
प्रशिक्षकांचे प्रशिक्षण
रोजगार आणि स्वंयरोजगारासाठी विविध प्रकारचे तांत्रिक कौशल्ये उपयुक्त ठरतात. असे कौशल्य प्राप्त केलेल्या तरुण – तरुणिंना स्वत:च्या पायावर आत्मविश्वासाने उभे राहता यते. पुढे, या कौशल्यात वाढ केल्यास आणि नवी कौशल्ये आत्मसात केल्यास, अशा तरुण-तरुणींसाठी आणखी प्रगतीच्या संधी टप्प्याटप्याने उपलब्ध होतात. तांत्रिक कौशल्याचे विविध अभ्यासक्रम, औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे, तांत्रिक प्रशिक्षण केंद्रे, कौशल्य विकास केंद्रे, तंत्रनिकेतने इथे सुरु करण्यात आली आहेत. या संस्थांमध्ये सध्याच्या काळात, आवश्यक विविध व्यवसाय (ट्रेड) प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. या संस्थांमधील प्रशिक्षणासाठी चांगल्या आणि दर्जेदार प्रशिक्षकांची गरज भासते. ही गरज भागवण्यासाठी, भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागामार्फत, शिल्पकारागीर प्रशिक्षक प्रशिक्षण योजना (क्रॅफ्ट इंस्ट्रक्टर ट्रेनिंग स्किम) राबवली जाते. या संस्थांमधील प्रशिक्षक होण्यासाठी आवश्यक कौशल्य आणि ज्ञान, प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी, ही योजना सुरु करण्यात आली.
या योजनेंतर्गत प्रशिक्षित झालेल्या प्रशिक्षककाडे, उद्योगांसाठी लागणाऱ्या अर्धकुशल आणि कुशल मनुष्यबळाला, प्रगत तंत्रकौशल्याचे ज्ञान प्रदान करण्याचे कार्य, सोपवले जाते. हा प्रशिक्षक औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमध्ये, कौशल्य प्रशिक्षण प्रभावीपणे देऊ शकतो. लघु आणि दीर्घ मुदतीच्या कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये सर्टिफाइड (प्रमाणित) प्रशिक्षक म्हणून महत्वाची भूमिका बजावतो. कामगारांमध्ये, कौशल्य विकास करण्यासाठी, सुविधा पुरवण्याची भूमिका बजावतो. लेखी प्रशिक्षण साहित्य, ई लर्निंग साहित्याची निर्मिती करु शकतो. या अभ्यासक्रमाव्दारे, व्यायसायिक अभ्यासक्रम, प्रशिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील प्रवेशव्दार उघडले जाते.
प्रशिक्षक अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी, अखिल भारतीय स्तरावर, ऑल इंडिया कॉमन एन्ट्रन्स (एआयसीइटी) टेस्ट घेतली जाते. त्याव्दारे, प्रशिक्षक होण्यासाठी उमेदवाराचे कौशल्य, कल आणि ज्ञान यांची तपासणी केली जाते. एआयसीइटी ऑनलाइन घेतली जाते. या परीक्षेतील कामगिरी आणि संस्थेचा पसंतीक्रम लक्षात घेऊन, केंद्रिय प्रवेश प्रकियेव्दारे उमदेवारांची निवड केली जाते.
या परीक्षेव्दारे, महाराष्ट्रातील नॅशनल स्किल ट्रेनिंग सेंटर मुंबई आणि नागपूर, कोल्हापूर, अंबरनाथ-ठाणे, औंध-पुणे, नासिक, छ.संभाजीनगर, अमरावती येथील इंस्टिट्यूट फॉर ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स येथे प्रवेश मिळू शकतो.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे २०२५ आहे. दि. ५ ते १४ जून पर्यंत मॉक (अभिरुप/सराव) चाळणी घेतली जाईल. परीक्षा १५ जून २०२५ रोजी घेतली जाईल. परीक्षेचा कालावधी दोन तास. या पेपरमध्ये उमेदवारांनी, ज्या ट्रेडच्या प्रशिक्षक अभ्यासकमासाठी अर्ज केला असेल, त्यावर ७५ टक्के प्रश्न विचारले जातात. २५ टक्के प्रश्न तार्किकता (लॉजिकल), संख्यात्मक (न्युमेरिक), कार्यकारणभाव (रिझनिंग) या घटकाचे ज्ञान तपासणिसाठी विचारले जातात. वस्तुनिष्ठ पध्दतीचे प्रश्न असतात. महाराष्ट्रात, ही परीक्षा नागपूर, मुंबई/नवी मुंबई, पुणे या केंद्रावर घेतली जाईल.
