मशिन शिकेल तेव्हा?
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुध्दिमत्ता) आणि मशिन लर्निंग (यंत्रांचं शिक्षण) हे विषय ज्यांनी शोधून काढले, ते धन्य धन्य असल्याचं टिल्लूस वाटायचं. खरं तर त्याला या संशोधकांच्या पायाच पडायचं होतं. त्यामुळे गुगल बाबांच्या सहाय्याने त्याने बरीच शोधाशोध केली. तेव्हा आर्टिफिशिअल इंटेलीजन्स आणि मशिन लर्निंग विषयाचा शोध एकानेच लावला नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. संगणकाच्या प्रगत आणि अतिप्रगत ज्ञानातून या दोन्ही विषयांचा किंवा ज्ञानशाखांचा विस्तार होत गेला. असं होत होत या दोन्ही शाखा आजच्या स्थितीपर्यंत आल्याचं त्याच्या लक्षात आलं. तेव्हा त्याने सर्वांना दूरुनच म्हणजे आभासी पध्दतीने दंडवत घालून धन्यवादही दिले.
धन्यवाद यासाठी होते की, कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे यापुढे संगणक, लॅपटॉप, टीव्ही किंवा घरातील सारेच स्मार्ट गॅजेट्स म्हणजेच उपकरणं अधिकाधिक काम करु शकतात. ही कामं अचुक, त्वरित सुध्दा होतात. फक्त काय हवं ते या यंत्रांना सांगायचं किंवा टाईप करायचं, मग हे स्मार्ट यंत्र ते काम करुन देणार किंवा करुन ठेवणार..
आता यांच्या जोडिला मशिन लर्निंग हा विषय आल्यानं तर टिल्लूचा आनंद शतगुणित झालाय.
कारण मशिन लर्निंग या दोन शब्दात यंत्राचं शिकणं असं अभिप्रेत आहे. याचा अर्थ असा की कॉम्प्युटरसारखी सर्व स्मार्ट उपकरणं आता स्वत: शिकू शकतात. म्हणजे त्यांना आतापर्यंत जे जे काही सांगितलं गेलं, जी जी माहिती त्यांच्यात टाकली गेली, जे जे निर्देश दिले गेले, यावरुन ते नव्या नव्या गोष्टी शिकू शकतात. थोडक्यात काय तर, स्व-शिक्षण. असं स्व-शिक्षण खूप पक्क असतं ना..
टिल्लूला आठवलं. त्याचे बाबा टप्पू आणि शाळेतले सर नेहमीच स्व-शिक्षण किंवा स्व-अध्ययनासाठी त्याला सांगत. त्यासाठी प्रोत्साहन देत.
स्व-शिक्षणाने आपला अभ्यास पक्का होतो. जिथे जिथे अडतो, त्याच्या पुढे जाण्याची घाई केली जात नाही. आपण अभ्यास करताना कां आणि कुठे अडतो? हे बरोबर लक्षात येतं. या लक्षात येण्यामध्ये विषयातील घटकांची संकल्पना समजली नसल्याच्या बाबींचा समावेश होतो. संकल्पनाच समजली नसेल तर विषय समजून घेणं म्हणजे पुढं जाणं अशक्यप्राय. समजा अट्टाहासाने पुढे गेलो तर, कपाळमोक्ष ठरलेलाच.
कपाळमोक्ष या अर्थाने की, मगं उत्तर नीट लिहिता येणार नाहीत. प्रश्नच समजणार नाही. विषयातील माहितीच्या आधाराने आडवळणाचा प्रश्न विचारला गेला तर दांडी उडणारच! मात्र स्व-शिक्षण घेणारा विद्यार्थी संकल्पना समजून घेण्यावर सर्वाधिक भर देईल. ही संकल्पना त्याला आकलन झाली नाही तर, त्यासाठी पुन्हा पुन्हा वाचन करेल, मनन करेल. शिक्षकांना विचारेल आणि आपल्या शंकाचं निरसेन करेल. त्याशिवाय तो स्वस्थ बसणार नाही.
