
“द्रोणाचार्यां”चे प्रशिक्षण!
सध्या इंडियन प्रिमियन लिग म्हणजेच आयपीएलचे सामने देशात सुरु आहेत. इतर क्रीडाप्रकारातील सामनेही देशात आणि परदेशात सुरु आहेत. या सामन्यांमध्ये भारतीय क्रीडापटू चांगली कामगिरी बजावताहेत. आयपीएल किंवा इतर क्रीडाप्रकारांमध्ये खेळांडूसोबतच क्रीडाप्रशिक्षकांचीही चर्चा होते. क्रीडापटूंच्या यशात, त्यांचे प्रशिक्षक किंवा गुरु मोठा हातभार लावतात. दरवर्षी भारतसरकार, एका प्रशिक्षकाला, द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित करते
क्रीडा प्रशिक्षकाच्या माध्यमातून उत्तम करिअर घडू शकते, ही बाब ध्यानात घेऊन, नेताजी सुभाष नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स या संस्थेने, डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग आणि इतर अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
भारत सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी ही स्वायत्त संस्था आहे. भारतीय क्रीडाविश्वाला, शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि इतर साहाय्य करुन या संस्थेने उभारी दिली आहे.
डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग
या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रकिया सुरु झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. २६ एप्रिल २०२५ आहे
या अभ्यासक्रमात एक्झरसाइज फिजिओलॉजी आणि स्पोर्ट्स मेडिसिन, स्ट्रेंग्थ ॲण्ड कंडिशनिंग, डिजिटल लर्निंग, कोचिंग डायनॅमिक्स, स्पोर्ट्स सायकॉलॉजी, स्पोर्ट्स न्युट्रिशन आणि बायोकेमिस्ट्री, बायोमेकॅनिक्स आणि स्पोर्ट्स अँथ्रॉपॉमेट्री, प्रोफेशनल डेव्हलपमेंट अशासारख्या विषयघटकांचा समावेश आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षं.
प्रवेश प्रकिया
(१) कॅटेगरी अ (थेट प्रवेश)- या उमेदवारांनी क्रीडा क्षेत्रात पुढील कामगिरी बजावलेली असावी- (अ) ऑलंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व, (ब) वरिष्ठ जागतिक स्पर्धा सहभाग, (क) कॉमनवेल्थ किंवा आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणतेही पदक.
(२) कॅटेगरी ‘अ’दोन (आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंसाठी)– १२ वी उत्तीर्ण आणि ऑलंपिक स्पर्धा, वरिष्ठ जागतिक स्पर्धा, आशियाई स्पर्धा, कॉमनवेल्थ स्पर्धा, युवा ऑलंपिक स्पर्धेत सहभाग
(३) कॅटेगरी ब – पदवी आणि आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय महत्वाच्या क्रीडा स्पर्धेत सहभाग
कॅम्पस आणि क्रीडाप्रकार प्रशिक्षण
(अ) पतियाळा कॅम्पस- (१) बॉक्सिंग, (२) सायकलिंग, (३) फेन्सिंग, (४) हँडबॉल, (५) हॉकी, (६) ज्युडो, (७) वेटलिफ्टिंग, (८) कुस्ती, (९) वुशू, (१०) योग (११) ॲथेलिटिक्स
(ब) बेंगळुरु कॅम्पस- (१) बॅडमिंटन, (२) बास्केटबॉल, (३) हॉकी, (४) कबड्डी, (५) खोखो, (६) शुटिंग, (७) स्विमिंग, (८) टेनिस, (९) व्हॉलीबॉल, (१०) तायक्वोंदो, (११) ॲथलेटिक्स,
(क) कोलकता कॅम्पस- (१) आर्चेरी, (२) ॲथेलिटिक्स, (३) फूटबॉल, (४) जिमनॅस्ट, (५) टेबल टेनीस,
(ड) थिरुवनंतपूरम कॅम्पस- (१) कॅनोइंग ॲण्ड कायाकिंग, (२) रोविंग.
अशी असेल परीक्षा
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन चाळणी परीक्षा देशातील विविध केंद्रांवर घेतली जाते. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर या केंद्रांचा समावेश आहे.
पेपरमध्ये सामान्य ज्ञान- १० गुण, सर्वसामान्य संगणकीय ज्ञान- ५ गुण, भाषा आणि संवाद कौशल्य- १० गुण, तार्किक क्षमता आणि क्रीडा कल -१० गुण, स्पेशलाइज्ड स्पोर्ट्स थिअरी- २५ गुण असलेले वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. शैक्षणिक कामगिरी १० गुण, मुलाखत १० गुण, क्रीडा कामगिरीला २० गुण दिले जातात.
०००
एम.एस्सी इन स्पोर्ट्स कोचिंग–
या अभ्यासक्रमाला अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. २ मे २०२५.
हा अभ्यासक्रम पतियाळा येथील कॅम्पसमध्ये चालवला जातो. या अभ्यासक्रमात सैध्दांतिक आणि प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यात आलाय. प्रशिक्षणाच्या विविध पध्दती, शारीरिक विकास, नेतृत्व विकास, क्रीडा विज्ञान, क्रीडा मानसशास्त्र या विषयघटकांचा समावेश आहे. कालावधी- दोन वर्षे.
प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना (१) ॲथेलिटिक्स, (२) बॉस्केटबॉल, (३) फूटबॉल, (४) जिमनॅस्टिक्स, (५) हॉकी, (६) स्विमिंग, (७) व्हॉलीबॉल, (७) वेटलिफ्टिंग आणि (८) कुस्ती या खेळांचे प्रशिक्षण दिले जाते.
