(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

  

डाव उलटला

बादशहा अकबरांच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक असलेल्या बिरबरलाकडे  विलक्षण बुध्दीमत्ता होती. त्याच्याकडे कोणत्याही प्रश्नाचे आणि समस्येचे उत्तर तयार असायचे. अकबर कायम बिरबलास सोबत ठेवायचा. त्यामुळे बिरबलाचे खूप शत्रू निर्माण झाले. अकबराच्या समवेत बिरबल नसताना, अनेक दरबारी अकबराचे त्याच्याविरुध्द कान भरवित.

एक दिवस तुमच्या गादीवर बसण्यास सुध्दा हा बिरबल मागेपुढे बघणार नाही,असं अकबराच्या प्रधानाने एकदा त्याला सांगितलं.

एक दरबारी म्हणाला, कोणतीही व्यक्ती इतकी बुध्दीवान राहू शकत नाही. बिरबल हा माणूस नसून एखादे भूतच असले पाहिजे.

कुणी म्हणाले, बिरबल मांत्रिक असून तो मंत्र सामर्थ्याने आपल्याला मूर्ख बनवत राहतो.

हे सर्व ऐकून अकबराचे खूप मनोरंजन हेात असे. बिरबलाच्या हुषारीवर ही मंडळी जळतात हे त्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे बिरबलाविरुध्द सतत कागाळी करणाऱ्या कोणत्याही लोकांचे म्हणणे अकबर या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचा.

एकांतात असताना अकबर, बिरबलला या सर्व गमतीजमती सांगत असे..

ते ऐकून एकदा बिरबल अकबरास म्हणाला,

खाविंद, इतकी सगळी मंडळी म्हणतात तर तुम्हाला संशय कां बरं येत नाही माझा.

तुझ्यावर संशय घेऊन तुझं काय बरं करायचं. बिरबला..

माझ्यावर संशय घेऊन तुम्ही तुरुंगात टाका. त्यामुळे माझ्याविरुध्द असणाऱ्या सगळ्यांना समाधान मिळेल. ते आनंदी होतील. ते आनंदी झाल्याने दरबारात आनंदी आनंद राहील..बिरबल म्हणाला.

अरे, तुला तुरुंगात टाकल्यावर मी कसा काय आनंदी राहू शकेन, अकबराने सवाल केला. मात्र बिरबल त्याला तुरुंगात टाकण्याचा हट्टच धरुन बसला.

बिरबल आपले ऐकत नाही बघून अकबरास फार राग आला. तो रागारागात कुणालाही न सांगता अज्ञात ठिकाणी निघून गेला..

दुसऱ्या दिवशी दरबारात नेहमीच्या वेळी अकबर हजर झाला नाही. दरबारात जमलेल्या बिरबलासह इतर दरबाऱ्यांना आश्चर्य वाटले. तोच महालातून एक सैनिक धावत आला आणि त्याने प्रधानजींना सांगितले की अकबर रात्रीपासूनच गायब आहेत. ते रात्री महालातसुध्दा आले नाहीत.

काSय… प्रधानजीसह सर्वच दरबारी एका सुरात म्हणाले. काही जणांनी बिरबलाकडे संशयाने बघितले.

तुम्हाला काय वाटतं, मी खाविंदांना पळवून नेले. उलट कालच त्यांना मलाच तुरुंगात टाका, अशी विनवणी करत होतो…. संशयाने त्याच्याकडे बघणाऱ्यांकडे नजर फिरवित बिरबल,म्हणाला..

कशासाठी तुला तुरुंगात टाकण्यासाठी आग्रह करत होतास बिरबल..प्रधानजीने करड्या आवाजात विचारलं..

तुमच्या सर्वांच्या समाधानासाठी.तुम्हाला वाटतं ना की मी बादशहाच्या सिंहासनावर बसेन म्हणून..मी तुरुंगात गेल्यावर तर मग तुम्हीच राहालना बादशहासोबत..त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकाल, त्यांची वाहवा मिळवू शकाल..

