(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

द “बॉस” मॅडम!

कोणत्या ज्ञानशाखेतून  आणि कोणत्या शैक्षणिक संस्थेतून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतल्यास उत्तम करिअर घडू शकते? हा प्रश्न, मुलींचे पालक आणि मुलींना कायम पडत असतो. याच्या उत्तराची दिशा, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, या संस्थेकडे जाते. या संस्थेच्या वेगवेगळया कॅम्पसमधील, एमबीए अभ्यासक्रमांना मुलींना प्रवेश मिळाला, तर त्यांना उत्तमोत्तम करिअर संधी लगेच मिळू शकतात.

गेल्या काही वर्षात, भारतीय कॉर्पोरेट किंवा मोठ्या उद्योगांनी आपल्या व्यवस्थापकीय प्रशासनाच्या संनियंत्रणासाठी पुरुष उमेदवारांसोबतच महिला उमेदवारांना प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्या, उद्योग समूह, खाजगी बँका, वित्तीय संस्था, सल्लागार कंपन्या, यामध्ये महिला उमेदवारांना संधी मिळू लागलीय. या संधीचे सोने करत अनेक महिला उमेदवार, अल्पावधित उच्चपदांवरही पोहचत आहेत.

आयआयएममधील प्रवेशाच्या प्रारंभिक चाळणीसाठी कॉमन ॲडमिशन टेस्ट (कॅट) ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेव्दारे प्रारंभिक चाळणीसाठी निवडल्या जाणाऱ्यांच्या यादीमध्ये, बरीच वर्षे मुलींची संख्या अल्पच होती. त्यामुळे लिंग वैविध्यता (जेंडर डायव्हरसिटी) साध्य होत नव्हती. ही बाब लक्षात घेऊन, विद्यार्थींनींची संख्या वाढवण्यासाठी, बऱ्याच आयआयएम यांनी, अंतिम निवड गुणांक तयार करताना, महिला उमेदवारांना अतिरिक्त गुण अथवा वेटेज  अथवा पॉईंट देण्यास सुरुवात केली. परिणामी, गेल्या काही वर्षांत आयआयएममधील मुलींची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. काही आयआयएममध्ये ही संख्या जवळपास मुलांइतकीच झाली आहे.

हे अतिरिक्त गुण/ वेटेज/पर्सेंटाइल पुढील प्रमाणे आहेत-     (१) रोहतक आयआयममध्ये शैक्षणिक वैविध्यता आणि महिला विद्यार्थींनींना २० टक्के अधिक वेटेज दिले जाते. (२) नागपूर आयआयएममध्ये १० पॉईंट्स दिले जातात.  (३) आयआयएम बोधगया मध्ये (काही अटी/ शर्ती/ नियमांच्या अधिन राहून) ३० टक्केपर्यंत जादा जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचे धोरण राबवले जाते. (४) आयआयएम काशिपूरमध्ये अंतिम निवडीसाठी वेगवेगळ्या घटकांचे मिळून एकूण वेटेज ७५ निर्धारित करण्यात आले आहेत. महिलांना, ६ टक्के अतिरिक्त वेटेज दिले जाते. (५) आयआयएम रांची मधील एमबीए, एमबीए- बिझिनेस ॲनॅलिटिक्स आणि एमबीए -ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, या तिनही अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रकियेत अतिरिक्त ५ गुण दिले जातात. (६) आयआयएम ‍तिरुचिरापल्ली- ६ टक्के वेटेज देते. (७) आयआयएम उदयपूरने प्रवेशासाठी ५७ टक्के वेटेज, हे कॅट गुणांना, २१ टक्के वेटेज लेखन क्षमता चाचणी आणि मुलाखतीला, प्रोफाइल (कामाचा अनुभव, शैक्षणिक आणि जेंडर) याला २२ टक्के वेटेज निधार्रित केले आहेत. यामध्ये ५ टक्के वेटेज महिलांसाठी आहेत. (८) आयआयएम संबलपूर- १० गुण देते. (९) आयआयएम रायपूर, महिला उमेदवांराना, काही अटिंच्या अधिन राहून ७ टक्के वेटेज देते. (१०) आयआयएम विशाखापट्टणम १० वेटेज देते. (११) आयआयएम कोझिकोड १० टक्के वेटेज देते. (१२) आयआयएम अमृतसर १० टक्के वेटेज देते. (१२) आयआयएम सिरमौर ५ टक्के अतिरिक्त वेटेज देते. या संस्थेतील एमबीए अभ्यासक्रमासाठी एकूण ४० जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतात. (१३) आयआयएम जम्मूमध्ये ५ टक्के गुण दिले जातात. त्याचबरोबर कॅटच्या एकूण गुण आणि पेपरमधील तिनही सेक्शन (व्हर्बल ॲबिलिटी आणि रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, डाटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी) मधील पर्सेंटाइलमध्ये मुलांपेक्षा सूट दिली जाते.  उदा- खुल्या संवर्गातील मुलांसाठी प्रारंभिक चाळणीसाठी किमान पर्सेंटाइल ९१ लागत असल्‍यास, मुलींसाठी हे पर्सेंटाइल ८९ असते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत संवर्ग आणि नॉन क्रिमीलेअर इतर मागास वर्ग संवर्गातील मुलांसाठी प्रारंभिक चाळणीसाठी किमान पर्सेंटाइल ७४ लागत असल्‍यास, मुलींसाठी हे पर्सेंटाइल ७२ असते.

