(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 उघडा डोळे बघा नीट..

कुंभलगडच्या किल्ला बघत असताना एका दालनात तेजोमयी थबकली. त्या दालनात रंगवलेली सर्वच्या सर्व चित्रं फक्त हत्तींची होती.

हत्तीशिवाय दुसऱ्या प्राण्यांची चित्र कां बरं काढलं नसतील इथं… असा प्रश्न तेजोमयीच्या मनात आला. तिने तो बाबांना विचारला.

तेव्हा कुठे बाबा आणि सोबतच्या काका काकूंच्या लक्षात या दालनातील हत्तीच्या चित्रांचं वैशिष्ट्य लक्षात आलं. तेव्हा साऱ्यांनी पुन्हा एकदा त्या चित्रांकडे काळजीपूर्वक बघितलं. चारही भिंती हत्तींच्या चित्रांनी व्यापलेल्या होत्या.

एकाहून एक धिप्पाड हत्ती रागावलेले दिसत होते. काहींचा राग अनावर झाला होता. काही हत्ती दुस-या हत्तींसोबत लढत होते. जणू काही दोन शत्रू एकमेकांसमोर उभे ठाकून लढताहेत, असं ती चित्र बघून वाटत होतं.

 

या चित्रातील एकही हत्ती शांतपणे बसलेला नव्हता. रागावलेले हत्ती  आपला राग एकतर झाडांच्या बुंध्याना धडका देऊन काढत होते. सोंड उंच करुन चित्कार करुन राग दर्शवत होते. सोंडेत ओंडके पकडून दुसरीकडे फेकण्याची कृती करत होते, किंवा एकमेकांवर धावून जात होते. काही निव्वळच इकडून तिकडे निरर्थक धावताना दिसत होते. काही दोन मल्लांसारखे एकमेकाला भिडले होते. एक हत्ती अस्वलाशी धडक देत होता.

हे असंच कां बरं चित्रकारास काढावं वाटलं असेल हो बाबा..तेजोमयीनं पुन्हा विचारलं..

आता हे मी कसं सांगणार बुवा तुला..

तुम्हाला काय वाटत काका..तेजोयीने आपला मोर्चा काकांकडे वळवला.

अरे, हा असा प्रश्न आपल्याला कां बरं पडला नाही..काका तिच्याकडे कौतुकाने बघत म्हणाले..

हिलाच कसं बाई हे वेगळं दिसत गं..एक काकू तेजोमयीच्या आईस म्हणाली.

असं काही दिसणं चूक की काय, तेजोयमी सहज बोलून गेली..

नाही नाही..चूक कसं..अगं आम्हाला या चित्रांमध्ये काहीच वाटलं नाही, ते तुला कळलं ना.. तीच तरी खरी मजा असते..आम्ही आपले डोळे बंद करुन बघत होतो….एका काकूने आपलं मत दर्शवलं.

मग आलोच आहे इथे, दिसतायत चित्र बघा नि आटोपतं घ्या..असं मला वाटत होतं, दुसऱ्या काकू म्हणाल्या.

या दालनात केवळ हत्तीचेच चित्र आहेत ,हे सुध्दा आमच्या लक्षात आलं नाही..तेजोमयीने हे वेशिष्ट्य बरोबर टिपलं.

छान हं….असंच डोळे उघडूनच पर्यटन करायचं असतं. तरच नव्या गोष्टी दिसतील, समजतील, त्यांच्याबद्दल प्रश्न पडतील. प्रश्नांवर चर्चा होईल..एक काका बाबांना म्हणाले.

म्हणजे कसं पर्यटन जिवंत झाल्यासारख वाटेल..दुसरे काका म्हणाले..

अन्यथा या…नजर टाका नि पुढे चला..संपलं दर्शन..काकूने खंत व्यक्त केली.

पण तेजो, तुझ्यामुळे आम्हालाही आता नजर आली बरं का, पर्यटनातल्या बारी‍क सारीक गोष्टी बघून त्यांचा आनंद घेण्याचा आणि आश्चर्यचकित होण्याचा..

सर्वांनी तेजोमयीचं कौतुक केलं. तिलाही बरं वाटलं..पुन्हा एकदा सर्वांनी डोळाभरुन रागाववेल्या हत्तींची चित्र बघितली..आणि दुसऱ्या दालनाकडे त्यांनी प्रयाण केले..

सुरेश वांदिले