(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

Your content goes here. Edit or remove this text inline or in the module Content settings. You can also style every aspect of this content in the module Design settings and even apply custom CSS to this text in the module Advanced settings.

स्मार्ट पोषाखांचे कौशल्य

अमेरिका सरकारने जगातील अनेक देशावर आयातशुल्क लागू केल्याने बराच हाहा:कार माजला आहे. तथापि या संकटातही संधी असल्याचे काही अर्थतज्ज्ञांना वाटते. विशेषत: अमेरिकेला तयार कपडे निर्यात करणाऱ्या अनेक देशांपैकी भारत हाही एक देश आहे. भारतीय वस्त्रप्रावरणावरील आयात शुल्क इतर देशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे भारतात तयार करण्यात आलेली वस्त्रे इतर देशांच्या तुलनेने स्वस्त पडून अमेरिकेन बाजारपेठेत अधिक विकली जातील, असे तज्ज्ञांना वाटते. असे घडेल किंवा नाही, हे काळच ठरवेल. पण वस्त्रप्रावरणांच्या संदर्भातील कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम केल्यास, या क्षेत्रात सध्या उपलब्ध असलेल्या आणि अमेरिकेच्या धोरणांमुळे नजिकच्या काळातील संभाव्य करिअर संधीचा लाभ मिळू शकतो. या संधी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संदर्भातील राहतील.

फॅशनेबल वस्त्रप्रावरणांचे डिझाइन, विक्री, विपणन, इ कॉर्मस, आदी क्षेत्रात कौशल्य निर्मिती करणारे अल्पमुदतीचे  अभ्यासक्रम नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने सुरु केले आहेत.या अभ्यासक्रमांचा कालावधी, सहा महिने ते दोन वर्षे असा आहे. प्रात्यक्षिकांवर अधिकाधिक भर असलेल्या या अभ्यासक्रमांमुळे करिअर करणे सुलभ जाते. हे अभ्यासक्रम निरंतर शिक्षण या प्रणालितील आहेत. ते सोईप्रमाणे म्हणजे सध्यांकाळी किंवा सुटीच्या दिवशी करता येतात. फॅशन उद्योगांशी संबंधित उद्योजक आणि या क्षेत्रातील अभ्यासक यांच्या सल्ल्याने हे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. या क्षेत्रातील उद्योगांना आवश्यक असणारे तंत्र कौशल्य उमेदवारांमध्ये निर्माण व्हावे या हेतूने अशा अभ्यासक्रमांमधील विषय घटक निश्चित करण्यात आले आहेत. प्रात्यक्षिकांवर भर असलेल्या या अभ्याक्रमांच्या पूर्ततेनंतर रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी मिळू शकतात. हे अभ्यासक्रम केल्यावर, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेचे प्रमाणपत्र दिले जाते.

फॅशन ज्ञानशाखेशी निगडित वेगवेगळया पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या संस्थेतील अल्प कालावधीचे कौशल्य निर्मितीचे अभ्यासक्रम करु शकतात.

मुंबई एनआयएफटी कॅम्पसमधील  अभ्यासक्रम

(१) डिप्लोमा इन फॅशन फिट ॲण्ड स्टाइल

राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक फॅशन प्रचलित कल, संभाव्य कल लक्षात घेऊन दर्जेदार स्मार्ट फॅशनेबल डिझायनर्स पोषांखाची निर्मिती करण्याची कला, कौशल्य  आणि तंत्र या अभ्यासक्रमात शिकवले जाते. हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी मिळू शकतात. (१) डिझायनर्स, (२) फ्री लान्स डिझाइन कंसलटंट, (३) डिझाइन मॅनेजर्स, (४) स्टायलिस्ट, (५) फोरकास्टिंग ॲण्ड फॅशन ट्रेंड ऑर्गनायझर, (६) कॉस्च्युम डिझायनर, (६) इलुस्ट्रेटर, (७) पॅटर्न इंजिनीअर, (८) आंत्रप्रिन्युरर्स.

या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षे असून कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण उमेदवारास तो करता येतो.

(२)  एक वर्षं कालावधीचे अभ्यासक्रम

(१) फॅशन क्लोदिंग टेक्नालॉजी, (२) फॅशन रिटेल मॅनेजमेंट, (३) लक्झरी प्रॉडक्ट डिझाइन, दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अर्हता -कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण.

