
फिट है तो हिट है !
उत्तम आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी अधिकाधिक नागरिक जिम, फिटनेस सेंटर, फिटनेस स्टुडियोकडे वळताहेत. स्वत:ला “फिट ॲण्ड फाइन” ठेवण्याकडे मोठ्याप्रमाणावर जाणीवजागृती झालेली दिसते. ही बाब, भारतातील फिटनेस इंडस्ट्रीच्या वाढिसाठी उपयुक्त ठरतेय. गेल्या काही वर्षात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी (फिटनेस ब्रँड) भारतभर शाखाविस्तार केला. जिम आणि हेल्थ सेंटर्सची संख्या वाढली त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगार संधीही निर्माण झाली आहे.
सर्टिफाइड पर्सनल ट्रेनर (अधिकृत प्रमाणपत्रधारक व्यक्तिगत प्रशिक्षक) यांची मागणी वाढत चाललीय. अनेक संस्था असे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवत असल्या तरी, मान्यताप्राप्त संस्थांचा अभाव दिसून येत होता. ही बाब लक्षात घेऊन, मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या, गरवारे इंस्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन ॲण्ड डेव्हलपमेंट, या संस्थेने, फिटनेस ट्रेनिंग प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केला आहे. पर्सनल ट्रेनर होण्यासाठी आवश्यक असणारे सगळे विषयघटक या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत. हा अभ्यासक्रम केल्यावर विद्यार्थ्यांना भारत आणि परदेशातही चांगल्या संधी मिळाल्या आहेत.
फिटनेस न्यट्रिशन – हा कौशल्यनिर्मितीचा, अभ्यासक्रम केल्यावर जिम, हेल्थ सेंटर, फिटनेस सेंटर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आदी ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळू शकतात. स्वयंरोजगाराच्याही संधी मिळू शकतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर मिळणारे प्रमाणपत्र, स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या मार्फत निघणाऱ्या या क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी पात्र ठरवले जाते. मुंबई विद्यापीठातील, या विषयातील तज्ज्ञांनी या अभ्यासक्रमातील विषयघटकांना मान्यता प्रदान केली आहे. हा अभ्यासक्रम याक्षेत्रातील अनुभवी व्यक्तींकडून शिकवला जातो. प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो.
दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अर्हता- १०वी उत्तीर्ण,वयाची किमान १८ वर्षे पूर्ण केलेली असावित.
संपर्क– https://www.gicededu.co.in
मुंबई विद्यापीठ – सर्टिफिकेट कोर्स इन फिटनेस सेंटर मॅनेजमेंट. अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिने. हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेत १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला करता येतो.
संपर्क- डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कलिना कॅम्पस, विद्यानगरी, सांताक्रुज पश्चिम, मुंबई- ४०००९८, संपर्क साखळी- https://parttimecourses.mu.ac.in/
मनिपाल ॲकॅडेमी फॉर हायर एज्युकेशन– या संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असणा-या, मनिपाल कॉलेज ऑफ हेल्थ प्रोफेशन मार्फत, बीएस्सी इन एक्झरसाइज ॲण्ड स्पोर्ट्स सायंस, हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. अर्हता- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या गटात किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या गटात सरासरीने ४५ टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण. हा अभ्यासक्रम केल्यावर हेल्थ ट्रेनर, हेल्थ फिटनेस स्पेशॅलिस्ट, एक्सरसाइज स्पेशॅलिस्ट, एक्सरसाजइज ॲण्ड स्पोर्ट्स फिजिऑलॉजिस्ट, स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन अशा करिअर संधी मिळू शकतात.
संपर्क- https://www.manipal.edu/soahs-manipal/program-list/b-sc–exercise-and-sports-science-.html
सिम्बॉयसीस स्कूल ऑफ स्पोर्ट्स सायंस,पुणे- या संस्थेने, बीएस्सी इन स्पोर्ट्स ॲण्ड एक्सरसाइज सायंस, हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. खुला संवर्ग ५० टक्के, राखीव सवंर्ग ४५ टक्के.
संपर्क- https://www.ssss.edu.in
सोमय्या स्पोर्ट्स ॲकॅडेमी, मुंबई – अभ्यासक्रम बीएस्सी स्पोर्ट्स ॲण्ड एक्सरसाइज सायंस, कालावधी- तीन वर्षे, अर्हता- ४५ टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण.
संपर्क- https://sports-academy-files.somaiya.edu
लक्ष्मीबाई नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन, ग्वाल्हेर-
या संस्थेच्या, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फिटनेस मॅनेजमेंट, अभ्यासक्रमामध्ये फिटनेस व्यवस्थापनाची मूलभूत तत्वे आणि संकल्पना, फिटनेस क्षेत्रातील नवे प्रवाह, पोषण विषयक सर्वसाधारण माहिती, स्नायू आणि त्याचे प्रकार, ताकद/ जोर (स्ट्रेंग्थ), लवचिकता, तग धरण्याची क्षमता, या प्रशिक्षणाची संकल्पना, व्यायामाचे शरीरशास्त्र, अशा विषयघटकांचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षं. या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील पदवीधराला प्रवेश घेता येतो. पदवी परीक्षेत खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याला ४५ टक्के आणि राखीव संवर्गातील ४० टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमाला चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२५ आहे. लेखी चाळणी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी २५ जून ते २७ जून २०२५ या कालावधीत घेतली जाईल. लेखी परीक्षेला ४० गुण आणि शारीरिक क्षमता चाचणीला ६० गुण असतात. लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ पध्दतीचे प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न, उमेदवारास असलेली क्रीडा क्षेत्रातील सर्वसामान्य ज्ञानाची माहिती जाणून घेण्यासाठी विचारले जातात. कालावधी- ९० मिनिटे. शारीरिक क्षमता चाचणीमध्ये धावणे, चालणे, उंच उडी यासारख्या बाबींचा समावेश असतो. त्याविषयी विस्तृत माहिती संस्थेच्या माहितीपत्रकात देण्यात आली आहे.
