(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

“सागरा”चे बोलावणे!

सागरी क्षेत्रातील व्यापारी आणि प्रवासी वाहतुकीचा, भारताच्या आर्थिक सामाजिक विकासात मोठा सहभाग आहे. जहाजांचे पुनर्वापर (शिप रिसायकलिंग) मध्ये, भारताचा जगात दुसरा क्रमांक, मेरीटाइम (सागरी) क्षेत्रात मनुष्यबळ पुरवठा करण्यात ५ वा क्रमांक आणि जहाजबांधणी किंवा निर्मितीमध्ये २१ वा क्रमांक लागतो. पोर्ट, शिपिंग आणि वाटरवेज (बंदरे, जहाज वाहतूक, जलमार्ग) मंत्रालयाने, मेरिटाइम व्हीजन २०३० तयार केले आहे. त्यानुसार भारताला मेरिटाइम क्षेत्रात, जागतिक क्षेत्रावर आघाडी घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या व्हिजनमध्ये, जागतिक स्तराच्या दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण मेरिटाइम शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधनाला ठळक स्थान देण्यात आल्याने, भारताला या क्षेत्रात जागतिक पातळीवर आपले स्थान मजबूत करणे शक्य होईल. ही बाब लक्षात ठेऊन पुढील काळात, मेरिटाइम क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या भारतीय तरुणतरुणींना, कॅप्टन, इंजिनीअर, शिप बिल्डर, डिझायनर, पोर्ट मॅनेजर, लॉजिस्टिक एक्सपर्ट अशासारख्या करिअर संधी मिळू शकतात.

इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीने (आयएमयू) या क्षेत्रातील उद्योगांची गरज, सक्षमतेने भागवू शकणाऱ्या मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी दर्जेदार अभ्यासक्रम सुरु केले आहेत. हे अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील उद्योगामध्ये उत्तमोत्तम संधी मिळाल्या आहेत.

भारत सरकारच्या पोर्ट, शिपिंग आणि वाटरवेज मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. या संस्थेची स्थापना २००८ साली करण्यात आली. या संस्थेचे मुख्यालय  व मुख्य कम्पस चेन्नई येथे असून कोची, कोलकाता, मुंबई बंदर, नवी मुंबई, विशाखापट्टम येथे इतर कॅम्पस आहेत. या संस्थेत पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रम करता येतात.

खडतर परिश्रम करण्याची तयारी, सागरावरील कोणतेही आव्हान स्वीकारण्याची मानसिकता असलेल्या तरुणांसाठी सागरी वाहतुकीच्या क्षेत्रात उत्कृष्ट करिअर घडवता येते. आयएमयू मार्फत वेगवेगवेगळया अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी, आयएमयू सीइटी, दरवर्षी घेतली जाते. डारेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंगने, मान्यता प्रदान केलेल्या इतर सर्व मेरीटाइम प्रशिक्षण संस्थांनी, आयएमयू सीइटीच्याच गुणांवरच प्रवेश देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आयएमयूचे पदवी अभ्यासक्रम

 (१) बी.एस्सी इन नॉटिकल सायन्स (चेन्नई, नवी मुंबई आणि कोची कॅम्पस), (२) बीटेक- मरिन इंजिनीअरिंग (चेन्नई कोलकता, मुंबई पोर्ट ट्रस्ट कॅम्पस), (३) बीटेक – नॅव्हल आर्किटेक्चर ॲण्ड शिप बिल्डिंग इंजिनीअरिंग, (विशाखापटट्टणम कॅम्पस) (४) बीटेक- नॅव्हल आर्किटेक्चर ॲण्ड ओशन इंजिनीअरिंग, (विशाखापटट्टणम कॅम्पस),  (५) डिप्लोमा इन नॉटिकल सायंस (चेन्नई, नवी मुंबई आणि कोची कॅम्पस), (६) बीबीए लॉजिस्टिक्स, रिटेलिंग ॲण्ड ई-कॉमर्स, (चेन्नई आणि कोची कॅम्पस), (७) बीबीए लॉजिस्टिक्स (एक वर्षाच्या इंटर्नशीपसह) विशाखापट्टणम

