मित्र
टायसन हा तेजोमयीच्या काकांच्या घरी असलेला शेपूटवाला मित्र. तेजोमयीचे काका यवतमाळला राहतात. अधूनमधून ती काकांकडे जात असते. करोनामुळे यावेळी दोन वर्षांनी ती काकांकडे गेली. काकांकडे, टायसनचा दरारा फार मोठा. तो चांगलाच धिप्पाड असा. भेदक डोळे आणि अतिशय चपळ. कुणीही नवखी व्यक्ती आली की त्याच्यावर जोरदार आवाजात भुंकणं सुरु. अनोळखी व्यक्ती म्हणजे आपल्या घरी येणारा शत्रूच अशी त्याची पक्की समजूत. त्यामुळे कोणतीही अनोळखी आणि अपरिचित व्यक्ती घरात प्रवेश करायला धजावत नाही.
तेजोमयी आणि तिचे आईबाबा हे वर्षातून एखाददोन वेळेसच काकांच्या घरी जात असल्याने टायसनसाठी ते अनोळखीच ठरायचे. त्यामुळे ते जेव्हा जेव्हा यवतमाळला जात, तेव्हा त्याला साखळीने वऱ्हांड्यात बांधून ठेवावं लागायचं. टायसनचा रात्रीचा मुक्काम इथेच असायचा. त्यावेळी त्याची साखळी काढून टाकली जायची, मात्र रात्री तो बाहेर पडू नये म्हणून, लिफ्टला असतो तसा दरवाजा होता.
अनोळख्या व्यक्ती पाहुणे जरी असले तरी टायसन , त्यांच्या अंगावर कधी चालून येईल, याची खात्री नसल्याने पाहुणे जाईपर्यंत तो या वऱ्हांड्यात बंदिस्त राहायचा.
यावेळी तेजोमयी आणि आईबाबांचा मुक्काम आठ दिवस होता. पाहुणे आज जातील, उद्या जातील याची टायसन वाट बघत असावा. कारण सकाळ झाली की तो अस्वस्थ होऊन वऱ्हांडातल्या वऱ्हांड्यात फेऱ्या घालायच्या. मध्येच जोरजोराने भुंकायचा. तेजामयी किंवा तिचे आईबाबा दिसले की त्यांच्याकडे रागावूनच बघायचा. दोन तीन दिवसांनतर त्याला जेव्हा लक्षात आलं की पाहुणे काही आता लवकर जात नाहीत, तेव्हा त्याची अस्वस्थता कमी झाली. भुंकणंही कमी झालं.
तेजोमयी दिसली की तो दरवाजाजवळ येऊन जिभ काढून तिचे निरीक्षण करी. आता तो अजिबात भुंकायचा नाही.
कौस्तुभ हा तेजोमयीचा चुलत भाऊ. टायसनचा तो खास मित्र. कारण तोच त्याच्याशी खेळायचा.त्याला फिरायला घेऊन जायचा. खाऊपिऊ घालायचा. त्याची शि-सू काढायचा. त्यामुळे दोघांची गट्टी अगदी घट्ट मैत्री.कौस्तुभला टायसनच्या स्वभावाची पूर्ण कल्पना होती. टायसनने तेजोमयी आणि तिच्या आईबाबांवर भुंकणं थांबवलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, टायसनला ही मंडळी म्हणजे कौस्तुभची खासा मंडळी आहेत.त्यांच्यावर भुंकायचं नाही. उलट दोस्ती करायची.असच काही तरी. त्यामुळे कौस्तुभने चौथ्या दिवशी त्याला व्हरांड्यातच ठेवलं पण त्याची साखळी काढून टाकली. दरवाज्याच्या बाहेर मात्र येऊ दिलं नाही. साखळीतून मुक्ती मिळाल्याने टायसन खुष झाला. मात्र दरवाज्याच्या बाहेर पडू देत नसल्याने त्याने नाराजीही व्यक्त केली. पण कोणताही धोका नको म्हणून कौस्तुभने त्याला दरवाज्याबाहेर काढले नाही.
