(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

  

गैरसमजुतीचा घोटाळा

सश्यांच्या राज्यात अधूनमधून शिकारी कुत्रे येत आणि काही सशांना मारुन त्यांना घेऊन जात. सशांच्या राजाला प्रश्न पडला की आपण आपल्या प्रजेचं रक्षण तरी कसं करायचं? या विचारातच ससे महाराज मग्न असताना एके दिवशी महाराणी त्यांना म्हणाल्या,

महाराज अशा विचारात दिवसेंदिवस घालवून काही उपयोग नाही. शिकारी कुत्र्यांना आपण काही तोंड देऊ शकत नाही. वेगळा काहीतरी विचार केला पाहिजे.

पण राणीसाहेब वेगळा विचार म्हणजे काय?.ससे महाराजांनी विचारलं.

राणीसाहेब विचारा करु लागल्या. थोड्यावेळाने त्यांना सुचलं. त्या म्हणाल्या, महाराज आपण सिंहेश्वरांना भेटून त्याना मदत करायला सांगू..

राणीसाहेब, सिंहेश्वर आपल्याला मदत तर करणारच नाहीत उलट आपल्याला गट्टम करुन मेजवाणी साजरी करतील..ससे महाराजांनी चिंता व्यक्त केली.

मग आता काय करायचं? राणी साहेबांनी विचारलं.

तुम्ही काही तरी सुचवा ना..पुन्हा जरा मेंदुला ताण द्या..ससे महाराजांनी, राणीसाहेबांना विनंती केली.

महाराज, आपला जीव छोटा असला तरी आपण इतर प्राण्यांना लहान-सहान मदत करु शकतो. अशी मदत करुन आपण त्यांच्यासोबत मैत्री करु. हे आपले मित्र आपल्यावर संकट येईल तेव्हा आपल्या मदतीला धावून येतील..

ससे महाराजांना राणीसाहेबांचं सांगणं पटलं. ते लगेच कामासही लागले. त्यांनी घोडेरावांकडे मैत्रीचा हात पुढे केला. पण घोडेराव त्यांना तुच्छतेने म्हणाला, अरे तू इतका पिटुकला..तुझ्याशी मैत्री करुन माझा काय फायदा. जा पळ इथून..

मग ससे महाराज एका बैलाकडे गेले. बैल म्हणाला,          अरे पिटुकल्या, असा लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. मी कुठे तू कठे. मी एवढा मोठा पर्वत तर तू इटुकला वाळूचा उंचवटा..हवा आली फुस्स होणार…चल जा इथून..

मग ससे महाराज एका मेंढीकडे गेले. मेंढी म्हणाली, अरे ससोबा…मैत्री बरोबरीच्यांशी होत असते. माझी मैत्री शेळीसोबत होऊ शकते, तुझ्यासारख्या मिटुकल्याशी मी मैत्री केली तर आमच्या सर्व मेंढी मला हसणार..मला नाही बाई,माझं हसं करुन घ्यायचय. तेव्हा दोघे काही मित्र होऊ शकत नाही.. मेंढी ससे महाराजांना म्हणाली आणि गवत चरण्यात मग्न झाली. ससोबाला नाइलाजाने मेंढीकडूनही निघून यावे लागले.

कोणत्याही मोठ्या प्राण्याने ससोबांशी मैत्री करण्यास नकार दिला. ससोबा फार दु:खी झाला. त्याला काही सुचेना. त्यामुळे एका आंब्याच्या झाडाखाली बसला नि रडू लागला. ते रडू ऐकून त्या झाडाजवळच बिळात राहणाऱ्या उंदरास त्याची दया आली. तो ससे महाराजांसमोर आला आणि त्याने काय झालं म्हणून विचारलं. त्याने ससे महाराजांना धीरही दिला. त्यामुळे त्यांचे दु:ख कमी झाले. त्यांनी रडणं थांबवलं आणि आतापावेतो काय घडलं ते उंदरास सांगितलं.

ते एकून उंदीर विचारात पडला. मात्र लगेच तो ससे महाराजांना म्हणाला, चल मी तुला सिंहेश्वरांकडे घेऊन जातो. ते माझे मित्र आहेत. ते तुला नक्कीच मदत करतील..

अरे, ते कसं शक्य आहे. त्यांना तर मी मेजवाणीसाठी हवा असतो ना..

अरे ससोबा, सिंहेश्वरांना तुझ्यापेक्षा मोठे मोठे प्राणी मिळतात मेजवाणी झोडण्यासाठी..ते तुझ्याकडे बघणारही नाहीत त्यादृष्टिने..शिवाय त्यांना काही दररोज दररोज मेजवाणी लागत नाही. एकदा शिकार केली की आठ- दहा दिवस निवांत असतात ते..

माझ्यावर हल्ला केला तर..

नाही करणार, अजिबात हल्ला करणार नाही. मी आहे ना सोबत तुझ्या..उंदराने ससे महाराजांना आश्वस्त केले. आणि त्याला घेऊन महाराजांच्या दरबारी गेले.

उंदरास बघून सिंहेश्वरांना आनंद झाला. त्यांनी येण्याचे प्रयोजन विचारलं. तेव्हा उंदराने ससे महाराजांची व्यथा त्यांना सांगितली.

अरे, ससोबा हे तुम्ही स्वत: माझ्याकडे येऊन सांगू शकला असतात ना..उगाच उंदरोबास त्रास दिला.

म म महाराज मला वाटलं तुम्ही मला मारुन टाकाल..

म्हणजे माझ्याबद्दल गैरसमज आहे, तुझ्या मनात तर..

तसं नाही महाराज..पण

अनुभव न घेता किंवा काहीही माहिती नसताना किंवा एैकिव माहितीवर गैरसमजूत करुन घेणं उचित नाही ससोबा. या गैरसमजुतीमुळे तुम्ही इतके दिवस तुमचं नुकसान करुन घेतलं की नाही..

होय सिंहेश्वरा, क्षमा असावी..

ठीक आहे..आम्ही त्याशिकारी कुत्र्यांचा बंदोबस्त करु..मात्र तुम्ही आपल्या वननगरित सर्वत्र फिरुन आमच्या बद्दलचा गैरसमज दूर करा..त्यांना सांगा, महाराजांना थेट भेटून समस्या सांगा ते नक्कीच मदत करतील..भिऊन भिऊन राहिलात तर मात्र तुमचच नुकसान होईल..सिंहेश्वर म्हणाले. ससोबांनी महाराजांच्या अपेक्षेप्रमाणे कार्य करण्याचं कबूल केलं…

सुरेश वांदिले