नावात काय?
देशपांडे काकांना पाळीव प्राणी पाळण्याचा छंद होता. त्यांच्याकडे तीन चार वेगळवेगया जातीचे कुत्रे आणि वेगवेगळया मांजरी होत्या.
त्या सर्वांना त्यांनी छान छान नाव दिली होती. एकाचं रोनाल्डो ,दुसऱ्या नेपोलियन, तिसरीचं क्लिओपात्रा, मांजरींच्या नावामध्ये मार्गारेट, एलिजाबेथ, व्हिक्टोरिआ अशी नावं होती. पण यापैकी कोणत्याच नावाने ते आपल्या या मित्रांना हाक मारत नसत. रोनोल्डोला रोनू, नेपोलियनला नेपू, क्लिओपात्रास क्लिओ, तर मार्गारेटला मार्गी, एलिजाबेथला एली, व्हिक्टोरिआस व्हिक्टी असं म्हणत.. मात्र घरी जेव्हा नवे पाहुणे येत, तेव्हा मात्र या सर्व शेपूटवाल्या मित्रांची ओळख पूर्ण नावानीशी करुन देत. हे सर्व या मित्रांच्या लक्षात आले होते.
आपले बाबा असं कां करत असावेत असं सर्वच मित्रांना प्रश्न पडायचा. सर्वांनाच पूर्ण नावाने बोलावलं की आवडायचं. अर्धवट नावानीशी बाबा बोलवत ते काही त्यांना पसंत पडायचं नाही..पण बाबांना सांगायचं कसं हा सर्वांसमोर प्रश्न होता.
एकदा बाबा घरी नसताना ही मंडळी एकत्र बसली आणि आपणास अर्धवट नावानीशी बाबाचं बोलावणं आवडत नसल्याचं कसं सांगायचं, यावर विचार करु लागली.
कुणालाच काही उपाय सुचेना..
आपण पळून जाऊया का, मार्गारेट म्हणाली.
अगं वेडे पळून कुठे जाणार..रस्त्यावर नाही का येणार आपण…
आपण बाबांशी कट्टी घेतली तर.. नेपोलयीन म्हणाला.
अगं, ते थकून भागून घरी येतात तेव्हा असं आपण दुर्मुखलेलं असणं बर दिसेल का?..
आपण जेवणावर बहिष्कार टाकला तर..रोनाल्डो म्हणाला.
म्हणजे उपाशी राहयचं…माझ्याच्याने नाही जमणार बुवा. शिवाय आपण जेवल्याशिवाय बाबा जेवत नाहीत हे आपणास ठाऊक नाही का.. त्यांना कां बरं उपाशी ठेवायचं आपण..
आपण त्यांच्यावर हल्ला केला तर.. क्लिओपात्रा म्हणाली.
अगं वेडे, काहीबाही बोलू नकोस.ते आपले बाबा आहेत. बाबांशी असं वागायचं असतं का? व्हिक्टोरिआ तिला रागवत म्हणाली. त्यातल्या त्यात ती थोडी शहाण्यासारखी विचार करायची..
अरे] आपण असं वेड्यासारखं वागलो तर बाबांना त्रास नाही का होणार..
मग आपल्या नावांची ते मोडतोड करतात त्याने आपणास त्रास होतो, हे नको का त्यांना कळायला. एलिजाबेथ म्हणाली..
अगं, कसला त्रास बाई..आपल्या नावात काय ठेवलय असं ..
असं कसं म्हणतेस गं तू….रोनाल्डो व्हिक्टोरिआकडे रागाने बघत म्हणाला..
अरे दोस्ता, बाबांनी आपली नावं प्रेमानं ठेवलीत. ते बघ ना….त्यांनी आपल्याला नावच दिलं नसतं आणि मला म्हंटलं असतं ऐ कांळुद्रे, तुला म्हंटल ये भुऱ्या तर चाललं असतं का..व्हिक्टोरिआने समजावलं.
तुझं म्हणणं बरोबर आहे गं..आपण बाबांच्या प्रेमाकडे बघायला हवं हे तुझं म्हणणं पटतय मला ..क्लिओपात्रा म्हणाली..
हळूहळू सर्वांनाच व्हिक्टोरियाचं म्हणनं पटलं.. बाबांबद्दल वाईट विचार आले म्हणून सर्वांना वाईट वाटलं. बाबा घरी आले की त्यांच्याशी आणखी प्रेमाने वागून याची भरपाई करु असं सर्वांनी एकमतानं ठरवलं.
सुरेश वांदिले
००००