निवड प्रक्रिया पतियाळा येथे पार पाडली जाते. क्रीडा विज्ञानावर आधारित लेखी चाळणी आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाते. मुलाखतीमध्ये क्रीडा क्षेत्रातील ज्ञान, व्यक्तीमत्व, अभिव्यक्तीचा दर्जा यांची चाचपणी केली जाते.
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी सोबत, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स (पतियाळा) चा डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेतील डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेतील चार वर्षे कालावधीचा बीएस्सी इन स्पोर्ट्स कोचिंग किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग. उमेदवारांना किमान ५५ टक्के गुण मिळायला हवेत.
०००
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम-
या संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेल्या सर्व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.२ मे २०२५.
(१) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स परफॉर्मन्स ॲनॅलिसीस- या अभ्यासक्रमामध्ये खेळाडूच्या कामगिरीचे विश्लेषण करण्याचे तंत्र आणि कौशल्याचे ज्ञान प्रदान केले जाते. प्रभावी संवाद कौशल्य वाढीसाठी प्रयत्न केले जातात. मोठमोठ्या कंपन्या किंवा कॉर्पोरेट तसेच राष्ट्रीय संस्थांच्या टीमच्या निवडीच्या निर्णय प्रकियेत महत्वाची भूमिका बजवावी लागते.
काय शिकाल?- (१) सरावातील कामगिरीचे विश्लेषण, (२) कामगिरी मापनाचे निदर्शके (इंडिकेटर्स), (३) उपयोजित क्रीडा विज्ञान, (४) क्रीडा कामगिरी विश्लेषण आणि मूल्यमापनाच्या पध्दती, (५) उपयोजित क्रीडा कामगिरी विश्लेषण, (६) व्यावसायिकदृष्ट्या क्रीडा कामगिरीचे विश्लेषण, (७) संशोधन, (८) माहितीचे विश्लेषण आणि आराखाडा बांधणे.
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण.
(२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स न्युट्रिशन, अर्हता- पुढीलपैकी कोणत्याही एका विषयात पदवी- (१) न्युट्रिशन, (२) लाइफ सायंस, (३) स्पोर्ट्स सायंस, (४) फिजिकल एज्युकेशन ॲण्ड स्पोर्ट्स, (५) मेडिकल ॲण्ड अलाइड हेल्थ सायंस, (६) फिजिकल एज्युकेशन, (७) कोणत्याही विषयातील पदवी सोबत डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग. पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत.
(३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्ट्रेंग्थ ॲण्ड कंडिशनिंग- क्रीडा त्रात या विषयाला सध्या महत्व मिळू लागलेय. यामध्ये खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतावृध्दीचे तंत्रकौशल्य, पध्दती यांचा ढोबळमानाने समावेश होतो. नेतृत्व विकासावरही लक्ष केंद्रित केले जाते. पोषण आहार आणि क्रीडा पुनर्वसन यांचाही समावेश करण्यात आल्याने उमेदवारांना प्रगत आणि वैविध्यपूर्ण विषयांचे ज्ञान प्राप्त होते. उमेदवारांच्या प्रात्यक्षिकांच्या कौशल्यात वाढ व्हावी, त्यांनी भविष्यात या विषयात संशोधनाचे कार्य करावे, यावर लक्ष केंद्रित केले जाते.
अर्हता- पुढीलपैकी कोणत्याही एका विषयात पदवी- (१) फिजिओथेरपी, (२) स्पोर्ट्स सायंस, (४) फिजिकल एज्युकेशन ॲण्ड स्पोर्ट्स, (५) फिजिकल एज्युकेशन, (६) कोणत्याही विषयातील पदवी सोबत डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग. उमेदवारांना पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत.
(४) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स सॉयकालॉजी, अर्हता- पुढीलपैकी कोणत्याही एका विषयात पदवी- (१) सॉयकॉलॉजी, (२) स्पोर्ट्स सायंस, (४) फिजिकल एज्युकेशन ॲण्ड स्पोर्ट्स, (५) मेडिकल ॲण्ड अलाइड हेल्थ सायंस, (६) फिजिकल एज्युकेशन, (७) कोणत्याही विषयातील पदवी सोबत डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग. उमेदवारांना पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत.
(५) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एक्झरसाइज फिजिऑलॉजी. अर्हता- पुढीलपैकी कोणत्याही एका विषयात पदवी- (१) ह्युमन फिजिऑलॉजी, (२) स्पोर्ट्स सायंस, (३) फिजिकल एज्युकेशन ॲण्ड स्पोर्ट्स, (४) फिजिकल एज्युकेशन, (५) फिजिऑलॉजी, (६) लाइफ सायंस, (७) स्पोर्ट्स फिजिऑलॉजी, (८) स्पोर्ट्स न्युट्रिशन ॲण्ड फिजिऑलॉजी, (९) स्ट्रेंग्थ ॲण्ड कंडिशन (१०) मेडिकल सायंस, (११) पॅरॉमेडिकल सायंस फिजिकल एज्युकेशन. उमेदवारांना पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत.
सर्व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १०० गुणांची परीक्षा घेतली जाते. यामध्ये ८० गुण लेखी परीक्षेला आणि २० गुण मुलाखतीला दिले जातात. चाळणी पेपरचा विस्तृत अभ्यासक्रम संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे.
सर्व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी प्रत्येकी एक वर्षं.
संपर्क:- नेताजी सुभाष नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, ओल्ड मोतीबाग, पतियाळा- १४७००१, दूरध्वनी- ०१७५-२३०६१७१, फॅक्स- २२१२०७०, संकेतस्थळ-https://sportsauthorityofindia.nic.in आणि www.dipsc.nsnis.in, ईमेल-nsnisacademics@gmail.com, हेल्पलाइन-०१७५ -२३९४२६१
सुरेश वांदिले
०००