प्रवेश प्रक्रिया

 बी.टेक इन (मरिन इंजिनिअरिंग, नॅव्हल आर्किटेक्चर ॲण्ड ओशन इंजिनीअरिंग, नॅव्हल आर्किेटेक्चर ॲण्ड शिप बिल्डिंग), बी.एस्सी इन नॉटिकल सायन्स आणि डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी मे किंवा जून महिन्यात, कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी-सीइटी-आयएमयू-सीइटी) देशभरातील विविध शहरांमध्ये घेतली जाते.यंदा ही परीक्षा २४ जून २०२५ रोजी मुंबई, नागपूर, नासिक, सोलापूर आणि पुणे या केंद्रांवर घेतली जाईल. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २ मे २०२५.

(सेंट्रल युनिव्हर्सिटी एन्ट्रस टेस्ट- अंडर ग्रॅज्युएट, ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना बीटेक अभ्यासक्रमांमध्ये मर्यादित स्वरुपात प्रवेशाची संधी दिली जाते. तिसऱ्या फेरीनंतर जागा शिल्लक राहिल्यास अशा उमेदवारांना प्रवेश दिला जातो.)

बीबीए अभ्यासक्रमाला प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश, या तत्वावर प्रवेश दिला जातो. प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ वीतील कोणत्याही शाखेत किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत.

पदवी अभ्यासक्रमाच्या, चाळणी परीक्षेत  बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या २०० प्रश्नांचा समावेश असतो. या प्रश्नांमध्ये १२ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित इंग्रजी, सामान्य कलचाचणी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांचे प्रश्न विचारले जातात. पेपरचा दर्जा हा १२ वीचा असतो.

मरिन इंजिनिअरिंग आणि नॉटिकल सायन्स हे अभ्यासक्रम करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे. या उमेदवारांना सागरी पर्यावरणात काम करायचे असते. हे पर्यावरण अत्यंत बेभरवशाचे असून त्यात कोणत्याही क्षणी अनपेक्षित बदल घडण्याची शक्यता कायम लक्षात ठेवावी लागते. सागरी प्रवास हा मोठ्या कालावधीचा असतो. त्यामुळे अनेकदा बरेच दिवस वा महिने सागरावर राहावे लागते. त्यादृष्टिने शारीरिक क्षमतेची मानके डायरेक्टोरट जनरल ऑफ शिपिंग यांनी निर्धारित केली आहेत. या मानकांच्या विस्तृत माहितीसाठी संपर्क संकेतस्थळ– http://www.dgshipping.gov.in/Content/MaritimeHealthBranch.aspx.

बी.एस्सी इन नॉटिकल सायन्स

हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना सी-फेअरर्स या पदनामापासून सुरु होणारी करिअर संधी मिळते.  जहाजाचा प्रवास सुरु असताना, जहाजाचे कार्यान्वयन, देखभाल, दुरुस्ती, स्वच्छता, जहाजावरील खानपान व्यवस्थापन, इतर कर्मचारी आणि कामगार यांची तरतूद आदी कामे या उमेदवारांना करावी लागतात.  भारतीय सी-फेअरर्सची कार्यक्षमता, गुणवत्ता आणि दर्जा उत्कृष्ट असल्याने त्यांना जगभरातून मोठी मागणी आहे. या उमेदवारांना मालवाहू जहाजांच्या संनियंत्रणाचे काम, सागरावरील दळवळणासाठी आवश्यक असलेले कौशल्य शिकवले जाते.