ट्रेड आणि अर्हता
प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी काही ट्रेड आणि अर्हता पुढील प्रमाणे- (१) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन- अर्हता- आर्किटेक्चर पदवी किंवा ३ वर्षे कालावधीची आर्किटेक्चर विषयातील पदविका किंवा १०वी नंतर आयटीआय मधील दोन वर्षे कालावधीचा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन अभ्यासक्रम, (२) कॅटेरिंग ॲण्ड हॉस्पिटॅलिटी- हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटेरिंग टेक्नॉलॉजी किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटेरिंग टेक्नॉलॉजी विषयातील बॅचलर ऑफ वोकेशन पदवी किंवा हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटेरिंग टेक्नॉलॉजी विषयातील पदविका किंवा १०वी नंतर आयटीआय मधील एक वर्ष कालावधीचा कॅटेरिंग ॲण्ड हॉस्पिटॅलिटी, फूड प्रॉडक्शन, फूड ॲण्ड बिव्हेरेजेस, सर्व्हिस असिस्टंट, हाऊस कीपर, फ्रंट ऑफिस, बेकर आणि कन्फेक्शनर ट्रेड, (३) कॉम्प्युटर एडेड डिझायनिंग ॲण्ड एम्ब्रॉयडरी- टेक्सटाइल डिझायनिंग/ फॅशन डिझायनिंग, कॉस्च्युम डिझाइन ॲण्ड ड्रेस मेकिंग, फॅशन टेक्नॉलॉजी पदवी किंवा १०वी नंतरची ३ वर्षे कालावधीची टेक्सटाइल डिझायनिंग/ फॅशन डिझायनिंग, कॉस्च्युम डिझाइन ॲण्ड ड्रेस मेकिंग, फॅशन टेक्नॉलॉजी विषयातील पदविका किंवा १०वीनंतर आयटीआय मधील १ वर्षं कालावधिचा कॉम्प्युटर एडेड डिझायनिंग ॲण्ड एम्ब्रॉयडरी डिझायनिंग ट्रेड, (४) कॉम्प्युटर हार्डवेअर ॲण्ड नेटवर्क मेंटेनंन्स – कॉम्प्युटर सायंस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग, या विषयातील पदवी किंवा १० वी नंतरची ३ वर्षे कालावधीची कॉम्प्युटर सायंस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग, या विषयातील पदविका किंवा १० वी नंतरचा १ वर्षे कालावधीचा कॉम्प्युटर हार्डवेअर ॲण्ड नेटवर्क मेंटेनंन्स ट्रेड,
(५) कॉम्प्युटर सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन- कॉम्प्युटर सायंस/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयातील पदवी किंवा १०वी नंतरची ३ वर्षे कालावधीची कॉम्प्युटर सायंस/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयातील पदविका किंवा १०वी नंतर आयटीआय मधील १ वर्षं कालावधीचा कॉम्प्युटर सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन विषयातील ट्रेड
(६) कॉस्मेटॉलॉजी- कॉस्मेटॉलॉजी, हेअर ॲण्ड स्किन, ब्युटिशिअन अभ्यासक्रम पदवी किंवा १० वी नंतरची ३ वर्षे कालावधीची कॉस्मेटॉलॉजी, हेअर ॲण्ड स्किन, ब्युटिशिअन अभ्यासक्रम पदविका किंवा १० वीनंतर आयटीआय मधील १ वर्षं कालावधीचा कॉस्मेटॉलॉजी, हेअर ॲण्ड स्किन, ब्युटिशिअन ट्रेड, इत्यादी.
