माझा अभिमान
तेजोमयीच्या घरी आज वेगळाच उत्साह दिसून येत होता. सकाळीच आईने, मराठी गाणी लावली. घराला सजवलं.आदल्या दिवशी तिने फुले आणि आंब्याची पानं आणली होती. फुलांचे हार करुन दाराखिडक्यांना लावले. आंब्याच्या पानांचे तोरण प्रवेशव्दारास लावले. सुंदर रांगोळी काढली. भ्रमणध्वनीवर मोठ्या आवाजात सनई लावली. घरात मंगलमय वातावरणाची निर्मिती झाली.
आईने सकाळीच अलेक्झांडर(द डॉगी)ची आंघोळ केली. तेजोयमी आणि बाबाही लवकरच तयार झाले. सर्वांनी नवे कपडे घातले.
तेजोमयीच्या घरी चाललेली ही लगबग त्यांच्या सदनिकेच्या मजल्यावर असणाऱ्या देसाई काका, कुळकर्णी आजी आणि कांबळे काकांच्या लक्षात आली. ही मंडळी उत्सुकतेने सकाळीच तेजोमयीच्या घरी डोकावली. फुलापांनानी सजलेलं घर, नवे कपडे, सनईचे सुर,असं प्रसन्न वातावरण बघून स
र्वांना आनंद वाटला.
दिवाळीत किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी असं वातावरण प्रत्येकाच्या घरी असतं. पण यापैकी आज काहीच नव्हतं. मग हे कशासाठी,असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उमटला.
घर असं सजवायला काय खास गं, कुलकर्णी आजींनी आईला विचारलं.
तेजोमयीच्या बाबांची पदोन्नती तर झाली नाहीना..कांबळे काकांनी लगेच विचारलं.
सारं काही सांगतो की. आधी बसून घ्या ना. बाबांनी सर्वांना बसायला विनंती केली. अलेक्झांडरच्या नित्य परिचयाची ही माणसं असल्याने त्यानेही मान हलवली.
बघा आता, अलेक्झांडरही बसा म्हणतो की..बाबा त्याच्याकडे बघत म्हणाले. सगळेजण बसल्यावर आईने नुकताच केलेला बदामाचा शिरा, तेजोमयीनं प्रत्येकास दिला. आईही ताटली घेऊन दिवाणखान्यात आली. अलेक्झांडर तिच्या पायाशी घुटमळू लागला. ताटलीकडे बघू लागला.
कळलं राज्या. पहिला मान तुझा. तू खाल्याशिवाय मी खाते का कधी, असं म्हणून तिने अलेक्झांडरला घास भरवला. स्वारी खुष झाली. दोन्ही पायावर उभं राहून आईची हलकीसी पप्पी घेतली..
अलेक्झांडरचे लाड झाले असतील तर सांगशील आता तरी आज काय विशेष ते, कुळकर्णी आजी न राहवून म्हणाल्या.
सांगते ना आजी. धिर जरा धरा. अहो,आज 27तारीख आहे.आई म्हणाली.
त्यात काय मोठसं, ही तारीख दर महिन्याला येते. देसाई काका आश्चर्याने म्हणाले.
27 तारीख दरमहिन्याला येत असली 27 फेब्रुवारीचं महत्व वेगळं आहे, देसाई साहेब..बाबा म्हणाले.
तेजोमयीचा वाढदिवस आहे की काय, कांबळे काका तत्परतेनं बोलून गेले.
तिचा वाढदिवस नाही तर कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे.आई म्हणाली.
मग तुम्ही कां बरं साजरा करता आहात… कांबळे काकांनी विचारलं.
कुसुमाग्रजांचा वाढदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो .
हो का,अरे वा वा वा..असं देसाई काका पुटपुटले.
मात्र, मराठी भाषा गौरव दिन सणासारखा, तुम्ही कां साजरा करताहात, असा प्रश्न त्यांच्या मनात उमटला. असेच भाव इतरांच्याही मनात निर्माण झालेच होते. ते बाबांनी बरोबर टिपले.
अहो, मराठी आपली मातृभाषा. आईची भाषा. म्हणजे आपल्या ह्रदयाची भाषा. तिचा गौरव दिन थाटामाटात साजरा करावा, असं आम्हास वाटलं. आपण लक्ष्मीपूजन आणि गुढीपाडवा नाही का, उत्साहात साजरा करतो, तितकच या दिवसाचं महत्व, म्हणून आम्ही यापुढे हा दिवस असाच साजरा करायचा ठरवलय. बाबांनी सांगितलं.
सर्वांच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भाव उमटले. आईनं घरातून कुसुमाग्रजांच्या कवितांची पुस्तकं आणली. तेजोमीयनं सर्वांना सप्रेम भेट म्हणून ती दिली.
हे गं काय, जाता जाता कुळकर्णी आजीनं विचारलं..
माझी मराठी, माझा अभिमान, आजी..आई उत्तरली…
सुरेश वांदिले
.