मग कां नाही टाकले,त्यांनी तुला तुरुंगात, प्रधानजींनी बिरबलला विचारलं.आपण काही तरी भलताच प्रश्न विचारल्याचं प्रधानजींच्या लगेच लक्षात आलं. त्यांनी गळा खाकरला.. बिरबरलाकडे बघत म्हणाले, आता आपण नको त्या विषयावर चर्चा कशाला करतोय.. बादशहांना आधी शोधून काढले पाहिजे.

हो हो बादशहांना आधी शोधून काढले पाहिजे..सगळे दरबारी एका सुरात म्हणाले…

बिलकूल नाही…बिरबल म्हणाला..सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. दरबारात टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता निर्माण झाली. प्रधानजीसोबत अनेकांनी तलावारी उपसल्या..ते सर्व बिरबलाच्या भोवती गोळा झाले. त्यांच्या डोळयातून निखारे वाहत होते..

याचा अर्थ तूच काहीतरी दगाफटका केला आहेस तर..,बिरबलाच्या गळ्याजवळ तलवारीचे टोक लावत प्रधानजी म्हणाले.

प्रधानजी, मी बादशहाचा निष्ठावंत सेवक आहे. माझी क्षमता आणि ताकत त्यांच्या विरुध्द दगाफटका करण्याची नाही. मी दगाफटका केलाच असता तर, इथे तुमच्या गराड्यात राहिलो नसतो, सिंहासनावर बसलो असतो. बिरबलाचे हे बोल ऐकल्यावर प्रधानजींचा राग किंचित कमी झाला.ते आपली तलवार खाली करत म्हणाले..

मग, तू कां म्हणतोस की बादशहांना शोधायची गरज नाही म्हणून..

तुम्हीसुध्दा असच म्हणायला पाहिजे..प्रधानजीकडे बघत बिरबल उद्गारला.

आम्ही तुझ्यासारखे नमकहराम नाहीत ना..आम्हाला बादशहाची काळजी आहे..प्रधानजी रागाने म्हणाला.

तुम्हाला काळजी आहे हो, पण बादशहाला काळजी आहे का..तुमची, माझी, इथे जमलेल्या सर्वांची म्हणजे प्रजेची?

काय म्हणायचय तुला..कोड्यात बोलू नकोस.. प्रधानजी रागाने म्हणाला.

अहो, प्रधानजी,बादशहाला काही राग आला असेल तरी त्याने आपल्या प्रजाजनांना वाऱ्यावर सोडून जाणं शोभत कां असं? बदाशहानं खंबिर असलं पाहिजे. असं कुणालाही न सांगता निघून जाणं, म्हणजे संकटाला स्वत:हून निमंत्रण देणं ठरत नाही का.. बिरबलानं त्यांना विचारलं.

यावर त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. इतर दरबाऱ्यांकडे बघून मग हाच सवाल बिरबलाने केला.कुणीही याचं उत्तर दिलं नाही.

मग आता काय करावं असं तुला वाटतं..

प्रधानजी आपण एक दिवस वाट बघावी, बादशहा परतण्याची. ते नाहीच आले तर कुणाला तरी सिंहासनावर बसवू या..गादी अशी रिकामी राहिली तर शत्रू आपल्यावर आक्रमण करायचा…

अगदी बरोबर ..इतर दरबारी म्हणाले..

पण गादीवर कोण बसणार..प्रधानजी अधिरतेने म्हणाले..

अहो प्रधानजी तुमच्यासारखा हुषार, धोरणी, साहसी, बुध्दीमान व्यक्ती दुसरा आहे का कुणी आख्या साम्राज्यात.. प्रधानजीकडे बघत बिरबल,म्हणाला..ते ऐकून प्रधानजींना बादशहा झाल्याची दिवा स्वप्ने पडू लागली…त्याच्या चेह-यावरचा आनंद ओसंडून वाहू लागला..आपणच बादशहा असल्याच्या थाटात त्याने दरबार बरखास्त केला.