(३) सहा महिने कालावधीचे अभ्यासक्रम

(१) फॅशन मर्कंडायजिंग मॅनेजमेंट, कॉस्टिंग, मॅन्युफॅक्चुरिंग ॲण्ड  रिटेल, (२) कंटेम्प्ररी ब्रायडल (समकालीन किंवा सध्याच्या काळातील नववधुचा पोषाख) डिझाइन, (३) क्रिएटिव्ह फॅशन स्टायलिंग, () क्रिएटिव्ह पॅटर्न मेकिंग, () व्हिज्युअल मर्कंडायजिंग,

(४) सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीचे अभ्यासक्रम

(१) ॲपेरल मॅन्युफॅक्चुरिंग ॲण्ड मॅर्कंडायजिंग मॅनेजमेट, कालावधी-चार महिने, (२) ई -कॉमर्स ॲण्ड सोशल मीडिया मार्केटिंग, कालावधी-तीन महिने, (३) युझर एक्सपिरिअंस डिझाइन, कालावधी- तीन महिने, (४) नॅचरल डायिंग ॲण्ड प्रिंटिंग, फॉर सस्टनेबल फॅशन बिझिनेस, कालावधी-तीन महिने,

(अ,ब आणि क अभ्यासक्रम अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण)

क्रिएटिव्ह फॅशन स्टायलिंग

या अभ्यासक्रमात समकालीन फॅशनच्या संकल्पना, छायाचित्रणाचे तंत्र, सादरणीकरण तंत्र, पोषाखांचा कल, हेअर आणि मेकअप तंत्र, साहित्याची उपलब्धता, मॉडेल कास्टिंग आदी बाबींचे ज्ञान प्रदान केले जाते. कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी हा अभ्यासक्रम करु शकतो. फॅशन स्टायलिंग आणि प्रतिमा संवर्धन कंपन्यांमध्ये करिअरची संधी मिळू शकते. भविष्यात स्वतंत्ररीत्या कार्य करता येणे शक्य होते. कालावधी- सहा महिने.

लक्झरी प्रॉडक्ट डिझाइन

हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील संधी मिळू शकतात- (१) लक्झरी प्रॉडक्ट डिझायनर, (२) डिझाइन मॅनेजर्स, (३) प्रॉडक्ट स्टायलिस्ट, (४) पॅकेजिंग डिझायनर्स, (५) कम्युनिकेशन डिझायनर्स, (६) व्हिज्युअल मर्कंडायझर, (७) ब्रँड मॅनेजर, (८) प्रॉडक्ट मर्कंडायझर, (९) युझर एक्सपिरियंस डिझायनर, (१०) डिझायनर आंत्रप्रिन्युरर्स,

काय शिकाल?

(१) प्रॉडक्ट डिझायनिंगचे तंत्रे आणि तत्वे, (२) ग्राहक आणि विशिष्ट ब्रँडबद्दलची जाणीवजागृती, (३) दागिने/आभुषणे डिझाइनची नवी परिमाणे आणि नवा दृष्टिकोन, (४) फॅशन ॲक्सेसरीजसाठी वापरण्यात येणारे साहित्य, (५) प्रात्यक्षिकांवर भर, (६) संशोधन, (७) कला-संस्कृती-डिझाइन यासंदर्भातील आखीव पर्यटन. कालावधी- एक वर्षं, अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी.

कंटेम्प्ररी ब्रॉयडल डिझाइन

या अभ्यासक्रमात वधु पोषाखाच्या डिझाइनच्या अनुषंगाने रंगसंगती, पोत, आकार, साहित्य या बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. संबंधित वधुची इच्छा आणि आवड, तिचे आकारमान ,तिचा कल या बाबी लक्षात घेऊन या पोषाखाचे नमूने किंवा साचे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. भारतीय, पाश्चिमात्य आणि समकालीन फ्युजन वधु पोषाख निर्मितीच्या सर्व तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम केल्यावर फॅशन डिझायनर, उद्योजक, फॅशनेबल पोषाखांची विक्री केंद्र चालक आदी संधी मिळू शकतात. हा अभ्यासक्रम सहा महिने कालावधीचा आहे.

