सप्तसुरांची मैफिल
बाप्पा तेजोमयीच्या खोलित येऊन हळूच तिला म्हणाले, चल तुला मी मस्त झक्कास ठिकाणी फिरायला नेतो आज.
कुठे हो बाप्पा , तेजोमयीने विचारलं.
ते नंतर सांगतो, तू तयार आहेस ना .
ऑफकोर्स बाप्पा,अभ्यास करुन करुन कंटाळा आलाय मला.
चल तर मग. बाप्पांनी मुषकस्वामीच्या,कुषकस्वामी नावाच्या भावाला बोलावलं. बाप्पा मुषकस्वामीवर आणि तेजोमयी कुषकस्वामीवर स्वार झाले. बाप्पांनी हवेत हाथ फिरवला. मुषक आणि कुषक स्वामीला पंख फुटले. दोन्ही स्वामी उडू लागले.
वाव, तेजोमयी म्हणाली.
टॉव, बाप्पा म्हणाले.
कुषक आणि मुषक स्वामी वेगानं समोर समोर जात होते. थोड्यावेळानं एका घनदाट जंगलात मुषक आणि कुषक स्वामी पोहचले. बाप्पांनी खाली उतरण्याचा आदेश देताच दोघेही खाली उतरले.
एवढया घनदाट जंगलात तेजोमयी पहिल्यांदाच आली होती. सूर्यप्रकाशही तिथे पोहचत नव्हता. विविध पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज तेजोमयीच्या कानावर पडू लागले. तिने काळजीपूर्वक ते ऐकले. तिला मजा येऊ लागली. याआधी तिने इंटरनेटवर आणि ऑर्केस्ट्रामध्ये मिमिक्री करणाऱ्या कलाकारांकडून पक्ष्यांचे आवाज ऐकले होते..पण प्रत्यक्षातील आवाज ती पहिल्यांदाच ऐकत होती. त्या आवाजाने ती मोहरुन गेली.
तिने डोळे मिटले. काळजीपूर्वक पक्षांचा आवाज कानात साठवून ठेऊ लागली. कितीतरी वेळ ती हे आवाज ऐकत राहिली. तिने थोड्यावेळाने डोळे उघडून बाप्पांना विचारलं-
काय हो, बाप्पा तो संगीतकार रहेमान या जंगलात तर येत नसावा ना संगीत शिकायला.
बाप्पा हसून म्हणाले..
तेजू, पक्षी आपल्याला निर्भेळ आनंद देतात. त्यांच्या जगात आपण ढवळाढवळ केली नाही तर ते आपल्यासाठी संगीताच्या सप्तसुरांची मैफिलच सादर करतील. म्हणूनच मी तुला इथं आणलं बघ..
तेजोमयी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यात मग्न झाली असताना मुषक आणि कुषक स्वामी जंगलातल्या आपल्या मित्रांना भेटायला पळाले. बाप्पांनी आंब्याच्या सावलीत मस्तपैकी ताणून दिली.
पक्ष्यांच्या किलबिलाटात तेजोमयी रंगून गेली. भान हरपून गेली. आंब्याच्या झाडावरचे पक्षी तेजोमयीकडे कुतुहलाने बघत होते. आपल्या आवाजावर हा अनोळखी प्राणी डोलतोय याची त्यांना गंमत वाटत होती. या अनोळखी प्राण्याकडून आपल्याला काहीच धोका नाही असं लक्षात आल्यावर झाडावरील एक एक पक्षी खाली उतरुन तेजोमयीच्या अवतीभोवती बसू लागले. तेजोमयीला याचा काहीच पत्ता नव्हता. ती पक्ष्यांच्या संगीतात मग्न होती. हलत होती..डुलत होती..याची गंमत वाटून पक्षीही तसेच करु लागले.. हळूच एक मैना तेजोमयीच्या डोक्यावर जावून बसली. एक पोपट खांद्यावर बसला. कोकीळ दुस-या खांद्यावर बसला. पोपटाने आपली चोच हळूवारपणे तिच्या गालाला लावली. या स्पर्शाने तेजोमयी भानावर आली. तिने डोळे उघडले. आपल्या अवतीभवती पक्ष्यांचा मेळा बघून ती घाबरीलच. बाप्पा बाजूला मस्त झोपले होते. मुषक आणि कुषक स्वामी अवतीभवती दिसत नव्हते. आता आपलं काही खरं नाही असं तिला वाटतं आणि बाप्पा मला वाचवा, असं ती जोरात ओरडली. या ओरडण्यानं पक्षी उडून झाडावर जाऊन बसले. बाप्पांना जाग आली. ते धावत तिच्याकडे आले. काय झालं, असं त्यांनी विचारलं. तर तेजोमयीनं झाडावरील पक्ष्यांकडे बोट दाखवून ते इथे माझ्या अवतीभवती गोळा झाल्याचं सांगितलं.
हातिच्या , एवढयासाठी तू घाबरलीस.अगं ,तू केवढी मोठी आणि हे पक्षी किती इटुकले पिटुकले.तुझ्याशी मैत्री करण्यासाठी आले असणार ते तुझ्याकडे.घाबरायचं काय,तुम्ही त्यांना आपलंस करा,तेही तुम्हाला आपलसं करतील.तुम्हा मानवाचं पक्षीप्रेम फक्त पुस्तकापुरतच असतं हं तेजू..बाप्पा थोड्याशा नाराजिनेच बोलले..त्यांच्या बोलण्यात तथ्य असल्यानं तेजोमयी गप्प राहिली.
सुरेश वांदिले