यकारी आदेशाव्दारे समाविष्ट करण्यात आलेले उद्योग घटक या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतात.
या योजनेंतर्गत पुढील लाभ दिले जातात-
(१) अभिकल्प प्रकल्प- अभिकल्प सल्लागाराच्या सेवाशुल्कासाठी साहाय्य केलं जातं. यामध्ये, सूक्ष्म उद्योग घटकासाठी शासनाचा हिस्सा ७५ टक्के, लघु आणि मध्यम उद्योग घटकांसाठी ४० टक्के असतो. या प्रकल्पाचे मूल्य १५ लाख ते ४० लाख रुपयांपर्यंत असणं अपेक्षित आहे.
(२) अभिकल्प विद्यार्थ्याचे प्रकल्प- अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या संबंधित विद्यार्थ्याच्या संस्थेला, प्रकल्पाच्या ७५ टक्के रक्कम परतफेड केली जाते. याची मर्यादा दीड लाख रुपयांपर्यंत आहे.
या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी संबंधित उद्योग घटकाला, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंसच्या मार्फत अर्ज करावा लागतो.
०००
२
उद्योजकता आणि कौशल्य विकास योजना
समाजातील विविध घटकांतील तरुण-तरुणिंनी स्वयंरोजगार किंवा उद्योजकतेची कास धरावी, यासाठी या योजनेंतर्गत साहाय्य केलं जातं. विशेषत: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग, दारिद्र्य रेषेखालील घटकांनी, योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे अपेक्षित आहे.
देशातील सर्व भागात उद्योजकतेला चालना मिळावी, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेव्दारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम गटातील नवे उद्योजकीय उपक्रम आणि सध्या अस्तित्वात असलेल्या याच घटकांमधील उपक्रमांच्या क्षमतावाढीस साहाय्य केलं जातं.
साहाय्याचे प्रकार
(१) व्यवस्थापकीय विकास योजना आणि मोठे कार्यक्रम (मेगा इव्हेंट)- या अंतर्गत क्षमतावृध्दीचे एका आठवड्याचे कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये २५ व्यक्तींना सहभागी करुन घेतले जाते. त्यासाठी ५० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावरील सहभागासाठी, मेगा इव्हेंट आयोजित केले जातात.
(२) उद्योजकता आणि कौशल्य विकास योजना- यामध्ये नवीन आणि ग्रामीण उद्योजकतेला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी सहा आठवड्यांचे मार्गदर्शन अथवा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये २५ व्यक्ती सहभागी होऊ शकतात. अपेक्षित खर्च सव्वा लाख रुपये आहे.
(३) उद्योजकता जागृती कार्यक्रम- याचा कालावधी दोन आठवड्यांचा आहे. यामध्ये २५ व्यक्तींचा सहभाग अपेक्षित असून अपेक्षित खर्च पन्नास हजार रुपये आहे.
(४) औद्योगिक प्रेरणा मोहीम- हा एक किंवा दोन दिवसांचा उपक्रम आहे. यामध्ये ५० ते १०० व्यक्ती सहभागी होऊ शकतात. अपेक्षित खर्च २० हजार रुपये आहे.
ही योजना विकास (डेव्हलपमेंट सेंटर्स) केंद्रे आणि टेक्नॉलॉजिक सेंटर मार्फत राबवली जाते. त्यासाठी संबंधित केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल.
०००
३
डिजिटल एमएसएमइ योजना
ही योजना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमइ) घटकांना, त्यांच्या उत्पादन आणि व्यवसाय प्रक्रियेत, डिजिटली सक्षम करणे आणि माहिती, संपर्क (इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देणे, यासाठी राबवली जाते. याव्दारे हे उद्योग घटक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ला अधिक स्पर्धात्मक करु शकतात.
“उद्यम” नोंदणी केलेले, या प्रवर्गातील सर्व घटक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. डिजिटल सक्षमता, माहिती, संपर्क तंत्रज्ञान साधनांचा वापर, इआरपी (एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग) सॉफ्टवेअरची उपलब्धता, ई मार्केटिंग, या अनुषंगाने साहाय्य केलं जातं.
तिनही योजनांसाठी संपर्क- (१) एमएसएमइ डेव्हलपमेंट ॲण्ड फॅसिलेशन सेंटर, कुर्ला अंधेरी रोड, साकिनाका-मुंबई -४०००७२, संकेतस्थळ-msmedimumbai.gov.in, दूरध्वनी- ०२२-२८५७४३०५ (२)आयडीइएमआय, स्वातंत्र्यवीर तात्या टोपे मार्ग, चुनाभट्टी सायन, मुंबई- ४०००२२, दूरध्वनी-०२२-२४०५०३०१, संकेतस्थळ-www.idemi.org
सुरेश वांदिले