बैलौबा कां भितो?
जाधवपुरच्या महाराजांनी उभारलेल्या सुंदर अशा बागेत, वानरांची टोळी खेळत बागडत होती. या टोळीमधील ज्येष्ठ सदस्य वेगवेगळया झाडांवर शांतपणे फळे खात बसली होती. पिल्लू वानर मंडळी मात्र दंगामस्तीत रंगली होती. या झाडावरुन त्या झाडावर उड्या मार. या फांदीला लटक, त्या फांदिला लटक. मध्येच आईला जाऊन बिलग. मध्येच जमिनीवर येऊन बागेतल्या नळाच्या तोटीवर जाऊन बस. थोडक्यात सर्वांची धम्माल सुरु होती. त्यांच्या या धम्मालीकडे आईबाबा कौतुकाने बघत होते. ही मौजमस्ती सुरु असताना या बागेत एक बैलोबा कुठून तरी आला. ज्या ठिकाणी पिल्लू वानरांची धम्माल सुरु होती, तिथून तो जाऊ लागताच सर्व वानरांमध्ये हलचल माजली. ते पटापट पटापट इकडे तिकडे पळाले. त्या वानरांना पळताना बघून तो बैलोबाही पळू लागला..
या सर्व घटनाक्रमाकडे एक पिल्लू वानर न घाबरता, लक्ष ठेऊन होतं. बैलोबा निघून गेल्यावर त्याने आपल्या आईबाबांना विचारलं, बैलोबा दिसताच तुम्ही काका काकू काकू, मामा-मामी, आत्या, ताई, दादा, आजी आजोबा, माझे मित्र कां बरे पळालात?
अरे, तो बैलोबा, बघितलास ना, कसा आडदांड होता. त्याने त्याची शेपटी फिरवली तरी त्या तावडीत येणारे बेशुध्द पडतील. तो किती शक्तीशाली, आपण त्याच्यापुढे अगदीच किरकोळ. अशावेळी स्वसंरक्षणासाठी सावधगिरी म्हणून पळून जायचं असतं. नाही तर, आ बैल मुझे मार असं शब्दश: खरं ठरायचं. पिल्लू वानराच्या आईनं त्याला समाजावून सांगितलं. बाबांनी त्यास होकार दिला..
पिल्लू वानर विचार करु लागला. आईबाबा जे सांगतात ते जर खरं असेल तर, मग तो बैलोबा आपली पळापळ सुरु असताना कां बरं पळाला..त्याने आपल्या मनात आलेला प्रश्न बाबांना विचारला. याचे उत्तर काही त्यांना देता आले नाही. खरं तर त्यांनी बैलोबास पळताना बघितलच नव्हतं.
पिल्लू वानरास आई, म्हणाली, अरे तो शक्तीशाली बैलोबा कशासाठी पळेल बाँ.तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. तू बघतोस एक आणि सांगतोस भलतच.. वेंधळाच आहेस तू..आई त्याला खिजवित म्हणाली..
पिल्लू वानरास आईच्या बोलण्याचा राग आला. पण त्याने तो गिळून टाकला. बैलोबास पळताना यांना दाखवून दिल्याशिवाय कुणीही आपल्यावर विश्वास ठेवणार नाही, याची त्याला खात्री पटली.
दुसरा दिवस उजाडला.
पुन्हा बागेमध्ये वानरटोळी आली. पिल्लू वानरांची धम्माल मस्ती सुरु झाली. काल ज्या पिल्लू वानराने बैलोबास पळताना बघितलं होतं, तो बैलोबाच्या येण्याकडे डोळे लावून बसला होता. त्यामुळे तो इतर पिल्लू वानरांसोबत दंगामस्तीत सामील झाला नाही. त्याच्या आजोबांच्या ही बाब बरोबर लक्षात आली.
आजोबांनी त्याच्या जवळ येऊन काय झालं ते विचारलं. त्याने बैलोबाची वाट बघत असल्याचं सांगितलं. बैलोबा आला तर काय घडतं, हे बघण्यासाठी तुम्ही सुध्दा पळू नका, सध्याच्या ठिकाणी बसून राहा, अशी गळ त्याने आजोबांना घातली. नातवासाठी आजोबांनी पळून न जाण्याचं मान्य केलं..
दुपारच्या समयी बैलोबा रमत गमत त्या ठिकाणी आले. वानर टोळी असलेल्या जागेवरुन बैलोबा जाऊ लागले, तेव्हा पुन्हा सर्व वानर मंडळी इकडे-तिकडे पळू लागली. ते बघून बैलोबाही पळू लागला. पिल्लू वानराने आजोबांच्या ते लक्षात आणून दिलं..