दूर शिक्षणपध्दतीचे अभ्यासक्रम
या संस्थेमार्फत पुढील अभ्यासक्रम मुक्त आणि दूरशिक्षण (डिस्टंस एज्युकेशन) पध्दतीने सुरु करण्यात आले आहेत- (अ) डिप्लोमा इन (१) स्पोर्ट्स मॅनेजमेंट, (२) स्पोर्ट्स जर्न्यालिझम, (३) स्पोर्ट्स ॲनॅलिटिक्स, (४) स्पोर्ट्स सायकॉलॉजी, (६) स्पोर्ट्स ॲनॅलिटिक्स. अर्हता- कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण. खुला संवर्ग ४५ टक्के, राखीव संवर्ग ४० टक्के. (ब) पोस्ट गॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजमेंट हा अभ्यासक्रमसुध्दा दूरशिक्षण पध्दतीने करता येतो. कालावधी एक वर्षे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण. खुला संवर्ग ४५ टक्के, राखीव संवर्ग ४० टक्के.
प्रवेश प्रकिया १ जुलै २०२५ ते २० ऑगस्ट २०२५ पर्यंत सुरु राहील. संस्थेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पध्दतीनेच प्रवेश घ्यावा लागतो. या अभ्यासक्रमांना थेट प्रवेश दिला जातो.
संपर्क- https://lnipe.edu.in/
००००
क्रीडा पत्रकारिता
भारतीय क्रीडा विश्वाने आता बरीच कात टाकली असून, क्रिकेटसह, बॅडमिंटन, बुध्दिबळ, हॉकी, कबड्डी, नेमबाजी, कुस्ती, टेनिस अशा खेळांमध्ये भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसतात. यामुळे क्रीडा रसिकांचाही ओढा इतरही खेळांकडे वाढू लागलाय. या सगळ्यांची बित्तंबातमी देण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी, खास प्रशिक्षण घेतलेले पत्रकार किंवा माध्यमकर्मींची गरज वाढत चाललीय. क्रीडा पत्रकारिकतेच्या किंवा कम्युनिकेशनच्या क्षेत्रात चांगले करिअर घडवता येणे शक्य आहे. यादृष्टिने पुढील काही अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात.
संस्था आणि अभ्यासक्रम
(१) लक्ष्मीबाई नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन-
एम इन स्पोर्ट्स जर्न्यालिझम- कालावधी दोन वर्षे. कोणत्याही विषयातील पदवीधराला हा अभ्यासक्रम करता येतो. खुल्या संवर्गातील उमेदवारास ४५ टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्याला ४० टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ५० गुणांची वस्तुनिष्ट पध्दतीची ऑनलाइन चाळणी परीक्षा घेतली जाते. यामध्ये ३५ गुण हे विषयाचे ज्ञान तपासण्यासाठी आणि १५ गुण तार्किकक्षमता (रिझनिंग) तपासणीसाठी असतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२५ आहे.
या अभ्यासक्रमात पुढील घटकांचे ज्ञान प्रदान केले जाते- (१) क्रीडा पत्रकारितेची ओळख, (२) क्रीडा क्षेत्रासाठी माध्यमांची भूमिका, (३) पत्रकारांची भूमिका, (४) वृत्तमूल्य आणि वस्तुनिष्ठता, (५) बातमी आणि त्याचे घटक, (६) माध्यमांचे प्रकार, (७) माध्यमांचा अर्थ आणि संकल्पना, (८) पत्रकारितेचा अर्थ आणि संकल्पना, (९) पत्रकारितेतील नैतिक मूल्ये, (१०) पत्रकारितेतील व्यावसायिकता आाणि प्रशिक्षण, (११) संपादक आणि उपसंपादकांचे कार्य आणि जबाबदारी, (१२) इव्हेंट व्यवस्थापनासाठी आवश्यक संवादकौशल्य, (१३) व्यवसाय संवादकौशल्याची ओळख, (१४) लेखन कौशल्य, (१५) नियतकालिकांसाठी लिखानाचे गुणधर्म, इत्यादी.
(२) मनिपाल इंस्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स कम्युनिकेशन- कालावधी एक वर्षं. अर्हता- कोणत्या विषयातील पदवी. संपर्क- https://www.manipal.edu/soc/ हा अभ्यासक्रम केल्यावर, मीडिया रिलेशन स्पेशॅलिस्ट इन स्पोर्ट्स क्लब, राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय क्रीडा चमूंचे प्रवक्ते, कम्युनिकेशन मॅनेजर, मीडिया आणि पब्लिक रिलेशन मॅनेजर, इव्हेंट कुऑर्डिनेटर, अशा संधी मिळू शकतात.
(३) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ जर्न्यालिझम ॲण्ड न्यू मिडिया, बेंगळुरु- या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ब्रॉडकॉस्टिंग, प्रिंट जर्न्यालिझ आणि ऑनलाइन/ मल्टिमीडिया जर्न्यालिझम हे अभ्यासक्रम सुरु केले आहेत. यामध्ये, स्पोर्ट्स रिपोर्टिंग, हा एक एैच्छिक विषय निवडण्याची सुविधा आहे. संपर्क- https://www.iijnm.org
सुरेश वांदिले