सिंहाला खोबऱ्याचा प्रसाद
बाप्पा बाप्पा, तेजोमयी बाप्पांना धापा टाकित म्हणाली.
अग बाई, एवढं धापा टाकायला काय झालं. उंदिरमामा पाठिमागे लागलाय की काय तुझ्या.रागावू का त्याला. …बाप्पांनी विचारलं.
तसं नाही हो बाप्पा. मूषकस्वामी माझ्या पाठिमागे कसे लागतील. त्यांना मी दररोज चणे-फुटाणे देते की.शिवाय मी तुमची लाडकी असल्याचं त्यांना कळलच असणार की…
मग तुला एवढी धाप कशाला लागली ..
अहो बाप्पा, आत्ताच मी मारुतीरायाच्या मंदिरातून आले.
ते तुला रागावले की काय, करु त्यांना फोन.
अहो बाप्पा ऐकून तर घ्या….
सांगा..
अहो,मारुतीरायाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला दोन सिंह आहेत.
ते तुझ्यावर गुर्रावले की काय?
नाही हो बाप्पा..ते तर पुतळे आहेत..
मग..त्यांची तुला भीती वाटली की काय?
तसं नाही हो, या दोन्ही सिंहांना कुणीतरी खोब-याचा प्रसाद दिला. खोबरं आणि सिंह हे समिकरण विनोदी वाटत नाही का तुम्हाला.
अग बाई, मारुतीरायांच्या मंदिरात सिंहाला बोकडाचा प्रसाद द्यावा असं तुला म्हणायचय का..
तसं नाही हो बाप्पा.,
मग गवत द्यावं असं वाटतं का..
नाही हो बाप्पा…
हे नाही ते नाही..मग सिंहाने उपाशी राहायचे की काय…
पण बाप्पा खोब-याचे दोन तुकडे देऊन सिंहाचं पोट कसं भरणार, तुम्हीच सांगा…
अच्छा तर, या प्रश्नापोटी तुला धाप लागली म्हणायची.
मी ते बघितलं आणि धावत आले तुमच्याकडे. म्हणून धाप लागली. देणा-याने किमान खोब-याचा एक डोल तरी सिंहाला द्यावा की नाही.पण देणारी मंडळी भारीच कंजूष बुवा.
अगं, त्या दारावरच्या सिंहाला खोब-याचे दोन तुकडे तरी मिळतात. पण मारोतीरायच्या मुखासमोर फक्त प्रसादच फिरवला जातो. त्याचं काय ? तुम्हा मानवाचं खरच काही कळत नाही. मारोतीरायाच्या मुखासमोर फक्त प्रसाद फिरवणार, दारासमोर असलेल्या सिंहाच्या मुखात प्रसादाचे दोन तुकडे टाकणार. पण मंदिराच्या दाराबाहेर अपेक्षेनं बसलेल्या भिकाऱ्यांना प्रसादाचा एक तुकडाही तुम्हाला द्यावा वाटत नाही..
खरचं की. तेजोमयी स्वत:ला म्हणाली.
बाप्पांनी डोळे मिटून घेतले.
सुरेश वांदिले
000