आकाशातील घोडा
तो दिवस होता १८ जून १५७६. झालीत त्याला ५०० वर्षे. असा एखादाच दिवस उगवतो. पण मावळतो तेव्हा, तो दिवस चिरंतन होऊन जातो. १८ जून १५७६ ला हे भाग्य मिळालं. हा दिवस एका थोर अश्वाच्या पराक्रमानं अजरामर झाला.
हा अश्व म्हणजे चेतक. महाराणा प्रतापांचा घोडा.. तो त्यांचा केवळ घोडा नव्हता. तर त्यांचा विश्वासू सखा, मित्र, त्यांचा उत्साह, त्यांची उर्जा होता. कित्येक लढायांमध्ये राणा प्रतापांना शौर्य गाजवताना, चेतकने दाखवलेली चपळता, समयसुचकता महत्वाची ठरली. म्हणूनच महाराणा प्रतापाचे चेतकवर जिवापाड प्रेम होते.
१८ जूनला हल्दीघाटात भीषण युध्दाचा प्रसंग घडला. बादशाहा अकबराची फार मोठी फौज राणा प्रतापच्या राज्यावर चालून गेली. हल्दीघाट अरवली पर्वतरांगेत असणारा एक किलोमीटरचा निमुळता होत जाणारा घाट. या ठिकाणी आपल्या मोजक्या सैन्यासह राणा प्रताप अकबराच्या प्रचंड सैन्यावर तुटून पडले. त्यांच्या पराक्रमाने शत्रूची दानादान उडाली होती. त्यांच्यापुढे आलेला प्रत्येक शत्रू धारातीर्थी पडत होता. महाराणा प्रताप त्या दिवशी सूर्यापेक्षाही अधिक तेजाने तळपत होते. त्या तेजाने शत्रूसैन्याचे डोळे दिपून गेले होते.
राणा प्रताप तलावरीने सपासप वार करत, अकबराचे सेनापती राजा मानसिंग यांच्या पर्यंत पोहचले. राजा मानसिंग एका हत्तीच्या अंबारीत बसून लढत होता. त्या धिप्पाड हत्तीपुढे चेतक चपळतेने उभा ठाकला. महाराणा प्रतापाने अचूक नेम साधत मानसिंगांकडे भाला फेकला. पण हत्तीच्या माहुताने तो वार स्वत:च्या अंगावर झेलला. माहूत खाली कोसळला. काही कळण्याच्या आधी, मानसिंगांने हत्तीच्या एका दातात अडकवलेली तलवार मोकळी केली. त्या मोकळया तलवारीने चेतकच्या एका पायावर वार केला. तो इतका जबर होता की, चेतक हडबडून गेला. त्याला चार पायांवर उभे राहणं शक्य होईना. राणा प्रतापांचाही तोल जाऊ लागला. जणू काही सूर्याला ग्रहण लागावे, अशी ती स्थिती होती.
राणा प्रताप संकटात सापडल्याचे लक्षात येताच त्यांचे काही निष्ठावंत सैनिक गोळा झाले. लगेच त्यांनी राणा प्रतापांभोवती संरक्षण कवच उभे केले. जखमी अवस्थेतील चेतकसोबत त्यांनी राणा प्रतापांना रणांगणाच्या बाहेर काढले.
प्रसंगाचे गांभीर्य, राणाप्रतापांचा निष्ठावंत, मित्र आणि सखा असलेल्या चेतकच्या लक्षात आलं असावं, प्रचंड वेदना होत असतानाही त्याने राणा प्रतापाच्या इशा-यासोबत सुरक्षित दिशेने धावायला सुरुवात केली..वाटेत एक मोठा नदीचा प्रवाह लागला..तो पार करणे अशक्यप्राय होते. शत्रू कधीही मागावर येऊ शकला असता. इकडे आड तिकडे विहीर अशी विलक्षण स्थिती होती. पण, चेतकने या प्रसंगी आपली सर्व क्षमता आणि उर्जा एकवटून उडी घेतली. जवळपास २२ मिटरची ती उडी होती. या किनाऱ्यावरुन त्या किनाऱ्यावर त्याने प्रतापांना आणून सोडले. आपला सखा आता सुरक्षित असल्याचं त्या मुक्या जीवाला कळलं असावं.
केवळ तीन पायांवर आतापर्यंत धावल्याने चेतकच्या शरीरात त्राण उरले नव्हते. प्रतापांना सुरक्षित ठिकाणी पोहचवल्याचं लक्षात येताच चेतक धाडदिशी कोसळला. त्याच्या शरीरातील उर्जा निघून गेली. काही क्षणात त्याने प्राण सोडले.
मातृभूमिसाठी लढणाऱ्या महाराणा प्रताप सारख्या जाज्वल्ल योध्द्याला स्वत:च्या प्राणाची बाजी लावून सुरक्षित ठिकाणी पोहचवणारा चेतक हा त्यांच्या इतकाच महापराक्रमी निघाला. निष्ठा, प्रेम साहस, मैत्री, पराक्रम, चैतन्य, उर्जा, प्रसंगवधान या गुणांचे प्रतिक ठरला.
प्राणापेक्षाही प्रिय असणाऱ्या चेतकाची अपार उर्जा घेऊन पुढे अनेक वर्षे महाराणा प्रताप शत्रूशी झुंजत राहिले. बादशहा अकबरकडून पराभूत न झालेले तेव्हाचे ते एकमेव राजपूत राजे होते. त्याची खंत शेवटपर्यंत अकबरास राहिली..
थोर लोककवी शाम नारायण पांडे यांनी चेतक की वीरता, या कवितेत त्याचं वर्णन आकाश का घोडा असं केलय. आकाशातील घोडा म्हणजे परमेश्वराने पाठवलेला घोडा…आपल्या अद्भभूत कर्तव्यपूर्तीने ते चेतकने सिध्दच केलं.
चेतकने ज्या ठिकाणी हे प्राण सोडले ते ठिकाण हल्दी घाटीपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. तिथे त्याची समाधी उभारली आहे. या समाधीला भेट देताना, मन उचंबळून येतं. राणा प्रतापांचा पराक्रम नजरेसमोर तरळून जातो आणि चेतकाच्या स्वामीनिष्ठने मन भरून येते. आपण देवी देवतां मूर्तीसमोर नतमस्तक होतो.तसच या आकाशातील घोड्यापुढेही व्हायला हवं….
सुरेश वांदिले