(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

न झोपणारे श्रीयूत पुतिन..

तेजोमयीस परवा वाटलं की आपल्या स्वप्नात कधी परी येते, कधी वाघोबा येतो, कधी राक्षस येतो, कधी बाप्पा येतात, तसे श्री व्लॉदिमीर पुतीन यांच्याही स्वप्नात जात असतीलच ना..पण याची खातरजमा कशी करुन घ्यायची बॉ..कारण, श्री पुतिन यांना विचारुन ही खातरजमा करुन घेता आली असती. पण त्यांच्यापर्यंत पोहचायचं कसं, हा मोठ्ठाच प्रश्न होता.

समजा काहीही करुन ते मास्को शहरातील ज्या क्रेमलीन नामक राजवाड्यात राहतात , त्या ठिकाणी पोहचलो, पण सैनिकांनी आत सोडलच नाही तर…समजा सैनिकांनी आत सोडलं..पण राजवाड्याच्या आत श्री पुतिन जिथे राहतात ते ठिकाण कुणालाच माहीत नसेल तर..समजा श्री पुतीन जिथे राहतात त्या ठिकाणी एखादा सुरक्षा सैनिक घेऊनही गेला आणि हेच ते श्री पुतिन असे सांगितल्यावर, तो मी नव्हेच असे ती व्यक्ती म्हणाली तर…अरे बापरे बाप किती हे प्रश्न पडताहेत आपणास, तेजोमयी स्वत:ला म्हणाली.

आता अखरेचा उपाय होता तो म्हणजे, बाप्पानांच विचारणं.. तेजोमयी मनात म्हणाली.अरे आपल्याजवळ इतकं सोपं उत्तर असताना आपण कां बरं इतके कठीण कठीण प्रश्न स्वत:ला विचारुन डोकं दुखवायला लागलो. तेजोमयी स्वत:शी पुटपुटली. तिला हसू आलं. ते दाबत ती बाप्पांसमोर उभी राहिली.

बाप्पा निद्रादेवीच्या स्वाधीन होत होते. ते बघताच ,तेजोमयी त्यांना म्हणाली..

अहो बाप्पा, असं इतक्या लवकर झोपणं बरं नव्हे..

तेजोमयीचं बोल कानावर पडताच, बाप्पा जागे झाले.

अगं, झोपू दे आज लवकर मला..म्हणजे मध्यरात्री मला स्वप्न तरी पडेल..

काय सांगता, तुम्ही सुध्दा स्वप्नाचा विचार करत होता..

म्हणजे तुही स्वप्नाचा विचार करत होतीस की काय? बाप्पांनी विचारलं..तेव्हा तेजोमयीनं हसत आजची स्वप्न इच्छा, सांगितली.

अरे वा, बघ आपल्या दोघांची इच्छा सारखीच दिसते..

म्हणजे तुम्हाला सुध्दा श्री पुतिन स्वप्नात यावे असं वाटतं ..तेजोमयीनं विचारलं

पण ते येत नाहीत ना… बाप्पा म्हणाले..

तेव्हा, आपण काय करायला हवं हेच विचारायला आले होते तुमच्याकडे..

आपण काय करायला हवं, म्हणजे…

तुम्ही मनात आणलं तर ते शक्य आहे बाप्पा.

काय आणि कसं शक्य आहे..

आपण दोघे पुतिन यांच्या स्वप्नात गेलो तर..

अगं ते कसं शक्य आहे..

अहो बाप्पा, तुम्हास काय अशक्य, ते सांगा ना…तेजोमयी बाप्पास म्हणाली.तरी बाप्पांचा न न्नाचा पाढा सुरु होता. अखेर तेजोमयीच्या चिकाटीने वैतागून ते श्री पुतिन यांच्या स्वप्नात जाण्यास तयार झाले.

त्यांनी तेजोमयीस डोळे मिटण्यास सांगितलं. ते मूषकस्वामीवर बसले. तेजोमयीस खांद्यावर बसवलं. काही क्षणात ते क्रेमलीन राजवाड्यातील श्री पुतीन यांच्या शयनकक्षात पोहचले.

रात्रीचे १२ वाजून गेले तरी श्रीयुत पुतीन जागेच होते. १२ वाजून एक मिनिटाने त्यांनी ज्युदोचा पोषाख चढवला आणि त्यांनी खोलितच सराव सुरु केला.तो दोन तास चालला. म्हणजे आता २ वाजून एक मिनिटे झाली होती.आता तरी झोपावं की नाही त्यांनी तर त्यांनी ज्युदोचा पोषाख काढला आणि पोहण्याचा पोषाख चढवला.आणि ते महालातील पोहण्याच्या तलावात जाऊन पोहण्याचा सराव करु लागले. त्यांचं पोहणं दोन तास सुरु होतं. घड्याळात चार वाचून दोन मिनिटे झाली होती.आता तरी झोपावं की नाही त्यांनी, पण छे. पोहण्याचा पोषाख काढून त्यांनी टी शर्ट आणि बर्म्युडा घातला..आणि त्यांनी आपल्या प्रिय डॉगीस बोलावलं. तो आल्यावर त्याच्याशी ते दोन तास खेळत बसले. घड्याळात सहा वाचून सहा मिनिटं झाली होती..

बाप्पांनी तेजोमयीकडे बघितलं. ती तर कधीचीच निद्रादेवीच्या स्वाधीन झाली होती. मूषकस्वामीही पेंगुळायला लागला होता. श्रीयुत पुतीन झोपतच नसतील तर त्यांच्या स्वप्नात जाणार तरी कसं,हा प्रश्न बाप्पांना पडला..

पण त्यांच्या स्वप्नात जायचं तरी कशाला,बाप्पा स्वत:शी पुटपुटले. हे आपण तेजोमयीलाच विचारायला हवं अस बाप्पांनी ठरवलं.

 झोप पूर्ण झाल्यावर तेजोमयी उठली. समोर बाप्पांना बघून तिने त्यांना नमस्कार केला..

बाप्पांनी काल रात्रीचा घडलेला सगळा प्रसंग सांगितला.

म्हणजे, श्रीयुत पुतीन झोपतच नाही की काय..याचा अर्थ झोप नाही म्हणजे स्वप्न नाही..मग संपलंच की सारं..तेजोमयी बाप्पांना म्हणाली.

काय संपलं गं..बाप्पांनी विचारलं

अहो बाप्पा त्यांच्या स्वप्नात जाउुन त्यांना सांगणं कठीणच कठीण..

काय सांगायचय तुला तेजो..

अहो, बाप्पा, एक तर त्यांना विचारायचं होतं,तुमच्या स्वप्नात परी-वाघोबा-बाप्पा-राक्षस-दैत्य-भूत येत नाहीत का हे आणि…

आणि काय..बाप्पांनी उत्सुकतेनं विचारलं.

तेजोमयीनं आवंढा गिळला आणि ती म्हणाली..

बाप्पा, बघा तसं कुणाचंही वाईट्ट होऊच नये. पण, माझ्या सारखी छोटी छोटी मुलंही युध्दात मारली जात आहेत ना..मुलं म्हणजे भविष्य असं सर्वजण सांगतात की नाही..हे श्रीयुत पुतीन यांनाही ठाऊक असणारच ना..या भविष्याला काळवंडू नका असं त्यांच्या स्वप्नात जाऊन मला विनंती करायची होती बाप्पा..पण जाऊ दे श्री पुतिन झोपतच नाही म्हंटल्यावर काय करणार..तेजोमयी हताशपणे म्हणाली.

बाप्पांनी डोळे मिटून घेतले..

सुरेश वांदिले