बैलोबा निघून गेल्यावर आजोबासोबत पिल्लू वानर आईबाबांकडे परतला. आजोबांनी आज बैलोबा पळल्याचं बघितल्याचं त्यांने आईबाबांना सांगितलं.. आजोबांनी होकारार्थी मान हलवली. त्यामुळे आईबाबांना पिल्लू वानरावर विश्वास ठेवणं भागच होतं.
मग आता सांगा, आपण सगळे पळत सुटलो तेव्हा शक्तिमान बैलोबाही कां पळत सुटला..पिल्लू वानराने विचारलं. आईबाबांना याचं काही उत्तर सुचेना. त्यांनी आजोबांकडे बघितलं तर त्यांनाही काही सुचेना.
या चर्चेत इतर वानर मंडळी सामील झाली. बैलोबा पळाला,असं पिल्लू वानरानं सांगितलं, तेव्हा त्यांचा विश्वासच बसेना..आपल्याकडे हलत डुलत, नाक फेंदारत येणारा बैलोबाच सगळयांना दिसायचा. पळणारा बैलोबा कुणालाही दिसला नाही..त्यामुळे पिल्लू वानर खोटं बोलतोय, खोडी करतोय असं एकदोन काका काकू म्हणाले,तेव्हा आजोबांनी , आपण बैलोबास पळताना बघितल्याचं सांगून सर्वांची बोलती बंद केली.
आता सर्वांचा, बैलोबाच्या पळण्यावर विश्वास बसला. तो कां पळाला असावा? पिल्लू वानराने हा प्रश्न काका काकूंना केला..त्यांना याचं उत्तर सांगता आलं नाही.
पिल्लू वानर कराकरा डोक आणि अंग खाजवू लागला. असं करता करता, त्याच्या मनात एक उत्तर आलं..
त्याने टुणदिशी उडी मारली आणि तो म्हणाला,बैलोबा कां पळाला याचं उत्तर सापडलं मला ..
वा..वा..सांग बघू सर्वांनी उत्सुकतेनं विचारलं..
पिल्लू वानर सांगू लागला..मला वाटतं आपण जसं बैलोबास घाबरतो, तसा तो सुध्दा आपणास घाबरुन तो पळत असावा…
पिल्लू वानराच्या या उत्तराने सर्वजण फिदीफिदी हसले..अरे तो धिप्पाड बैलोबा,आपण त्याच्या समोर चिरकूटच नाही का? तो कशासाठी आपणास घाबरणार? काहीही बाता मारु नकोस.. एक काका म्हणाले.. इतरांनी पिल्लू वानरांची टर उडवली. तेव्हा आजोबांनी सर्वांना चूप बसवले.
अरे, हा पिल्लू म्हणतो,त्यात तथ्य राहू शकते ना..आपणास जरी बैलोबा शक्तीशाली वाटत असला तरी त्याला आपली भीती वाटू शकते. आपण त्याला उगाचच भितो, तोही आपणास उगाच भितो. आपलं तो काही वाकडं करु शकत नाही, तसच आपणही त्याचं वाकडं करु शकत नाही..हे त्यालाही कळत नाही आणि आपणासही कळत नाही. दोघांचही अज्ञान. असं अज्ञान असलं की जी भीती वाटते ती अदृष्य रुपातली असते..
म्हणजे हो काय आजोबा..पिल्लू वानराने विचारलं
आता याचं स्पष्टीकरण देण्याऐवजी उद्या आपण प्रयोगच करु या की….
म्हणजे काय करायचं?पिल्लू वानरानं विचारलं.
बैलोबा आला की सर्वांनी शांत राहायचं. उगाच घाबरुन पळापळ करायची नाही. मग बघू काय होते ते. … आजोबांनी समजावून सांगितलं.
सर्वांनी ते मान्य केलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच ठिकाणी वानर मंडळी आली. पिल्लू वानर दंगामस्तीत मग्न झाले. काही वेळाने बैलोबा आला. तो जेव्हा वानर मंडळी असलेल्या ठिकाणांहून जाऊ लागला.तेव्हा वानर मंडळी शांतपणे बसून राहिली. त्यांनी पळापळ केली नाही. बैलोबास या पळापळीची सवय झाली असावी. पण काहीच हालचाल दिसत नसल्याने तो जरा थबकला. काही क्षण थांबला आणि ज्या झाडावर वानर मंडळी बसली होती. त्या ठिकाणचं त्याने गवतही खाल्लं आणि इकडे-तिकडे बघत शांतपणे निघून गेला..
सर्व वानरांनी एकच गिलका केला..
आपण त्याला आणि तो आपणास घाबरत होता. हे वानरांच्या लक्षात आलं. असं एकमेकांना उगाचच घाबरण्यात अर्थ नसतो, हे ही त्यांच्या लक्षात आलं. बैलोबाच्याही हे लक्षात येऊ दे रे महादेवा,अशी मनोमन प्रार्थना पिल्लू वानराने केली……
सुरेश वांदिले