याचा अर्थ असा की, यापुढे स्मार्ट उपकरणं स्वत: शिकताना, सर्व बारिक-सारिक बाबी, तथ्य, आकडेवारी, दोन ओळींमध्ये दडलेला अर्थ , समजून – उमजून पुढे जात राहतील. म्हणजे त्यांच्या अभ्यासाचा पाया पक्का होणार. असा पक्का पाया म्हणजे, त्यावरील ज्ञानाची इमारत भक्कम उभी. अशा ज्ञानाचा प्रत्यक्ष कामासाठी उपयोग करण्याचं ज्ञानही पक्कं होणार की.. वा वा वा..टिल्लू स्वत:लाच म्हणाला. तो आपल्या मनातील या विचार प्रक्रियने स्वत:वरच खुष झाला.
आपली सर्व स्मार्ट उपकरणं अशी स्वयंशिक्षणाने सक्षम झाली तर यार, मग बघायलाच नको..तो स्वत:शीच बोलला.
काय बघायला नको मित्रा.. लॅपटॉपच्या स्क्रीनवर एक बॉट येऊन त्याला विचारता झाला…
अरे, पण तुला कसं कळलं..मी काय बोललो ते.. मी तर पुटपुटलो फक्त..
तुझं पुटपुटणं आम्ही पकडलं ना.. तुझा आवाज ओळखू शकतो आम्ही.. आमच्यामध्ये व्हाईस रिकेग्निशनचं गणित म्हणजे ॲलगारिदम आहे म्हंटलं..
म्हणजे, तुम्ही माझ्या मनातलं सर्व काही ओळखू शकता?
गड्या, मनातलं नाही..पण तू पुटपुटलास मात्र ते नक्कीच..पण ते जाऊ दे, तू म्हणालास आपली स्मार्ट उपकरणं जर स्वयंशिक्षणानं समर्थ झाली तर मग काहीच बघायला नको..
अगदी बरोबर बॉट मित्रा..
मग काय बघायला नको, हे जरा सांगशील का मला..
आँ..काय बघायला नको याचा टिल्लूने विचारच केला नव्हता. तो हे सहज बोलून गेला..
टिल्लू विचारात गढल्याचं बघून बॉट म्हणाला,
काय गड्या, काही भलतं-सलतं तर तुझ्या मनात नाही ना...
भलतं- सलतं म्हणजे…
अरे..आतापर्यंत तुमच्या आसपास राहून आणि तुमची विचार करण्याची पध्दती पाहून, मानवास नको ते सतत सुचत राहतं, हे आम्हा यंत्राच्या लक्षात आलय बर कां..
आँ.
आता तुझच बघ ना..तुझी विचार करण्याची पध्दती मला चांगलीच ठाउुक झालीय, त्यावरुन मी अंदाज बांधू शकतो की आम्ही यंत्र स्वत:हून शिकत गेल्यावर समर्थ झाल्याचा आनंद याच्यासाठी होतोय की तुला इंग्रजीतलं भाषण आमच्याकडून लिहून हवय. इंग्रजीचा होमवर्क आमच्याकडून करुन घ्यायचाय. एखाद्या विषयातील मराठीत निबंध लिहून घ्यायचाय. गणिताचे सारेच्या सारे प्रश्न सोडवून घ्यायचेय.
आँ.
आँ काय, मी बरोबर सांगतोय ना..
नाही म्हणजे..
नाही, असं तू म्हणू शकत नाही.. तुझ्या मेंदूत असचं काहीतरी रसायन उकळतय ….बॉट म्हणाला नि अंतर्धान पावला..
००
बॉटचं हे बोलणं ऐकून टिल्लूच्या अंगावर शहारे आले.. त्याने डोळे मिटले. मोठा श्वास घेतला. श्वास सोडून तो बॉटच्या बोलण्यावर विचार करू लागला.. तेव्हा खरोखरच त्याच्या बोलण्यात तथ्य असल्याचं दिसून आलं.. त्याचसाठी त्याला मशिन लर्निंगचा आनंद होत होता..
अगदी बरोबर.. पुन्हा टिल्लू पुटपुटला..
तो आवाज बॉटपर्यंत पोहचल्याने बॉट पुन्हा स्क्रीनवर आला..
गड्या, हे तर काहीच नाही. तू पुढे तुझ्या वेगवेगळ्या परीक्षा सुध्दा आमच्याकडून देण्याची अपेक्षा करशील.. किंवा आम्हाला जबरदस्तीने पाठवशील परीक्षा केंद्रांकडे...