अशा ४१ च्या ट्रेडसचा प्रशिक्षणासाठी समावेश करण्यात आला आहे. यामध्ये, ॲरोनॉटिकल/ इक्विपमेंट फिटर, डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर, डॉफ्ट्समन सिव्हिल, डॉफ्ट्समन मेकॅनिकल, ड्रेस मेकिंग, इलेक्ट्रिशिअन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फॅशन डिझाइन ॲण्ड टेक्नॉलॉजी, फ्रुट्स ॲण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, फिटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फाउंड्रीमॅन, इंस्ट्रुमेंट मेकॅनिक, इंटेरिअर डिझाइन ॲण्ड डेकोरेशन, मशिनिस्ट ग्रायंडर, मशिनिस्ट ॲण्ड ऑपरेटर- ॲडव्हान्स्ड मशिन टूल, मेकॅनिक ॲग्रिकल्चरल मशिनरी, मेकॅनिक- डिझेल, मेकॅनिक मशिन- टूल मेंटनन्स, मेकॅनिक रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर, मेकॅनिक मोटार व्हेईकल, मेकॅनिक ट्रॅक्टर, ऑफिस मॅनेजमेंट, पेंटिंग टेक्नॉलॉजी, रिडिंग ऑफ ड्राईंग ॲण्ड अर्थमॅटिक, प्लम्बर, स्युईंग टेक्नॉलॉजी, शीट मेटल वर्क, सर्फेस ऑर्नामेंटेशन टेक्निक, सर्व्हेयर, टूल ॲण्ड डायमेकर, टर्नर, वेल्डर, वूड वर्क टेक्निशिअन, या ट्रेड्सचा समावेश आहे. या ट्रेड्सच्या, प्रशिक्षक प्रशिक्षणासाठी आवश्यक अर्हतेची माहिती, संकेतस्थळावरील माहितीपुस्तिकेत (प्रॉसेप्टक्टस २०२५) विस्तृतपणे देण्यात आली आहे.
संपर्क-nimionlineadmission.in
मुंबई येथील नॅशनल स्किल क्रॅफ्ट इंस्टिट्यूटमध्ये पुढील ट्रेड्सच्या प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते- (१) कॉम्प्युटर सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन, (२) इंस्ट्रुमेंट मेकॅनिक, (३) टर्नर ,(४) वेल्डर – गॅस आणि इलेक्ट्रिक ,(५) मशिनिस्ट, (६) फिटर ,(७) मेकॅनिक मोटर व्हेईकल, (८) इलेक्ट्रिशिअन, (९) ड्राफ्ट्समन मेकॅनिकल – (१०) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक. या सर्व प्रशिक्षणाची, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्युएफ)(राष्ट्रीय कौशल्य अर्हता/पात्रता रचना) श्रेणी सहा आहे. (याचा अर्थ, या श्रेणिपर्यंतचे ज्ञान आणि कौशल्य संबधिताने प्राप्त केले, असा होतो.)
संपर्क– नॅशनल स्किल ट्रेनिंग इंस्टिट्यूट, व्ही. एन. पुरव मार्ग, प्रियदर्शनी (आरसीएफ) च्या विरुध्द दिशेला, चुनाभट्टी, सायन, मुंबई- ४०००२२, संकेतस्थळ-https://nstimumbai.dgt.gov.in/cits
०००
वूड सायंस ॲण्ड टेक्नॉलॉजी
भारत सरकारच्या वने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत, कार्यरत इंस्टिट्यूट ऑफ वूड सायंस ॲण्ड टेक्नॉलॉजी या संस्थेने, लाकूड क्षेत्रातील उद्योगांना लागणाऱ्या कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्मितीसाठी पुढील दोन अभ्यासक्रम सुरु केले आहेत- (१) डिप्लोमा इन ॲडव्हान्स्ड वूड वर्किंग- या अभ्यासक्रमात, लाकूड आणि लाकडापासून तयार करावयाच्या विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी आवश्यक कौशल्य प्रदान केले जाते. कालावधी एक वर्षं. यापैकी सहा महिने, उद्योगामधील प्रशिक्षणाचे आहेत. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी, अत्याधुनिक वूडवर्किंग यंत्रांवर सुलभतेने काम करु शकतात.
(२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन वूड ॲण्ड पॅनेल टेक्नॉलॉजी. अशा प्रकारचा हा देशातील एकमेव अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमातील विषयघटकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये, लाकडावरील विविध तांत्रिक प्रक्रियेचे कौशल्य विकसित केले जाते. गुणवत्ता व्यवस्थापन, सादरीकरण कौशल्य, संवादकौशल्य यावरही लक्ष केंद्रित केले जाते. प्लायवूड निर्मिती, बांबूपासून निर्मित विविध उत्पादने/ वस्तू, ॲडेहेसिव्ह मॅन्युफॅक्च्युरिंग अशा उद्योगांमध्ये प्लेसमेंट मिळते. औद्योगिक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. अर्हता- बीएस्सी (फिजिक्स/ केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स/ फॉरेस्ट्री) बीई/ बीटेक. प्रवेशासाठी पदवी परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात.
संपर्क- इंस्टिट्यूट ऑफ वूड सायंस ॲण्ड टेक्नॉलॉजी, मल्लेश्वरम, बेंगळुरु- ५६०००३, ईमेल-, संकेतस्थळ-https://iwst.icfre.gov.in,ईमेल-dir_iwst@icfre.org,दूरध्वनी-०८०-२३३४१७३१
सुरेश वांदिले