(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

सिगारेट

टिल्लूच्या वर्गात एके दिवशी सरांनी चांगल्या सवयी आणि वाईट सवयी याविषयी समजावून सांगितलं. वाईट सवयींमुळे व्यक्तीचं, समाजाचं नुकसान होतं, मात्र चांगल्या सवयींमुळे प्रगती होते. तब्येत चांगली राहते. उत्साह कायम राहतो, याकडे त्यांनी वर्गाचं लक्ष वेधलं.

पण सर, वाईट सवयी जर इतक्या हानिकारक असतील त्या कां बरं आपल्यापर्यंत येतात? आपण त्यांना हाकलू नाही का शकत? टिल्लूने सरांना प्रश्न विचारला.

छान प्रश्न विचारल्याबद्दल टिल्लूला सरांनी शाबासकी दिली.

अरे, वाईट सवयी आपल्याकडे येत असतील तर ते कळतं आपल्याला..जसं की खोटू बोलू नये..मात्र आपणास असं वाटतं खोटं बोलण्यानं काय होतं..शिवाय बहादुरकी पण वाटते,खोटं बोलून आपण काय मस्त फसवलं अशी. आपल्याला कसं सफाईदारपणे खोटं बोलता येतं, अशी फुशारकीही बरेच जण मारतात.. हा मोह आपण आवरला पाहिजे….तसं झालं की आपण वाईट सवयीला जवळच करणार नाही..

पण सर, वाईट सवयीच्याच कां फुशारक्या मारतो आपण..टिल्लूने पुढचा प्रश्न विचारला.

कारण त्यामुळे आपण काहीतरी पराक्रम गाजवतोय असं वाटू लागतं, खोटं बोलणाऱ्यास..

पण सर, खोटं बोलणं ही एक वाईट सवय झाली, मग सिगारेट पिणं ही कोणती सवय झाली.. आता अनिकेतने प्रश्न विचारला.

अरे, ही तर आणखीनच वाईट सवय झाली. शरिरास अतिशय अपायकारक.

सर, असं जर असेल तर खूप लोक सिगारेट कां पितात हो..रश्मीने विचारलं..

ते जेव्हा शाळेत शिकत असतील तेव्हा त्यांच्या शिक्षकांनी, सिगारेट पिणं ही वाईट सवय असल्याचं सांगितलं नसेल का हो.. प्रेरणाने विचारलं..

प्रेरणा, रश्मी आणि अनिकेत यांच्या प्रश्नांनी चर्चेला वेगळच वळण मिळालं. यामुळे सरांना घाम येऊ लागला. घशाला कोरड पडली. त्यांनी मेजावर ठेवलेले पाणी पिलं. तेव्हा कुठे त्यांना बरं वाटलं.

विद्यार्थ्यांच्या मनात उद्भवलेल्या शंका बरोबरच होत्या. शिक्षकांनी सांगून -समजावूनही जर सिगारेटसारखी वाईट सवय, मुलं मोठी झाली लागतेच कशी त्यांना? सरांना प्रश्न पडला. याचा अर्थ विद्यार्थ्यांवर शिक्षकांचा प्रभाव पडत नाही. किंवा मग शिक्षक काय काहीही सांगतात, त्यांचं सगळचं थोडं लक्षात ठेवायचं असतं नि तसं वागायचं असतं..असं बहुतेक विद्यार्थ्यांना वाटत असणार?सर मनात म्हणाले..

सर, तुम्ही आमच्या शंकाचं उत्तर दिलं नाही. प्रेरणानं विचारलं…

या प्रश्नाचं काहीतरी उत्तर देणं भाग होतच. सरांनी बोलायला सुरुवात आणि वर्ग संपल्याची घंटा झाली. सरांना हायसं वाटलं. पुन्हा कधी या प्रश्नाचं उत्तर देईन असं म्हणून सर निघून गेले.

००

सरांनी आपल्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं रे. अनिकेत टिल्लूस म्हणाला..

टाळणार नाही तर काय अन्या, आपले मुख्याध्यापकच नाही का अनेकदा शाळा सुटल्यावर पानठेल्यावर जाऊन सिगारेट फुंकतात. मी बघितलय ना ..टिल्लूने माहिती दिली.

अरे, माझे बाबासुध्दा आमच्या नकळत गॅलरीत जाऊन दररोज झोपण्यापूर्वी सिगारेट पितात..सीमा म्हणाली.

ही वाईट सवय असल्याचं आमच्या सरांनी सांगितलंय ,असं त्यांना सांगावं वाटतेय मला आता….

अगं, वेडी आहेस की काय तू..तुझ्या पप्पांना त्यांच्या शिक्षकांनी आणि आपल्या मुख्याध्यापकांना त्यांच्या शिक्षकांनी सांगितलंच असेल ना…

विसरले असतील तर ते…..

हे मात्र खरं असू शकतं हं..

मग आधी आपण मुख्याधापकांपासूनच सुरुवात करु या की..

सर्वांना ही कल्पना आवडली..पण मांजरीच्या गळयात घंटा बांधणार कोण, म्हणजे हे सरांना थेट सांगायचं कसं आणि कुणी, असा प्रश्न प्रतीकने विचारला..

टिल्लू म्हणाला, आज ज्या सरांनी चांगल्या सवयी आणि वाईट सवयी बद्दल वर्ग घेतला ना त्यांनाच विनंती करु की..

सर्वांनी यास अनुमोदन दिलं. सर्वजण सरांकडे गेले. सर, शिक्षक खोलित पेपर वाचत बसले होते. टिल्लूने त्यांना आपली इच्छा सांगितली..

ते ऐकून..सर ताडकन उठूनच उभे राहिले..त्यांना जोरदार ठसका लागला…डोळयाभोवती ग्लानी आली आणि ते खूर्चित कोसळले…

०००

वाईट सवयींचा प्रश्न असाच अनिर्नित राहील याची खूण गाठ टिल्लू, अनिकेत, न प्रतीक आणि प्रेरणाने बांधला…

सुरेश वांदिले

 

मा.दिनेशजी,

युनिकोडमध्ये संहिता पाठवित आहे.कृपया बघावे.

आपला

सुरेश वांदिले

न्नी

नी