००

या सर्व घडामोडी बादशाहा अकबारचे गुप्तहेर त्यांच्यापर्यंत पोहचवत होते. बादशहा बनण्यास आपला प्रधान राजी झाल्याचे ऐकून आणि त्याला बादशहा बनवण्यास बिरबलाने राजी केल्याचे ऐकून, बादशहाच्या राग अनावर झाला. तो दुसऱ्या दिवशी दरबार भरण्याचा आधीच सिंहासनावर येऊन बसला.

प्रधानजी जेव्हा दरबारात आले, तेव्हा सिंहासनावर बसलेल्या अकबरास बघून आश्चर्यचकित झाला. त्याला दरदरून घाम फुटला..

थोड्याच वेळात बिरबल आला. त्याने आपल्या सोबत मोठ्ठा गुलाबाचा हार आणला होता..

हा हार काय तुमच्या नव्या होणाऱ्या बादशाहासाठी आणला की काय, अकबराने कुत्सिपणे बिरबलास विचारलं..

खाविंद, कोण नवीन बादशहा..मला तर काहीच माहीत नाही..हा हार तुमच्या साठीच आणला.

खोटं बोलतोस तू.अकबर दरडावून म्हणाला..

खाविंद, मी कधी खोटं बोलत नाही हे तुम्हास ठाऊक आहे. लोकांचं खोटं मी उघडं पाडतो महाराज..

असं कोड्यात बोलू नकोस बिरबल..पुन्हा दरडावत अकबर म्हणाला..

महाराज..तुमचा प्रधानजी कसा खोटारडा हे आलं ना तुमच्या लक्षात..बिरबल म्हणाला..

मी काय खोटारडेपणा केला, बिरबलाकडे रागान कटाक्ष टाकत प्रधानाने विचारले.

प्रधानजी, तुम्ही बादशहा होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झालात की नाही..

ती तुझी कल्पना होती..

मी तुम्हाला आगीत उडी मार म्हंटले असते तर उडी मारली असती का तुम्ही प्रधानजी..बिरबलाने विचारलं..

बिरबला,तू बादशहांना माझ्याविरुध्द भडकवत आहेस. याचे परिणाम वाईट होतील हे लक्षात ठेव..

प्रधानजी, मी कुणाला भडकवत नाही…बादशाहच ठरवतील खरं काय आणि खोट काय ते..

म्हणजे  काय..अकबराने पुन्हा दरडावून विचारलं.

खाविंद..तुम्हाला तुमची चूक कळावी, प्रधानजी कसा विचार करतात हे कळावं आणि तुम्ही आपण होऊन परत यावेत म्हणून मीच हा डाव टाकला..बिरबल प्रधानजीकडे बघत म्हणाला..

प्रधानजींचा राग अनावर झाला. तलावर उपसून तो बिरबलावर धावून गेला. ते बघून अकबराने आपल्या रक्षकांना बिरबलाच्या रक्षणासाठी पिटाळले. त्यांनी वेगाने हालचाल करुन प्रधाजनींना ताब्यात घेतले..

बघितलत खाविंद..गादीवर मी नाही तर प्रधानजी बसू इच्छित होते..हे सिध्द करण्याची संधी तुम्ही रागारागाने निघून गेल्यामुळे मला मिळाली.. बादशहाकडे बघत बिरबल म्हणाला.

तुझ्या हुषारीला कुणाचा पर्यायच नाही रे बिरबला,अकबर म्हणाला..पटलं ना दरबा-यांनो, अकबर  दरबाऱ्यांकडे बघत म्हणाला..

हो हो हो..दरबारात एकमुखी आवाज उमटला…

सुरेश वांदिले