(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

बापूच जिंकले

सकाळची नित्यकर्मे करुन बापू ध्यानस्थ बसले होते. काही वेळानंतर त्यांनी डोळे उघडले. समोर नेताजी आणि पंडितजी बघून त्यांना आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावर छान हसू आलं.गालावर खळी पडली.

बापू, तुम्ही हसता तेव्हा इतके गोड वाटता की काय सांगू…नेताजी म्हणाले.

साखरेसारखे की गुळासारखे…पंडितजींनी मिस्किलपणे विचारलं..यावर तिघेही मनमोकळे हसले.

बापू, तुमच्यावर आम्ही केलेला विनोद तुम्हास आनंद देतो ना म्हणून जरा आपलं….पंडितजी म्हणाले.

अरे जवाहर, माझ्यावर विनोद होऊ शकतो, याचा अर्थ बंदमे कुछ दम है,असं नाही का? बापू मिस्किलपणे उत्तरले. पुन्हा तिघेही मोकळपणाने हसले..

अरे, तुम्ही आज दोघेही एकत्रच माझ्याकडे कसे काय बुवा आलात…काही खास असल्याशिवाय तुम्हाला बापूची आठवण येत नाही..

काहीतरीच काय बापू.. मी जेव्हा आझाद हिंद सेना स्थापन केली तेव्हा तुम्ही माझ्यावर नाराज होतात तरी सर्वात आधी मी तुमचं स्मरण केलं आणि तुम्हाला मनोमन वंदन करुनच मग माझं काम सुरु केलं..आता तर तसं काहीही नाही ना.. तुमच्याकडे आलं की किती मोकळ वाटतं. निर्भेळ आणि नितळ असा आनंद मिळतो, हो ना रे जवाहर.. नेताजी पंडितजींकडे वळून म्हणाले. पंडितजींनी होकारार्थी मान हलवली.

बरं बरं पुरे झालं माझं कौतुक..आता मुद्द्याचं बोला की…बापुंनी दोघांना मुद्यावर आणले.

बापू आज १२ फेब्रुवारी..पंडितजींनी बापुंना सांगितलं.

अरे जवाहर काल ११ फेब्रुवारी होती म्हणून आज १२ फेब्रुवारी..बापू हसत म्हणाले…नेताजी आणि पंडितजींना काही हसू आलं नाही.त्यामुळे आपला विनोद अगदीच फुसका असल्याचं बापुंच्या लक्षात आलं…त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दाटून आली..

आज काही वाईट घडलं का जवाहर..बापूंनी काळजीच्या सुरात विचारलं..

बापू, आजच्या दिवशी १९२२ साली तुम्ही असहकार आंदोलन मागे घेतलं होतं..

अरे हो की…कसं बुवा विस्मरणात गेलं कुणास ठाऊक.. १२ फेब्रुवारी १९२२ चा तो दिवस आणि आज १२ फेब्रुवारी २०२२ म्हणजे..याचा अर्थ १०० वर्षे झाली म्हणायची..बापू पंडितजींकडे बघत म्हणाले.

बापू..कसं वाटतय या घटनेकडे आता १०० वर्षानंतर बघताना..पंडितजींनी विचारलं..

जवाहर, अरे जेव्हा हे आंदोलन मी मागे घेतलं तेव्हा तुम्ही सगळेजण किती रागावलात माझ्यावर..तुझे पिताश्री मोतिलालजी तर काही काळ मला सोडूनच गेले..

बापू तेव्हा हे आंदोलन किती जोरात होतं. सगळा देश त्यात सामील झाला होता. स्वातंत्र्य मिळवण्याच्या दिशेने टाकलेले हे तोपर्यंतचे सर्वात प्रभावी पाउुल होते. अनेकांना वाटत होत की आता स्वातंत्र्य मिळूही शकतं. पण तुम्ही हे आंदोलन मागे घेऊन आमच्यासारख्या सामान्यांना तोंडघशी पाडलं असं नाही वाटत का आता १०० वर्षानंतर..नेताजी बापूंना म्हणाले. पंडितजींना सुध्दा असचं काहीसं म्हणावसं होतं.

