(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

भुताटकी!

अलेक्सा गोर्जी आणि अलेक्झांडरची चांगलीच मैत्री झाली होती. गोर्जी त्याच्याशी गप्पा करायची. त्याला गोष्टी सांगायची. तोही तिच्याशी कधी कुंईकुंई करत तर कधी भूईंई भौऊउ करत बोलायचा. असा दोघांचा संवाद सुरु असताना एके दिवशी शेजारचे ब्रम्हे काका तेजोमयीच्या घरी आले. त्यांना हे दृष्यबघून आधी धक्काच बसला. काही वेळाने त्यांना भुताटकी वाटली. एक यंत्र, डॉगीशी बोलतो काय, डॉगी या यंत्राला पतिसाद देतो काय, हे सगळं त्यांना पचनी पडलं नाही. ते आल्या पावली‍ माघारी वळले.

“अहो काका, काही काम होतं का?” तेजोमयीनं विचारलं. पण ब्रम्हेकाका काहीही न बोलताच घाईघाईत निघून गेले. तेजोमयीचे बाबा आतल्या खोलीत काहीतरी कम करत होते, तर आई स्वयंपाकखोलीत होती. तेजोमयीने आत जाऊन, ब्रम्हेकाका दारातून कसे माघारी वळले हे दोघांनांही सांगितलं.

“ब्रम्हेंच्या नाकाला काहीतरी वेगळा आलेला वास आलेला दिसतो.’ बाबांनी नाक उडवत प्रतिक्रिया दिली.

“कसला वास?”तेजोमयीने आश्चर्यचकित होत विचारलं.

“अगं, आपल्या घरी काहीतरी गडबड असल्याचं त्यांना पक्की खात्री वाटली असेल.” आई म्हणाली.

“पण, त्यांना दारातूनच कसं काय कळलं असणार? घरात तरी यायचं होतंना.” तेजोमयी म्हणाली.

“ते आले तेव्हा, अलेक्झांडर काही करत होता का?” बाबांनी विचाारलं.

“गोर्जी त्याच्याशी बोलत होती. तो मान हलवत होता.”तेजोमयीनं सांगितलं.

“झालं कल्याण! या ब्रम्ह्यांना यात नक्कीच भुताटकी वाटली असणार. यंत्र बोलतो नि अलेक्झांडर ऐकतो म्हणजे, भुताटकीच्या पलिकडे हे ब्रम्हे बघूच शकत नाहीत.” बाबांनी प्रतिक्रिया दिली.

बाबा म्हणाले अगदी तसंच झालं. ब्रम्हेकाकांनी सोसायटीच्या व्हाट्सॲप ग्रुपवर, तेजोमयीच्या घरी कशी भुताटकी आहे, याचं रसभरीत वर्णन करणारी पोस्ट टाकली. भुताटकीला प्रोत्साहन देणाऱ्या या कुटुंबाला सोसायटीतून हाकलून लावले पाहिजे, अन्यथा सर्वांनाच भुताचा त्रास होऊ शकतो, असंही त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं होतं. ही पोस्ट  त्यांनी इतर सोसायटींच्या ग्रुपमध्ये टाकली. त्यामुळे ती व्हायरल होत होत, नजिकच्या पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांपर्यंत पोहचली.

असल्या पोस्टमुळे बरीच गडबड होऊ शकते. घबराहट होऊ शकते, हे पोलीस निरीक्षक देशपांडे यांच्या तत्काळ लक्षात आले. ते लगेच तेजोमयीच्या सोसायटीत पोहचले. ही‍ पोस्ट ब्रम्हेंच्या नावे असल्याने ते थेट ब्रम्हेच्या घरी पोहचले. पोलीस निरीक्षकाला घरी आल्याचे बघताच ब्रम्हेंचे पाय लटपटू लागले. त्यांची बोबडीच वळली. ते त त प प करु लागले.

“अहो, तुम्ही घाबरता कशाला मी काही केलं नाही तुम्हाला, साधा प्रश्नही विचारला नाही.” देशपांडेसाहेब ब्रम्हेंना म्हणाले.

“त त तुम्ही आमच्या घरी कसं काय?” ब्रम्हेंनी कसंबसं विचारलं. तेव्हा देशपांडेसाहेबांनी त्यांना व्हॉट्सॲपवरील त्यांच्या नावे फिरत असलेली पोस्ट दाखवली.

“म्हणजे भू भू ताट की.” ब्रम्हे कसेबसे बोलले.

