कालचा गोंधळ
तेजोमयी परवा आई- बाबांच्या आधीच उठली. तेव्हा वाजले होते सकाळचे सव्वा सहा. बाथरूमला गेल्यावर तिने आईला उठवलं. त्या आवाजानं पप्पाही उठले. लवकर निजे, लवकर उठे. ऋध्दी सिध्दी त्याच्याकडे, ही आपली शिकवण तेजोमयीला पटली म्हणायची.असं पप्पा मनात म्हणाले.
तेजोमयी एरव्हीपेक्षा सकाळी लवकरच उठली हे बघून खूप आनंद झाला. त्यांनी तिला गूड मार्निंग केलं. तिनेही हसून प्रतिसाद दिला. ते किती तरी दिवसांपासून तिला लवकर झोपण्याविषयी नि लवकर उठण्याविषयी सांगत होते.पण तिने ते काही मनावर घेतलं नव्हतं. कधी होम वर्क तर बहुतेक वेळा आवडत्या सिरीयलमुळे तिला दररोज झोपायला वेळ व्हायचा. त्यामुळे मग सकाळी उशिरा उठणं आलच. मग सकाळी सगळाच गोंधळ. कसं तरी घाई – घाईत तयार होणं नि शाळेत पळणं. आईने बरेचदा समजावलं पण छे…कालचा गोंधळ बरा होता असं म्हणण्याची पाळी येई.त्यामुळे आज तेजोमयी लवकर उठल्याचं बघून आई -पप्पांना खूप आनंद झाला.पण त्यांचा हा आनंद फार कमी वेळ टिकला.कारण बाथरुमवरुन आल्यावर तिने आईला विचारलं,मी अर्धा तास झोपू का गं मम्मी.
अग,आता काय झोपतेस,लवकर उठलीस तर जरा अभ्यास कर थोडावेळ.एरवी तुला दररोज वेळ मिळत नाही.आज तुझ्या टेस्टचा पहिला पेपर.एकदा जरा वाचून घे.. तेवढच बरं.
अगं,मी काल वाचलं होतं.मला सगळचं येतं.थोडा वेळ झोपू देणा ग मम्मी.तेजोमयी लाडे लाडे म्हणाली.पप्पांनी डोक्यावर हात मारुन घेतला.
ठीक आहे बाई झोप. पण अर्ध्या तासानं उठ हो. आई तिला म्हणाली. तेजोमयी पुन्हा झोपी गेली.पुन्हा उठली तेव्हा नेहमी प्रमाणे घाई झाली. धावतपळत ती शाळेत गेला. कसं होणार बाई या पोरीचं,पप्पा आईला म्हणाले..ठेच लागली की सारं काही कळेल हो तिला.आईने पप्पांना समजावलं.
दुपारी पेपर सोडवून तेजोमयी घरी परतली तेव्हा तिचा चेहरा पडलेला होता.आईने बरोबर ओळखलं. पेपर चांगला गेला नसणार. आईला बघताच तिच्या कुशित शिरुन तेजोमयी रडू लागली.
हे बघ बाळ,आता रडून काय उपयोग. सकाळी मी आणि पप्पांनी सांगितल्याप्रमाणे जर तू अभ्यास केला असतास तर..आता हसत खिदळत घरी आली असतीस.आता तरी पप्पांचं नि माझं एैक हं..वेळेचा सदुपयोग हा नेहमीच फायद्याचा ठरतो. दुरुपयोग केला की असा घोटाळा होतो, आई म्हणाली.तेजोमयीने होकारार्थी मान हलवली. तिची पाठ थोपटून आईन त्याला धिर दिला.
००००