प्रवेश प्रक्रिया-

या सर्व अभ्यासक्रमांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी वेगवेगळया मुलाखती घेतल्या जातात. मुलाखतीमध्ये उमेदवारांचा संबंधित विषयाच्या अनुषंगाने असलेला कल, या क्षेत्राविषयी असलेली माहिती, शैक्षणिक गुणवत्ता आणि अभ्यासाव्यतिरिक्त इतर कार्यातील सहभाग, संवादकौशल्य, सामान्य ज्ञान आणि सर्जनशील विचार करण्याची क्षमता याची चाचपणी केली जाते. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांना मूळ प्रमाणपत्रे दाखवावी लागतात. तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश मिळालेल्या उमेदवारांचा प्रवेश, मूळ प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय अंतिम केला जात नाही. मुलाखतीचा निकाल संकेतस्थळावर जाहीर केला जातो. तसेच उमेदवारांना ई-मेलद्वारेही कळवला जातो. अंतिम निवड झाल्यावर उमेदवारांना डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात शिकवणी शुल्क  आणि वाचनालय शुल्क तातडीने भरावे लागते. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते.

संपर्क संकेतस्थळ- https://nift.ac.in/mumbai/continuing-education

०००

दिल्ली एनआयएफटी कॅम्पस

(१) सर्टिफिकेट इन फॅशन क्लोदिंग टेक्नॉलॉजी – फॅशन रेखांकने आणि तांत्रिक चित्रांकन, पॅटर्न विकास आणि शिवण कौशल्य, पाश्चिमात्य आणि इंडो-वेस्टर्न पोषाख, बाजार सर्वेक्षण, टेक्सटाइल विज्ञान, संसाधने, आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते.

(२) सर्टिफिकेट इन फॅशन रिटेल मॅनेजमेंट- फॅशन विपणन, किरकोळ खरेदी, व्यापार, ग्राहक संबंधाचे व्यवस्थापन, नाममुद्रा (ब्रँड) व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते.

(३) सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट ऑफ फॅशन बिझिनेस– निर्मिती व्यवस्थापन, किरकोळ व्यवस्थापन ,संस्थात्मक कार्याचं कौशल्य, धाग्यांचे ज्ञान, फॅशन प्रकियेचे ज्ञान आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते.

(४) सर्टिफिकेट इन गार्मेंट एक्स्पोर्ट मर्कंडायजिंग मॅनेजमेंट- व्यापार, निर्यात, फॅशनेबल वस्त्रप्रावरणांसाठी लागणारे साहित्य, वस्त्र निर्मिती आणि गुणवत्ता नियंत्रण, आंतरराष्ट्रीय व्यापार पध्दती, प्रकिया आणि व्यवस्थापन आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते.

(५) सर्टिफिकेट इन ब्युटिक ॲपेरल ॲण्ड ॲक्सेसरी- फॅशन रेखांकने (इलुस्ट्रशेन), बुटिक व्यवस्थापन, डिझाइनचा विकास, वस्त्र निर्मिती, पृष्ठभागावरील सखोल नक्षीकाम/शिवणकाम, एम्ब्रॉयडरी, मूल्यनिर्धारण, आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते.

(६) सर्टिफिकेट इन क्रिएटिव्ह थिंकिंग ॲण्ड डिझाइन डेव्हलपमेंट– डिझाइन कौशल्य आणि विकास, फॅशन चित्रांकन, पॅटर्न डेव्हलपमेंट, आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते.

(७) सर्टिफिकेट इन स्पोर्ट्सवेअर- खेळाडूंसाठी असलेल्या वस्‍त्रप्रावरणांच्या डिझाइन (अभिकल्प), पॅटर्न (साचा) तयार करणे, निर्मिती आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम करणा-या विद्यार्थ्यांना,स्पोर्ट्सवेअर डिझायनर,टेक्निकल डिझायनर,फॅशन स्टायलिस्ट,प्रॉडक्ट डेव्हलपर,ब्रँड मॅनेजर,सस्टेनेबिलिटी स्पेशॅलिस्ट,ॲथेलेश्युअर ट्रेंड ॲनॅलिस्ट,उद्योजक अशा सारख्या करिअर संधी मिळू शकतात.

या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी एक वर्षं. अर्हता कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण.

संपर्क- https://www.nift.ac.in/delhi/continuing-education

सुरेश वांदिले