करिअर संधी

हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील करिअर संधी मिळतात- (१) मरिन ऑपरेशन्स मॅनेजर, (२) मरिन इंश्युरन्स स्पेशॅलिस्ट, (३) मरिन टर्मिनल मॅनेजर, (४) शिपिंग एजंट, (५) डेक ऑफिसर, (६) मरिन पायलट, (७) मरिन टेक्निशिअन

अर्हता– () बी.एस्सी इन नॉटिकल सायन्स- खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना १२  वी विज्ञान परीक्षेत, भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयासह ६०  टक्के गुण मिळणे आवश्यक. १० वी आणि १२ वीमध्ये इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना एकूण गुणांमध्ये ५ टक्के सूट. इंग्रजी विषयासाठी ही अट लागू नाही. कालावधी– तीन वर्षे.

() डिप्लोमा इन ॲप्लाइड नॉटिकल सायन्स – १२ वी विज्ञान परीक्षेत, भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयासह ६० टक्के गुण मिळणे आवश्यक किंवा ६० टक्के गुणांसह भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयासह बी.एस्सी किंवा ६० टक्के गुणांसह बी.एस्सी इन इलेक्ट्रॉनिक्स. तीन वर्षाच्या या अभ्यासक्रमात एका वर्षी भौतिकशास्त्राचा अभ्यास केलेला असावा किंवा  मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतील ५० टक्के गुणांसह बी.ई/बी.टेक पदवी. १० वी आणि १२ वीमध्ये इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांना एकूण गुणांमध्ये ५ टक्के सूट. इंग्रजी विषयासाठी ही अट लागू नाही. कालावधी एक वर्षं.

बी.टेक इन मरिन इंजिनिअरिंग

मर्चंट नेव्हीच्या क्षेत्रात, व्यापारी व प्रवासी जहाजाचे संनियंत्रण करणाऱ्या कप्तानाचे महत्व फार मोठे असते. अशा जहाजाची, सुरक्षा – देखभाल- दुरुस्ती आणि सुव्यवस्थित व्यवस्थापनाचे कौशल्य, प्राप्त केलेल्या उमेदवारांना चांगली मागणी आहे.

या अभ्यासक्रमात मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि मरिन इंजिनिअरिंगचे सैध्दांतिक  आणि प्रात्यक्षिक ज्ञान प्रदान केले जाते. याद्वारे व्यापारी जहाजाच्या यंत्रसामग्रीची हाताळणी, देखभाल आणि दुरुस्ती करणे सुलभ जाते. जहाजाची यंत्रसामग्री, इंजिन यांची देखभाल दुरुस्ती, जहाजाचे सुरळित कार्यान्वयन करणे, अशासारखी कामे मरिन इंजिनीअरला करावी लागतात. त्यामुळे ही यंत्रणा सुरक्षित आणि सुव्यस्थित ठेवण्याचे कौशल्य आणि ज्ञान असणे गरजेचे आहे. ही गरज, बी.टेक इन मरिन इंजिनिअरिंग,  हा अभ्यासक्रम पूर्ण करतो. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षे आहे.

करिअर संधी

हा अभ्यासक्रम केल्यावर संबंधित उमेदवाराचे करिअर, मर्चंट किंवा व्यापारी जहाजावर ज्युनिअर इंजिनीअर म्हणून सुरु होते. या जहाजावर विशिष्ट कालावधी घालवल्यानंतर आणि डायरोक्टोरेट जनरल ऑफ शिपिंग, यांच्या वतिने घेण्यात येणारी परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर हा अभियंता, जहाजाचा मुख्य अभियंता बनण्यासाठी पात्र ठरतो.

करिअर संधी- (१) मरिन इंजिनीअर, (२) प्रोजेक्ट मॅनेजर, (३) ऑपरेशन मॅनेजर, (४) मरिन सर्व्हेअर, (४) कंसलटंट, (५) रिसर्चर

संपर्क- आयएमयू, इस्ट कोस्‍ट रोड, सेम्मेनचेर्री, चेन्नई-६००११९, दूरध्वनी- ०४४-२४५३ ९०२०, इमेल-academicscell@imu.ac.in,संकेतस्थळ- imu.ac.in

सुरेश वांदिले