अमेरिकेची तोडफोड
कल्याणीच्या घरी एक छान गुबगुबित मांजर आहे. कुणी तिला अमी म्हणतं. कुणी अमू नावानं हाक मारतं तर कुणी अमिटली-फिमुटली म्हणून लाड करतं. कुणी ॲमी असं म्हणून बोलवत असत. तिचं नेमकं नाव तरी काय असा प्रश्न एकदा कल्याणीच्या घरी आलेला तिचा मावस भाऊ शरदला पडला.
तेव्हा मांजरीच्या नामकरणाची गोष्ट कल्याणिने त्याला सांगितली.
ही मांजर बाबांना त्यांच्या मित्राने दिली. बाबांनी जेव्हा तिला घरी आणली तेव्हा ते अगदीच एक दिवसाचं पिल्लू होतं. त्याला खाऊपिऊ घातल्यावर ते दुसऱ्या दिवशीपर्यंत छान मस्ती करायला लागलं.
एके दिवशी सकाळी सकाळी सगळेजण न्याहारी करत असताना, बाबा म्हणाले आपण या पिल्लूचं काहीतरी नाव ठेवलं पाहिजे. आईसुध्दा तशीच म्हणाली. बाबांनी कल्याणीस एखादं नाव सुचवावयास सांगितलं.
कल्याणीने थोडावेळ विचार केला आणि ती म्हणाली, हिचं नाव आपण अमेरिका ठेऊ या का?
आई हसली. बाबाही हसले.
तुम्हा दोघांना हसायला काय झालं? कल्याणीने दोघांकडे किंचित नाराज होत विचारलं.
अगं वेडाबाई, असं काही नाव असतं का प्राण्यांचं ?बाबा म्हणाले.
कां नाही असू शकत..कल्याणिने प्रतिप्रश्न केला.
अगं तसं नाही. नाव काहीही राहू शकतं. पण ते शोभलं पाहिजे की नाही या मांजरीस.आई म्हणाली..
पण, ते आपण कसं ठरवणार आई..
कसं ठरवणार…कसं ठरवणार, आई विचारात पडली.
अगं हे बघ,आपण या पिल्लूचं नाव अमेरिका ठेवलं तर, किती गम्मत येईल तिला बोलावताना..बघ ना, ये अमेरिका काय चाललय तुझं.. बाबा म्हणाले.
अमेरिका जास्त आगावूपणा करु नको हं..आई हसत म्हणाली.
शहाणी हो माझी अमेरिका..
अमेरिका, तू अशीच वागत राहिलीस तर हाकलून लावेन हं घरातून..
आई आणि बाबा अशा प्रकारे पिल्लूचं नाव अमेरिका ठेवलं तर काय काय गमतीजमती होतील असं कल्याणीस सांगू लागले.
कळलं मला तुमच्या दोघांचं म्हणणं..पण बाबा, अमेरिका नावानं गमतीजमती झाल्या तर काय बिघडणार? आपण फारच विचार करतो बाँ..
म्हणजे दुसरं कुणी विचार करत नाही की काय? आई कल्याणीस चिडवित म्हणाली. तेव्हा कल्याणीने दोघांपुढे एका पेपर त्यांच्या समोर ठेवला.
काय आहे यात, तूच जरा सांग की..बाबा आळसावून म्हणाले.
बरं मीच सांगते..कल्याणी म्हणाली.तिने पेपरमधील एका व्यक्तिच्या कडेवर असलेल्या काळ्या कुळकुळीत मांजरीकडे दोघांचं लक्ष वेधलं.
या मांजरीचं नाव इंडिया..तेजोमयी म्हणाली.
क क्काय ..बाबा किंचाळलेच .आई डोळे विस्फारुन बघू लागली.
हो बाबा, ही इंडिया मांजर.ज्यांच्या कुशित आहे ती व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज बुश.
आँ…आईने आँ फाकला..
अगं,अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या मांजरीचे नाव इंडिया राहू शकते तर आपल्या मांजरीचे नाव अमेरिका कां नाही.
कल्याणिचा सवाल बिनतोड होता.यावर बाबा आणि आईने काही क्षण काहीच प्रतिक्रिया दिली नाही..काही वेळाने बाबा म्हणाले, अगं,राष्ट्रपतींना कोणतेही नाव ठेवण्याची मुभा असते.
मग तुम्ही सुध्दा आमच्या या घराचे राष्ट्रपतीच की ? कल्याणी बाबांच्या गळ्यात पडत म्हणाली. यावर आई मनमोकळी हसली.
मग राष्ट्रपती महोदय,करु या आपल्या मांजरीचं नामकरण अमेरिका असं..बाबांकडे बघत आई म्हणाली..
अखेर बाबांनी होकार दिला.पिल्लूच्या रुपाने आमच्या घरी अमेरिका आली. कल्याणीने शरदला सांगितलं..
वाव मस्तच की पण मग या अमेरिकचं अमी, ॲमी, अमिटलं झालं कसं..त्याने विचारलं..
अरे, आपल्याकडे पूर्ण नाव घेण्याचा किती कंटाळा करतात ना..आता माझं नावं कल्याणी..ते बऱ्याच जणांनी केलय कल्लू. काहीजण म्हणतात किल्लू तर काही जण किल्ली..हे म्हणे लाडाचं नाव..नावची तोडफोड करण्यात कसला आलाय लाड,या मोठ्यांनाच ठाउुक..
अच्छा तर असं आहे होय..
हो ना..छान अमेरिका बोलवायचं सोडून या पिल्लूच्या नावाची अमी-ॲमी-ॲमिटली अशी तोडफोड झाली..
वाsव अमेरिकेची तोडफोङ…शरद म्हणाला..आणि स्वत:शीच हसला….तो कां हसला म्हणून कल्याणीने शरदकडे बघितलं. तो काहीतरी बोलणार तोच तिला अमेरिकाही हसल्याचा भास झाला…तिने अमेरिकेकडे बघितलं..ते पिल्लू शांतपणे डोळे मिटून समोर वाटित ठेवलंलं दूध मटकावत होतं. अमेरिकेची तोडफोड झाल्यानं तिला काहीही फरक पडला नव्हता..
सुरेश वांदिले
.jpg)