आँ…
अरे, पण हे कसं शक्य आहे…
कां नाही..तुम्हा मानवांना जितक्या चांगल्या गोष्टी सुचतातना, तितकेच वाईट मार्गही लगेच तुम्ही शोधून काढता...समजा परीक्षांसाठी स्मार्ट यंत्रांना पाठवण्याचं ठरलं तर सगळा घोटाळा-गोंधळ आणि संघर्षसुध्दा होऊ शकतो..
तू, काहीही काय बडबडतोस…टिल्लू बॉटला म्हणाला.
अरे, बाबा हे माझं बडबडणं नाही तर तुम्ही आमच्या पोटात किंवा मेंदूत जे काही टाकलयना त्यावरुन मानवाचा मेंदू कसा विचार करेल आणि मानव कशी कृती करेल यासाठी काही आराखडे बांधता येतात राज्या.
बरं बाबा. कोणते आराखडे तू बांधलेस किंवा तुला डोक्यात आले ते सांग बघू.
अरे, स्वयंशिक्षणाने आम्ही यंत्र सारखी शिकतच जाणार म्हणजे आणखी स्मार्ट होणार. म्हणजे तुझे यंत्र स्मार्ट असेल तर तुझ्या मित्राचे सुपर स्मार्ट राहील. त्याच्या मित्राचे सुपर ड्युपर स्मार्ट राहील. मग अशी चढत्या श्रेणीची स्मार्ट यंत्र परीक्षेला गेली तर सुपर स्मार्ट यंत्र अधिक गतिने ,सुपर-ड्युपर स्मार्ट यंत्र त्यापेक्षा गतिने पेपर सोडवतील. कमी स्मार्ट यंत्र मागे राहतील. मग यंत्रायंत्रामध्येच ढिशाँव ढिशाँव होईल..एका नव्या भेदभावाचा हा प्रारंभ होईल.
आँ..असंही घडू शकतं.
माहीत नाही.. मशिन लर्निंगचा तुला जसा आनंद झालाय तसाच आनंद, तुझ्यापेक्षा अधिक बुध्दीमान मुलालाही झालाच असणार ना.. तो असं काहीतरी विपरीत घडवून आणणारच नाही याची काय हमी?.
आँ..
आँ… आँ… आँ काय करतोस मघापासून.. मशिन लर्निंगने यंत्र अधिक स्मार्ट आणि अधिक बुध्दीमान होतील. पण तुमच्या डोक्यावर बसतील इतकं त्याचं स्वयंशिक्षण होणार नाही याची काळजी पण घ्या की..
पण बॉट मित्रा, हे तू कां बरं मला समजावून सांगतोस..
अरे बाबा, स्मार्ट आणि अधिक स्मार्ट होणं चांगलंच रे पण स्वत: झालेलं. दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन नाही.. तुमच्या एडिसनने शेकडो शोध लावले.. ते त्याच्या बुध्दीनं…त्याच्या मदतीला आजच्यासारखी यंत्र नव्हती.. बुध्दीचा कस लागला पाहिजे. तो मानवाचा लागला पाहिजे. आमचा नाही.. आम्ही काय, शिकत जाऊ नि शिकत राहू. तुम्हाला हवं ते आणि नको तेही करुन देत जाऊ.. पण तुमच्या बुध्दीचा कस लागल्यानंतर जे काही साध्य होतं, त्याचा मनमुराद आणि निर्भेळ आनंद तुम्हाला मिळायला हवा ना. आम्हाला भावनाच नसल्याने आनंदाचा प्रश्न नाही. जिथे आनंद नाही तिथे गड्या, काहीच मजा नाही..असं बोलून बॉट पुन्हा अंतर्धान पावला..
टिल्लू भानावर आला. बॉटने त्याचे डोळे उघडले होते. मशिन लर्निंग चांगलंच पण आपल्या बुध्दीचा वापर करण्याचा आनंद वेगळा, समाधान वेगळं, असा धडा बॉटने त्याला दिला होता..
सुरेश वांदिले,
७०१,सातवा माळा,देवराई सहकारी गृहनिर्माण संस्था,चारकोप,सेक्टर ६,कांदिवली-पश्चिम.मुंबई ६७
९३२४९७३९४७
000