गणराय रागावले…
शिवाजी पार्कात आपल्या बाजूलाच उद्यान गणेश विराजमान असल्याचं शिवाजी महाराजांना ठाऊक होतं. अधूनमधून ते श्री गणेशाचे दर्शन घेत असत. परवा असच महाराजांना श्री गणरायांचं दर्शन घ्यावं वाटलं. त्यामुळे गणरायाच्या दर्शनासाठी ते अश्वावरून खाली उतरले, मंदिराच्या आत शिरल्यावर उद्यान गणेशांना मनोभावे वंदन करणार तोच उद्यान गणेशांचे उद्गार त्यांच्या कानी पडले…
थांबा शिवबा थांबा..तुमचं तुमच्या प्रजेकडे लक्ष नाहीय..
महाराज थबकले. गणराय असं कां म्हणाले असतील, यांचं त्यांना फार फार आश्चर्य वाटलं.
गणराया काही चुकलं कां आमचं..
शिवबा, तुमचं चुकलं की आमचं चुकलं हेच कळेनास झालय. गणराय खिन्नतेनं म्हणाले.
गणराया काय झाले ते तर सांगा…
सांगतो सांगतो..त्याआधी आपण जरा दादरमधून एक फेरी मारुन येऊ..
महाराजांनी संमती दर्शवली. ताब्यांतील पाण्याचे दोनतीन थेंब हातावर घेऊन गणरायांनी एक मंत्र पुटपुटला. ते पाणी महाराजांवर शिंपडलं. महाराज अदृष्य झाले. गणरायही अदृष्य झाले. त्यामुळे ते दोघेही कुणालाही दिसले नाहीत.
चालत चालत ते दादर मार्केटमध्ये आले. सगळीकडे गर्दिच गर्दी दिसत होती.
बघितलत शिवबा..कसली म्हणून कसली शिस्त नाही या प्रजाजनांना..गणराय शिवबांकडे बघून म्हणाले.
या गर्दीकडे महाराजांनी काळजीपूर्वक बघितलं. काही लोकांनी नाक झाकणारी मुखपट्टी लावली होती. काही लोकांनी केवळ तोंडावरच मुखपट्टी लावली होती. काही लोकांच्या केवळ गळयात एखाद्या हारासारखी मुखपट्टी लटकत होती. तर बऱ्याच लोकांकडे तेही नव्हतं.
लोकं एकमेकांना खेटून चालत आणि बोलत होती. एकमेकांच्या तोंडाजवळ तोंड नेऊन बोलत होते. कुणीतरी मध्येच रस्त्यात पचकन थुंकलं. त्याचे शिंतोडे एकदोन लोकांच्या अंगावर उडाले.
कुणीतरी मध्येच खोकललं. ती व्यक्ती महाराजांच्या तोंडासमोरच होती. गणरायांनी पटकन महाराजांना आपल्या बाजूला ओढून घेतलं. अन्यथा त्या व्यक्तीच्या खोकल्याची थुंकी महाराजांच्या नाकीतोंडी शिरली असती. महाराजांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
गणराय म्हणाले ते अगदी खरं होतं..पूर्णपणे शिस्तिचा अभाव होता. ही बेशिस्त महाराजांना बघवेना. त्यांची अवस्था गणरायांच्या लक्षात आली. ते दोघेही माघारी फिरले आणि शिवाजी पार्कात परत आले.
बघितलत शिवबा…या तुमच्या प्रजेला आणि माझ्या भक्तांना कशाचीच फिकीर करावयाची गरजच वाटत नाही. इतका मोठा साथीचा हा रोग..त्यावर अजून औषध नाही. फक्त छोटीशी काळजी घेतली तरी हे भक्तगण स्वत:ही सुरक्षित राहतील आणि त्यामुळे इतरही सुरक्षित राहू शकतील ना. पण ते करण्याची यांची तयारी नाही.
गणराया ही बेशिस्त बघून मला तर यांना शिक्षाच करावीशी वाटते. महाराज गणरायांना म्हणाले.
शिवबा, आपण शिक्षा करण्याची गरजच नाही. त्यांच्या अशा बेशिस्त वागण्याने ती आपोआपच मिळेल त्यांना..मी तर ठरवलय आता..
काय ठरवलय गणराया..
आता जेव्हा कधी मंदिरात ही भक्त मंडळी येऊन, बाप्पा आम्हाला वाचवा असं गाऱ्हाणं गातील, तेव्हा ज्या ज्या भक्तांनी नाक आणि तोंड झाकण्यासाठी मुखपट्टी बांधण्याचा नियम तंतोतंत पाळला असेल, आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी शिस्त आणि स्वच्छता पाळली असेल त्यांनाच असेल माझा आशीर्वाद. बाप्पा त्रिकालदर्शी आहेत. त्यांना सगळच दिसतं. ते सगळं लक्षात ठेवतात. हे तरी भक्तांनी लक्षात ठेवायला नको का? मी जरी विसरलो तर माझा मूषकस्वामी आहेच आठवन करुन द्यायला..
गणरायांचा हा निर्णय महाराजांना मनोमन पटला. त्यांनी गणरायांना दंडवत घातला आणि ते पुन्हा अश्वारुढ झाले….
सुरेश वांदिले