(वेटेज, गुण, पाँईटस् या वेगवेगळ्या संज्ञांमुळे गोंधळून जाण्याचे कारण नाही. याचा सोपा अर्थ असाच आहे की, प्रवेश प्रकियेत मुलींना अतिरिक्त गुण दिले जातात. त्यासाठी उपरोक्त नमूद आयआयएम वेगवेगळया घटकांच्या नॉर्मलायझेशनचे (सामान्यीकरण) धोरण अवलंबते, त्यासाठी या संज्ञा वापल्या जातात.)

०००

फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट सायंस

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इतकीच महत्वाची असणारी आणि अनेक आयआयएम पेक्षा प्लेसमेंट, रिटर्न ऑन इव्हेंस्टमेंटमध्ये सरस ठरत असलेली, फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट सायंस ही संस्था, एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असलेल्या मुलाखतीच्या प्रकियेतील निवडीसाठी एकूण वेटेजमध्ये ५ अतिरिक्त गुण देते. ही संस्था युनिव्हर्सिटी ऑफ दिल्लीच्या अंतर्गत कार्यरत आहे. (https://fms.edu/)

ही बाब लक्षात घेता, महाराष्ट्रीय अधिकाधिक मुलींनी कॅट परीक्षा देऊन, आयआएएममध्ये जाण्यासाठी प्रयत्न करायला हवा.

०००

महाराष्ट्रातील संस्था

राष्ट्रीय स्तरावरील या व्यवस्थापन स्कूल सोबतच महाराष्ट्रातील पुढील दोन संस्थांमधील एमबीए अभ्यासक्रमांना मुलींनी प्रवेश मिळवल्यास त्यांना उत्तमोत्तम करिअरची संधी मिळू शकते. या दोनही संस्थांमध्ये ३० टक्के जागा महिला उमेदवारांसाठी राखीव असतात.-

(१) सिडेनहॅम इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, रिसर्च ॲण्ड आंत्रप्रिन्युरशीप एज्युकेशन –ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील संस्था आहे. देशातील नामवंत आणि दर्जेदार बिझिनेस स्कूलच्या यादित ही संस्था कायम असते. पश्चिम भारतातील बिझिनेस स्कूलमध्ये पहिल्या १५ संस्थांमध्ये या संस्थेचा समावेश होतो. रिटर्न ऑन इनव्हेस्टेंट म्हणजेच एकूण शैक्षणिक शुल्क आणि मिळणारे वार्षिक पॅकेज, या प्रतवारित गेल्या अनेक वर्षात, देशातील पहिल्या दहा संस्थांमध्ये ही संस्था येते. या संस्थेत मास्टर ऑफ मॅनेजमेंट (एमएमएस) हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, एमएच-सीइटी-एमएमए/एमबीए, कॅट, सीमॅट (कॉमन मॅनेजमेंट ॲडमिशन टेस्ट) या परीक्षांचे गुण ग्राह्य धरले जातात.