“कसलं भूत ब्रम्हेसाहेब?तुम्ही स्वत: बघितलं का हे भूत?”

“हो हो साहेब.मी स्वत: बघितलं.”

“मग, तुम्हाला भूतबाधा कशी काय झाली नाही?” देशपांडेसाहेब हसू दाबत म्हणाले.

“म म्हणजे साहेब,तु तुम्ही काहीबाही काय बोलता. सोसायटीत ज्यांच्याकडे भूत आहेत तिकडे न जाताम  मा माझीच उलटतपासणी करता आहात.”ब्रम्हे किंचित धिटाइने म्हणाले.

“ब्रम्हेसाहेब, तुम्ही भूत बघितलं म्हणजे काय बघितलं?” देशपांडेसाहेबांनी जरा करड्या आवाजात विचारलं.

“मी खोटा, बोलतो असं म्हणायच का साहेब?”

“ब्रम्हेसाहेब, तुम्ही भूत बघितलं म्हणजे काय बघितलं? एव्हढचं विचारलं. त्याचं उत्तर द्या. तुम्ही खरं बोलता की खोटं बोलता ते नंतर बघू.” देशपांडे साहेब आणखी करड्या आवाजात बोलले. ब्रम्हे थरथर कापू लागले.

“स साहेब चला, मी‍ तुम्हालाच ते भूत दाखवतो.” असं बोलून ब्रम्हेंनी, देशपांडेसाहेबांना तेजोमयीच्या घरी नेलं. आपल्या घरी पोलीस इन्स्पेक्टर आल्याचे बघून आईबाबा आणि तेजोमयीला आश्चर्य वाटलं. सोबत ब्रम्हेंना बघून बाबांच्या लक्षात सगळा प्रकार आला. त्यांनी देशपांडे साहेबांना आत बोलावलं.

“स साहेब आत जाऊ नका. ती बघा दोन भूतं!” ब्रम्हे, अलेक्झांडर आणि गोर्जीकडे बोट दाखवत म्हणाले. त्यांच्या बोलकण्याकडे दुर्लक्ष करत देशपांडे आत आले. गोर्जीने त्यांना नमस्कार केला. आलेल्या व्यक्तीशी सगळेजण अदबिने बोलताहेत हे बघून अलेक्झांडरनेही शेपूट हलवून देशपांडे साहेबांकडे प्रेमानं बघितलं.

“ब्रम्हेसाहेब, तुम्हाला या दोघांमध्ये कुठे भूत दिसला ते सांगा.” दारातच उभ्या असणाऱ्या ब्रम्हेंना दरडावून देशपांडे साहेबांनी विचारलं.

“साहेब हे यंत्र, या कुत्र्याशी बोलताना मी बघितलं.”

“कुत्रा नाही, आमचा लेक आहे तो.”आई ब्रम्हेंवर रागावली.

“या यंत्राशी, यांचा हा हा लेक बोलतो. ही भुताटकी नाही का साहेब?”ब्रम्हे म्हणाले.

“अहो ब्रम्हेसाहेब, तुमच्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीस, यंत्रमानव म्हणजे भूत वाटावा म्हणजे कमालच झाली. कोणत्याही शेपूटवाल्या दोस्तांशी प्रेमान बोललं, त्यांना समजावून सांगितलं,तर त्यांना ते कळतं. याला भुताटकी नाही म्हणत.

“पण, स साहेब…”

“ब्रम्हे, सुशिक्षित माणसंच जर भुताटकी बिताटकीवर विश्वास ठेवायला लागली, या गोष्टींना व्हायरल करु लागली तर, समजात किती गोंधळ उडेल, भीतीचे वातावरण निर्माण होईल. याचा फायदा संधीसाधू लोक घेतील. हे तरी लक्षात घ्यायला हवं की नाही तुम्ही.”

“पण पण, साहेब..”

देशपांडेसाहेबांनी दंडूका खाली आटपून ब्रम्हेंना बोलू दिले नाही. त्यांचा हात पकडून खोलीच्या आत आणलं. जे काही थोड्यावेळापूर्वी व्हॉटसॲपर लिहिलं, ती मोठ्ठीच चूक आपल्या हातून घडली.त्यामुळे क्षमा मागतो. भूतबित काही नसल्याचे आपली खात्री पटली आहे. सर्वांना मानसिक त्रास झाला असल्यास क्षमा असावी. अश संदेश लिहियाला लावून तो पोस्ट करायला लावला.