पुढच्या तीन-चार दिवसात तर टायसन आणि तेजोमयीची चांगलीच ओळख निर्माण झाली. ती दिसली की तो लगेच शेपटी हलवायला लागे. ती दरवाज्याजवळ बसली की तोही दरवाज्याच्या दुसऱ्या बाजूला बसे. मग एके दिवशी हळूच तेजोमयीने त्याच्या डोक्यावरुन हात फिरवला. त्याने काही केले नाही. डोळे मिटून घेतले. तेजोमयीस मजा वाटत असल्याने ती काही वेळ त्याच्या डोक्यावरुन आणि दरवाज्यातून जितका हात आत जात जाऊ शकेल, तितक्याने हात फिरवू लागली. त्या दिवशी तिने त्याला दरवाज्याच्या बाहेरुन खाऊही घातले.
तेजोमयीने कौस्तुभदादास, टायसनला बाहेर काढण्याचा हट्ट धरला. पण कौस्तुभने मात्र त्याला बाहेर काढण्यास नकार दिला. तेजोमयीने किती विनवणी केली. आपण हात लावला तरी टायसन काहीच करत नाही, आपण दिसलो की टायसनला आनंद होतो, असं वारंवार सांगितलं, पण कौस्तुभ मात्र कोणताचा धोका स्वीकारायला तयार नव्हता.
कौस्तुभच्या बाबांनी म्हणजेच तेजोयमीच्या काकांनी त्याला समजावलं तरी तो काही बधला नाही. त्याचं सुध्दा बरोबरच आहे म्हणा, कुणी सांगावं, टायसन चावला तर..त्याचा काय भरवसा. असं काकांनी तेजोमयीस समजावलं.
हे ऐकून तेजोयमीयस वाईट वाटलं. पण ती काहीच करु शकत नव्हती. गावाकडे परतण्याचा दिवस आला. त्या दिवशी तरी टायसन सोबत खेळायला मिळेल. दादा खेळू देईल असं तिला वाटलं, पण दादाने तिला काही त्याच्यासोबत खेळू दिलं नाही.
दुपारची गाडी असल्याने सगळयांची लवकरच जेवणं झाली. कौस्तुभदादाने स्टेशनवर पोहचवून देण्यासाठी गाडी काढली. तेजोमयी आणि तिचे आई बाबा,सामान घेउुन गाडीजवळ आले. बाहेर पडताना तेजोयमीने टायसनला टाटा केला. ती जात असावी, हे त्याला कळलं असावं. त्यामुळे त्याने भुंकायला सुरुवात केली. त्याचं भुंकणं काही थांबेना. हे नेहमीसारखं भुंकणं नव्हतं. त्याला काहीतरी सांगायचं होतं. त्याची अस्वस्थता वाढली . कौस्तुभ दादाच्याही ते लक्षात आलं . त्याने टायसनला वऱ्हांड्याच्या बाहेर काढलं आणि त्याला दूर एका ठिकाणी बांधलं. तेजोमयीनं मात्र यावेळी दादाचं काही ऐकलं नाही. ती धावत टायसनकडे गेली आणि त्याला मिठी मारली. कौस्तुभ घाबरुन तिकडे धावला. ते बघून टायसन त्याच्यावरच भुंकला..त्याने कौस्तुभकडे रागाने बघितलं. तेव्हा कौस्तुभच्या लक्षात आलं की टायसन तेजोमयीचा चांगला मित्र झालाय. आपले नातेवाईक असल्याचं त्याला कळलय. आपल्याला जसं तेजोमयीस निरोप द्यायचाय तसाच त्यालाही द्यायचाच..कौस्तुभच्या चेहऱ्यावर हसू आलं.तो टायसनजवळ बसला. त्याच्या पाठिवरुन हात फिरवला. त्याला साखळीतून. टायसनला याचा इतका आनंद झाली की तो त्याने उड्या मारुन मारुन व्यक्त केला. त्याने तेजोमयीशी लगट केली. तिच्या आईबाबांच्या जवळ गेला.शेपूट हलवली.जिभेनं चाटलं. ते मऊशार चाटणं तेजोमयीला, काकांच्या घरच्या पाहुचारापेक्षा खूप भारी वाटलं…मात्र गाडीची वेळ होत आल्याने ते गाडीत बसले..तेजोमयीच्या डोळयात अश्रू होते.टायसन हिरमुसला आणि स्वत:च वऱ्हांड्यात जाऊन बसला…
सुरेश वांदिले