संपर्क– बी रोड, चर्चगेट मुंबई- ४०००२०, संकेतस्थळ- https://simsree.org/contact_us/

(२) जमनालाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनजेमेंट स्‍टडीज- ही संस्था मुंबई विद्यापीठाची संलग्नित स्वायत्त संस्था आहे. देशातील पहिल्या १० व्यवस्थापकीय शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये, या संस्थेचा समावेश होतो. संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांनी देशातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये, मुख्य कार्यकारी (चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर-सीइओ) अधिकारी या पदांपर्यंत मजल मारली असल्याने, या संस्थेचा उल्लेख, सीइओ फॅक्ट्री असाही केला जातो. या संस्थेत एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज), एमएस्सी (फायनांस), एमएचआरडी (मास्टर ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट) या तीन अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.

प्रवेश प्रकिया

(१) एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, एमएच-सीइटी-एमएमएस/एमबीए आणि कॅट परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात.

(२) एमएस्सी (फायनांस) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या प्रारंभिक चाळणीसाठी सीइटी, कॅट या परीक्षेतील गुणांचा आधार घेतला जातो. जे उमेदवार संघ लोकसेवा (यूपीएस्सी) आयोगाच्या नागरी सेवा (सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन) परीक्षेची प्राथमिक आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी निवडले गेले असतील, त्यांना एमएस्सी फायनांस, अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीइटी किंवा कॅट परीक्षा देण्याची गरज नाही. ते थेट मुलाखतीसाठी अर्ज करु शकतात. सीइटी, कॅट आणि यूपीएस्सी मुलाखत स्तर, या तिनही गटातील उमदेवारांची व्यक्तिमत्व चाचणी घेतली जाते. यामध्ये मुलाखत, समूह कृती (ग्रुप ॲक्टिव्हिटी) आणि लेखन क्षमता चाचणी या तीन घटकांचा समावेश असतो.

(३) एमएचआरडी, या अभ्यासक्रमाचा प्रारंभिक चाळणीसाठी सीइटी/कॅटच्या गुणांचा आधार घेतला जातो. या उमेदवारांना समूह कृती, मुलाखत आणि लेखन क्षमता चाचणी या तीन घटकांचा समावेश असणाऱ्या व्यक्तीमत्व चाचणीस सामोरे जावे लागते.

या संस्थेतील तिनही अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क हे आयआयएमपेक्षा कितीतरी पटिने कमी आहे. अनेक नव्या आयआयमएमधील एमबीए अभ्यासक्रमापेक्षा या संस्थेतील एमएमएस अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना अधिक वार्षिक पॅकेज मिळत असते. देशातील सर्व महत्वाच्या कंपन्या, कार्पोरेट हाऊस प्लेसमेंटसाठी जातात. दरवर्षी १०० टक्के प्लेसमेंट होते.

संपर्क- १६४, बॅकबे रिक्लेमेशन, एच.टी पारेख मार्ग, मुंबई- ४०००२०, संकेतस्थळ-https://jbims.edu/contact

(सिडेनहॅम इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, रिसर्च ॲण्ड आंत्रप्रिन्युरशीप एज्युकेशन आणि जमनालाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मॅनजेमेंट स्‍टडीज  या दोन्ही संस्थांमधील प्रवेशासाठी सीइटी परीक्षेत पहिल्या दोनशे ते अडिचशेमध्ये येणे आवश्यक आहे.)

सुरेश वांदिले

 

सुरेश वांदिले