बापुंनी आळीपाळीने दोघांकडे बघितलं. नेताजींचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्या मुलायम स्पर्शाने नेताजींच्या अंगावर रोमांच उभे राहिले. बापू हे दैवी पुरुष असल्याचं नेताजींना पुन्हा एकदा वाटलं.

त्यांच्या मनात काय चाललय हे ओळखून नेताजींच्या डोळयाला डोळा भिडवत बापू म्हणाले,

सुभाष, अरे आपल्या आंदोलनकर्त्यांनी चौरीचौऱ्यात पोलीस ठाणे जाळले. त्यात २२-२५ पोलीस मरण पावले..एकिकडे माझा आग्रह अहिंसक आंदोलकांचा..दुसरीकडे अशी ही हिंसा…हे सारं विसंगत नाही का? तुमच्या मते आंदोलन यशस्वी होत असावं पण या हत्यांनी मात्र ते सपशेल अपयशी ठरलं. असं मला तेव्हा मनापासून आणि ह्रदयातून वाटलं….

पण ते आमच्या लक्षात आलं नाही ना बापू तेव्हा..म्हणून आम्ही आपले तुमच्यावर टीका करत राहिलो..पंडितजी दु:खी अंतकरणाने म्हणाले.

मला तर तेव्हा इतका राग आला होता म्हणून सांगू..नेताजी म्हणाले..

असा राग बरोबर नसतो सुभाष, रागाने काही साध्य होत नाही. हिंसेने काही साध्य होत नाही.. हेच मी सांगत होतो ना..

तुम्हीच बरोबर होता बापू..हिंसेने काही साध्य होत नाही. उलट प्रश्न चिघळतात आणि सुटता सुटत नाही हे नंतरच्या काळात दिसून आलं.. नजर खाली झुकवून नेताजी म्हणाले.. त्यावर बापुंनी स्मित केलं. पंडितजींनी नेताजींच्या पाठिवरुन हात फिरवला. नेताजींना गहिवरुन आले..

अरे, बहादूर मित्रा तुझ्या डोळयात पाणी शोभत नाही. बापुंनी नेताजींना समजावलं…

आम्ही सर्वांनी या असहकार आंदोलनाच्या निमित्त जी टोकाची भूमिका घेतली..तीचूक होती हे तेव्हाच तुम्ही सिध्द केलं…१०० वर्षानंतर तुमची भूमिका आणि तुमची मतं चूक होती हे कुणालाही सिध्द करता आलं नाही..पंडितजी बापूंना म्हणाले.

तसं असेल तरच चांगलचं की नाही. आजच्या मुलांना  हे कळलं पाहिजे. हिंसा म्हणजे पराक्रम नाही. हिंसा म्हणजे कमकुवतपणा, हिंसा म्हणजे स्वत:च्या मनाला जखमी करुन घेणं. शरीराच्या जखमा भरुन निघतात..मात्र मनाच्या जखमा कधीच भरत नाहीत..त्यामुळे मग व्देष वाढतच जातो. त्यामुळे मग पुन्हा आपण हिंसेकडे वळतो नि स्वत:चच नुकसान करुन घेतो. हे आजच्या मुलांना पटलं पाहिजे..बापू भाऊक होऊन म्हणाले..नेताजी आणि पंडितजीही भाऊक झाले.

पण बापू ते कसं शक्य व्हायचं..

अरे, प्रत्येक आईबाबाने त्यांच्या मुलांना प्रामाणिकपणे समजावून सांगायला हवं. आई-बाबा मुलांचं लाड करतात.त्यांना चॉकलेट देतात,चिउुकाऊच्या गोष्टी सांगतात. तशा बापूच्याही या अशा गोष्टी सांगायला हव्या. आजची मुलं स्मार्ट आहेत. त्यांना सांगितलं तर बरोबर कळेल त्यांना…शिवाय जसं सांगितलं तसच ही मोठी मानसं वागली तर काहीच कठीण नाही …बापू म्हणाले..

बापूंचं सांगणं सर्वार्थाने योग्यच होतं. अशी सदबुध्दी आजच्या आईबाबांना मिळू दे, अशी प्रार्थना,नेताजी आणि पंडितजी बापूंच्या समोर असलेल्या पणतीकडे बघून मनोभावे केली. बापूही या प्रार्थनेत सामील झाले.

सुरेश वांदिले